कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी – Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana
ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वावर आधारीत स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोरोना (कोविड -१९) विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात राज्यात ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबांमधील कर्त्या पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्या कुटुंबांतील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा कुटुंबांतील महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांची उपजीविका सन्मानजनक व्हावी या उद्देशाने त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे.
वीरभद्रकाली ताराराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सिध्द करत स्वत: चे शौर्य सिध्द केले होते. अशा वीरभद्रकाली ताराराणी यांचे नावाने राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला आहे, त्या कुटुंबांमधील एकल (विधवा) महिलांसाठी उत्पन्नांची साधने निर्माण करून त्यांना सन्मानजनक उपजीविकेचे साधन व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना:
ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना या विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात ज्या कुटुंबांमधील कर्त्या पुरुषांचा मृत्यु झाला आहे व जी कुटुंबे जोखीमप्रवण झालेली आहेत, त्या कुटुंबांना सन्मानपुर्वक जीवन जगता यावे, यासाठी त्या कुटुंबांमधील एकल (विधवा) महिलांना उत्पन्नाची साधने निर्माण व्हावी व त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्या माध्यमातून त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरु राहावी यासाठी “वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा” ही योजना शासनाच्या विविध योजनामध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल (विधवा) झालेल्या माहिलांसाठी आर्थिक समावेशन विषयक उपक्रम राबविणे.”
१) जिल्हा स्तरावरुन गावनिहाय माहिती प्राप्त करून घेऊन एकल/विधवा महिला गावामध्ये असतील व स्वयंसहाय्यता समुहामध्ये समाविष्ट नसतील तर अशा महिलांना प्रथम प्राधान्याने समुहामध्ये समाविष्ट करण्यात यावे. तसेच रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीनुसार (RBI / 2021-22 / 05 FIDD.GSSD.CO.BC.No. 04 / 09 / 01 / 01 / 2021 22 April 01 , 2021 ) विशेष बाब म्हणून एकल/विधवा महिलांचा किमान पाच अशा महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समुह (दहा सदस्य असण्याची अट शिथिल करुन) विशेष स्वयं सहाय्यता समूह (Special SHG) स्थापन करून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करुन देण्यात यावेत.
२) जिल्हास्तरावरुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधी अदा करण्यात येतो. सदर समुहामध्ये एकल/विधवा महिला समाविष्ट असतील तर अशा स्वयं सहाय्यता समुहांना प्रथम प्राधान्याने फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधी अदा करण्यात यावा. संबंधित स्वयं सहाय्यता समूहाने त्यांच्या समूहातील एकल/विधवा महिलेस प्राधान्याने वरील निधी अदा करताना प्राधान्य द्यावे.
३) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहातील सदस्यांना व त्यांच्या कुटूंबियांना विविध सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट करुन घेण्यात येते.. सामाजिक सुरक्षा योजनामध्ये (PMJJBY, PMSBY, APY) एकल/विधवा महिलांना प्रथम प्राधान्याने समाविष्ट करण्यात यावे. यामध्ये एकल व विधवा महिलांना PMJJBY व PMSBY योजनेचे रु.३४२/- निधी भरण्यास आर्थिक अडचणी असल्यास स्वयंसहाय्यता समुहामधील उपलब्ध निधीतून सदर महिलांना रु. ३५०/- चे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुर्देवाने काही घटना घडल्यास जिल्हास्तरावरुन सदर महिलांना लवकरात लवकर दाव्याच्या रक्कमेचा (Claim) लाभ होण्यासाठी त्या एका प्रकरणासाठी एका समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) ची अथवा तत्सम संवर्गातील महिलेची विशेष नियुक्ती करण्यात यावी व त्या संबंधीत प्रकरणी बँकेशी समन्वय करुन दाव्याची रक्कम (Claim) अंतिम करुन देण्यात यावी.
४) एकल/विधवा महिलांना प्रथम प्राधान्याने आरोग्य विमा योजनेचा लाभ प्राप्त होण्याकरिता पात्र महिलांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
५) एकल/विधवा महिला ज्या स्वयंसहाय्यता समुहामध्ये आहेत अशा समुहांना प्रथम प्राधान्याने बँक पतपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच स्वयंसहाय्यता समुहांच्या बँक पतपुरवठाबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सर्व बँकांना तसे निर्देश घ्यावेत व पतपुरवठ्याचा नियमित आढावा घ्यावा.
कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल (विधवा) झालेल्या महिलांना जोखीम प्रवणता निधी (Vulnerability Reduction Fund) प्राधान्याने वितरीत करणे.
‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात ग्रामसंघामार्फत स्वयंसहाय्यता समूहातील (SHG) व अत्यंत गरजू, जोखीम प्रवण कुटुंबांचे आरोग्य, शिक्षण, अन्न सुरक्षा इ. कारणासाठी जोखीम प्रवणता निधी (VRF) देण्याची सुविधा आहे. राज्य शासनाने ‘उमेद’ अंतर्गत निर्गमित केलेल्या मार्गदर्शिकेत नमूद निकषानुसार पात्र असणाच्या ग्रामसंघास VRF निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ग्रामसंघांतर्गत कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल (विधवा) झालेल्या महिलांना जोखीम प्रवणता निधी प्राधान्याने वितरीत करण्यात यावा. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व तालुका यंत्रणेने याबाबत सनियंत्रण करावे. –
रोजगार व स्वरोजगारांच्या संधी एकल (विधवा) महिलांना प्राधान्याने उपलब्ध करुन देणे.
१. दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDUGKY)
दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षणे राबवितांना, महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील १८ ते ४५ वयोगटातील एकल (विधवा) महिलांना आणि त्या कुटुंबातील १८ ते ३५ वयोगटातील युवक – युवती यांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या (DDUGKY) माध्यमातुन कौशल्य विषयक निवासी प्रशिक्षण देतांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. संख्या असल्यास विशेष बॅच तयार करुन देखील प्राधान्याने निवासी प्रशिक्षण देण्यात यावे.
२. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI)
आरसेटी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील १८ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना स्वयंरोजगार आधारीत १० ते ४५ दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादन विषयक प्रशिक्षण व सामान्य उद्योजकता प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे (शेती व बिगर शेती) मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याना उद्योगव्यवसाय सुरु करणेसाठी बँकांमार्फत कर्जपुरवठा करणेसाठी सहाय्य केले जाते. सदर प्रशिक्षणे राबवितांना महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटूंबातील एकल (विधवा) महिलांना ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या (RSETIs) माध्यमातुन स्वयंरोजगार आधारीत प्रशिक्षण देतांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पुरेशी संख्या असल्यास विशेष बॅच तयार करुन देखील प्राधान्याने निवासी प्रशिक्षण देण्यात यावे.
३. उन्नती योजना:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत किमान १०० दिवस काम केलेल्या लाभार्थ्यांकरीता केंद्रशासनाने उन्नती योजना सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०१८ ते २०१९ या कालावधीत किमान १०० दिवस काम केलेल्या १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थ्यांना दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDUGKY), ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETIs) तसेच कृषि विज्ञान केंद्रांच्या (KVK) माध्यमातुन कौशल्य विषयक प्रशिक्षण देवुन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील. सदर योजनेंर्गत लाभार्थ्यांना उपस्थिती भत्ता देखील अदा केला जातो. सदर प्रशिक्षणे राबवितांना महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटूंबांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करून पात्र असणाऱ्या एकल (विधवा) महिलांना उन्नती योजनेच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार आधारीत प्रशिक्षण देतांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पुरेशी संख्या असल्यास विशेष बॅच तयार करून देखील प्राधान्याने निवासी प्रशिक्षण देण्यात यावे.
अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एकल (विधवा) महिलांना प्राधान्य देणे:
केंद्रशासन सहाय्यीत Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises (PMFME) योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगात समाविष्ट अभियानातील स्वयं सहाय्यता समूह/स्वयं सहाय्यता गटातील सदस्य/उत्पादक गट यातील महिला सदस्यांना छोटी उपकरणे व खेळते भांडवल याकरीता प्रती सदस्य रु.४०,०००/- बीज भांडवल देण्यात येते. सदर योजनेचा लाभ प्राधान्याने कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटूंबातील महिला ज्या अन्न प्रक्रिया उद्योगात पुर्वीपासून समाविष्ट आहेत अशांना प्राधान्याने द्यावा. सदर उद्योजक महिलांचे जिल्हास्तरावरुन सर्वेक्षण करून त्या महिलांना वैयक्तीक संपर्क करुन इच्छूक व पात्र महिला सदस्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने पोर्टल वर नोंदणी करण्यात यावा जेणेकरुन पात्र महिलांना बिज भांडवल देणे सुलभ होईल. यासाठी यापुर्वीच निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्यात यावा.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय: राज्यात कोरोना (कोविड-19) जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने एकल (विधवा) झालेल्या महिलांना ग्रामविकास विभागातर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांमार्फत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देऊन त्यांना सन्मानजनक उपजीविका उपलब्ध होण्यासाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबविणेबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!