शेत जमिनीचा “क” नकाशा अक्षांश रेखांशासह ऑनलाईन मिळणार !
भूमि अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १३६ व महाराष्ट्र जमिन महसूल (सीमा व सीमाचिन्हे) नियम, १९६९ मधील तरतुदीनुसार जमीनधारक अगर हितसंबंधित व्यक्तीच्या अर्जानुसार विभागाकडून मुख्यतः जमिनीची मोजणी करून भूमी अभिलेखानुसार जमिनीच्या हद्दी कायम करणे, जमिनीचा झालेला पोटहिस्सा मोजणी करून त्यांचे नवीन पोटहिस्सा अभिलेख तयार करणे भूसंपादन मोजणी करणे व संपादन क्षेत्राप्रमाणे अभिलेख तयार करणे, जमिनीच्या हद्दी निश्चित करून त्या हद्दीसंबंधीत जमीन धारकास दर्शवून जनतेच्या विनंतीचे/तक्रारींचे निवारण केले जाते. तसेच मोजणीअंती संबंधित धारकांना/अर्जदारांना मोजणी नकाशाच्या “क” (C Map) प्रती पुरविल्या जातात.
शेत जमिनीचा “क” नकाशा अक्षांश रेखांशासह ऑनलाईन मिळणार ! C Map:
सदर मोजणी नकाशाच्या “क” प्रती मध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहिवाटी / ताब्याप्रमाणे व अभिलेखाप्रमाणे येणा-या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टिपा नमूद करुन मोजणी नकाशाची “क” (C Map) प्रत पुरविली जाते.
सद्य:स्थितीत जमीन मोजणीसाठी जी.आय.एस.आधारीत जी.एन.एस.एस. रोव्हर्स व इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशिन इ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच मूळ भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन व जिओ रेफरन्ससिंग केलेल्या नकाशांचा मोजणी नकाशा अंतिम करताना आधार नकाशा (Base Map) म्हणून वापर करण्यात येत आहे. तसेच ई-मोजणी व्हर्जन २.० ही आज्ञावली नंदुरबार व वाशिम जिल्ह्यांमध्ये तसेच इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यामध्ये लागू करण्यात आलेली असून टप्प्याटप्याने संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.
सदर आज्ञावलीद्वारे स्विकारण्यात येणारे मोजणी अर्ज प्रकरणी जी.आय.एस.आधारीत जी.एन.एस.एस. रोव्हर्सद्वारे मोजणी काम करण्यात येत आहे. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. त्यामुळे जमीन मोजणी प्रकरणांमध्ये लगतच्या धारकांचे हद्दीबाबत मोजणीवेळी मानवी चुकांमुळे होणारे लगत गटांमध्ये एकमेकांच्या हद्दी जाणे अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे, इ. (overlap, gap, etc.) यासारखे वाद/तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मोजणी प्रकरणांचे जी. आय. एस. आधारीत मोजणी नकाशे पुरविताना अक्षांश व रेखांशासह नागरीकांना मोजणी नकाशा पुरविण्यास तसेच सदर मोजणी नकाशे अक्षांश व रेखांशासह भूमि अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
भूमि अभिलेख विभागाकडून धारकांच्या जमिनीचे हद्दकायम, पोटहिस्सा, सामिलीकरण, बिनशेती, कोर्टवाटप व कोर्टकमिशन व विविध प्रकल्पांकरीता भूमि संपादन इत्यादी विविध प्रकारच्या मोजणीचे काम करुन मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पुरविण्यात येते.
त्यासाठी ज्या मोजणी प्रकरणांमध्ये जमीन मोजणीसाठी जी.आय.एस.आधारीत जी.एन.एस.एस. रोव्हर्स व इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशिन इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशावर अक्षांश व रेखांश नमूद करून ‘क’ प्रत उपलब्ध करून देणे व सदर मोजणी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग शासन निर्णय:
जी.आय.एस.आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशांवर अक्षांश व रेखांश नमूद करून क प्रत उपलब्ध करून देणे व सदर मोजणी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिध्द करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!