भोगवटादार वर्ग-२ मधल्या कोणत्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर होत व होत नाही?
आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर जमीन कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते, ते नमूद केलेले असते. त्यामध्ये भोगवटादार वर्ग-1, भोगवटादार वर्ग-२, शासकीय पट्टेदार, व महाराष्ट्र शासन असे जमीन भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार आहेत. आपण या लेखात भोगवटादार वर्ग-२ मधल्या कोणत्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर होत नाही? व कोणत्या प्रकारच्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतर करता येतं? अर्ज कसा कराचा कागदपत्रे काय लागतात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
भोगवटादार वर्ग-२ मधल्या कोणत्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर होत व होत नाही?
भूधारणा पद्धतीचे प्रकार:
शेतजमिनीची भूधारण पद्धती मध्ये (भोगवटादार वर्ग १ किंवा वर्ग २ किंवा शासकीय पट्टेदार/महाराष्ट्र शासन) नमूद केली जाते.
१) भोगवटादार वर्ग-1:
या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वतः असतो. अशा जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्हणतात. ( भोगवटादार – वर्ग १ ची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(२) मध्ये नमूद आहे.)
२) भोगवटादार वर्ग-2:
ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वतः नसतो. अशा जमिनीचे हस्तांतरण करण्याचा हक्कावर शासनाचे निर्बंध असतात. अशा जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर काही निर्बंध /अटी असतात. आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी आणि काही सोपस्कार पूर्ण करण्याची आवश्यकता असते. अशा शेतजमिनीला दुमाला किंवा नियंत्रित सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असेही म्हणतात. ( भोगवटादार – वर्ग २ ची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(३) मध्ये नमूद आहे.) भोगवटादार -२ ची नोंद गाव नमुना क्रमांक एक क मध्येही केली जाते.
३) शासकीय पट्टेदार:
शासकीय पट्टेदार म्हणजे ज्यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्यासाठी भाडेतत्वावर जमीन देण्यात आली आहे असे शेतकरी. ( शासकीय पट्टेदार व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम २(११) मध्ये नमूद आहे.) या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वावर दिल्या जातात.
४) महाराष्ट्र शासन:
या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
गाव नमुना १-क (भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनी):
गाव नमुना १-क नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते. सुधारित गाव नमुना १-क (भोगवटादार वर्ग दोन म्हणून मंजूर केलेल्या जमिनी आणि ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या जमीनी यांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.
भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचे प्रकार:
भोगवटादार वर्ग-2 मध्ये खालील प्रकारच्या जमिनींचा समावेश होतो. आता या जमिनी कोणत्या आहेत आणि त्यांची नोंद गाव नमुन्यात कुठे असते ते पाहूया.
- गाव नमुना १ क (१) मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी
- गाव नमुना १ क (२) विविध इनाम व वतन जमिनी ( देवस्थान जमिनी वगळून )
- गाव नमुना १ क (३) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये, विविध योजनांतर्गत प्रदान / अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी (भूमिहीन, शेतमजूर, स्वातंत्र सैनिक इ.)
- गाव नमुना १ क (४) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये विविध योजनांतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी ( गृह निर्माण संस्था, औद्योगिक अस्थापना, शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.
- गाव नमुना १ क (५) महाराष्ट्र शेत जमीन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी (सिलिंग कायदा).
- गाव नमुना १ क (६) महानगरपालिका, नगर पालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरेचरणे अथवा इतर प्रयोजनांसाठी वर्ग केलेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (७) देवस्थान इनाम जमिनी.
- गाव नमुना १ क (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम ३६ अ अन्वये आदिवासी खातेदारांच्या जमिनी.
- गाव नमुना १ क (९) महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम १६ अन्वये प्रदान केलेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (१०) भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी.
- गाव नमुना १ क (११) भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (१२) महाराष्ट्र खाजगी वने ( संपादन ) अधिनियम १९७५ तसेच महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम १९६१ अन्वये चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (१३) भूमिधारीं हक्कान्वये प्राप्त झालेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (१४) महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम १९६१ अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (१५) भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी.
- गाव नमुना १ क (१६) वक्फ जमिनी.
सूचना: 15 मार्च 2021 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे 2 प्रकारच्या जमिनी यामध्ये समाविष्ट केल्या आहेत, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कोणत्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर होत व होत नाही?
भोगवटादार वर्ग-2 मधील 16 जमिनींपैकी काही जमिनींचं म्हणजेच सिलिंगच्या जमिनी, महानगरपालिका, नगर पालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी, देवस्थान इनाम जमिनी, आदिवासी खातेदारांच्या जमिनी, खाजगी वने (संपादन) अधिनियम अन्वयेच्या जमिनी, सिलिंग अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी, भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी व वक्फ जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्याची अजून तरी कायद्यात तरतूद नाहीये.
या व्यतिरिक्त भोगवटादार वर्ग-2 मधील बाकी जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अर्जदार, खातेदार, संस्था यांनी संबंधीत तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिमूल्याच्या रकमेचा भरणा करुन सुधारित अधिसूचनेनुसार तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज करावा.
जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अर्जाचा नमुना:
भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज खालील प्रमाणे करावा, किंवा सुधारीत नमुना तहसील कार्यालयातून घ्यावा.
मा. महोदय,
मी, अर्जदार नामे ———(अर्जदाराचं नाव)
राहणार ——–(गावाचं नाव)
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग – 1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, २०२३ अन्वये खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे.
- जमीन धारकाचे नाव:-
- जमीन धारकाचा संपूर्ण पत्ता:-
- जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:-
- जमीन धारकाला जमीन प्रदान करण्यात आलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक:-
- जमीन धारकाला प्रदान करण्यात आलेली जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्टयाने?-
जमिनीचा तपशील
गावाचे नाव…………. तालुक्याचे नाव ………………….जिल्ह्याचे नाव
अनुक्रमांक … भूपामन क्रमांक…………. जमिनीचं क्षेत्र
उपरोक्त जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, २०२३ अन्वये भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेकामी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे.
सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्य शासनास अदा करण्यास मी तयार आहे. कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करून मिळावी.
वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.
ठिकाण आणि दिनांक …………………………….. अर्जदाराची सही ……………………………..
कागदपत्रे कोणती लागणार?
भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचं 1 मध्ये रुपांतर करण्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रं लागतात. सविस्तर माहितीसाठी व अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा तहसील कार्यालयात संपर्क साधा.
- संबंधित जमिनीचे गेल्या 50 वर्षांतील सातबारा उतारे
- या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी
- चतु:सीमा दाखवणारा नकाशा
- आकरबंदाची मूळ प्रत
- एकत्रीकरणाचा मूळ उतारा
- मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत
- तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा
शासन निर्णय व तलाठी कार्यालयातील गाव नमुना:-
- महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 (सुधारणा) अधिनियम 2023 अन्वये कलम 28-1 अअ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- ब-सत्ताप्रकार अथवा अन्य कोणताही सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतरण करणेबाबतचा नवीन शासन निर्णय-2021 पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर बाबत शासन निर्णय जारी – २०२४!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!