गावचा सरपंच कसा असावा ?
सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करायची की थेट गावातील मतदारांतून हा प्रश्न निवड प्रक्रियेपुरता असू शकतो. मात्र, कोणत्याही प्रकारे निवड झालेला सरपंच कसा असावा, याचाही विचार केला पाहिजे. सरपंच सदस्यांनी निवडलेला असो की गावाने, तो गावाचा विचार करणारा असला पाहिजे आणि गावही सरपंचाला साथ देणारे असले पाहिजे. केवळ निवड प्रक्रियेत बदल करून हे साध्य होऊ शकेल काय?
गावचा सरपंच कसा असावा ?
‘खेड्यांचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात एकूण ६,४९,४८१ गावे आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातील गावांची संख्या ६३,६३३ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५.५३% लोकं गाव-खेड्यात राहतात. त्यामुळे, आजही बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात. म्हणजे भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही आहे. त्यामुळे खरा भारत हा खेड्यातच राहतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रात बरीच प्रगती केली. शहरांची झपाट्याने प्रगती झाली. आज स्वतंत्र मिळून ७३ वर्षे उलटून गेली. मात्र, देशातील गाव-खेडी आजही ओस पडलेली, उदास, भकास, सोयी-सुविधांचा अभाव असलेली का दिसून येतात? हा खरचं मोठा प्रश्न आहे.
गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थानांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव. आपल्या गावचा सर्वांगणी विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, कित्येक काळापासून गावावर राज्य करण्याऱ्या गाव गावपुढारींने ते केले नाही किंवा त्यांना करता आले नाही. आज देखील गावा-गावात सरपंच पदाची घराणेशाही दिसून येते. ही चांगली गोष्ट नाही. निवडणूक तर फक्त नावाची होत असते. ‘राजनीतीत’ राहून ‘राजकारण’ खेळण्यात ते उत्तम पटाईत झालेले असतात. ‘गावाचा विकास’ त्यांनी स्वतःच्या बँकखात्यात जमा करून ठेवलेला असतो. काही जण सरपंचपद ते मंत्रीमंडळ अशी राजकीय कारकिर्दी सुरू करण्यासाठी या क्षेत्रात उतरत असतात. अश्यांना गावाच्या विकासाशी काहीही घेणं देणं नसतं. त्यात गावाचं नुकसानच होत असतं. हेच चक्र वर्षांनू-वर्षे पुढे चालत आलेले असतं. अश्याने पुढील शंभर वर्षे जरी उलटली तरी गावाचं चित्र काही बदलणार नाही. त्यासाठी एक जिद्द आणि चिकाटी असलेलं सक्षम नेतृत्व गावात असायला हवं. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीला पहिल्यापेक्षा अधिक बळकटी मिळाली आहे. सरपंचाला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीप्रमाणे अधिकार प्राप्त झाले आहेत. यात अजिबात अतिशोयक्ती नाही. पण सरपंचाला स्वतःच्या अधिकारांची माहिती नसते. काहींना ते अधिकार माहित असेल तरी त्यांना उपयोगात आणत नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात ते सक्षम नसतात.
सरपंचने ठरवलं तर आपल्या छोट्याश्या राज्याला (गावाला) नंदनवन बनवू शकतो. मात्र सर्वप्रथम त्याने तसे ‘ठरवणे’ महत्वाचे आहे. अर्थातच हे वाटतं तितकं सोप्पही नसतं. गावातील समाज, जात, वाडी, गावकी, भावकी आणि मानपान इत्यादी अनके कटकटी, अडचणी असतात. या सर्वांवर मात करून, ग्रामोउन्नतीचा ध्यास ठेवून वाटचाल केली तर नक्कीच मार्ग सापडतो. त्यासाठी सरपंचाला तलाठी, ग्रामसेवक किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यामागे हाजी हाजी करत बसायची गरज नाही. आपले अधिकार गाजवून तो गावासाठी खूप काही करू शकतो. राज्यात अशी अनके नंदनवनं फुलली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पाटोदा गाव, हिवरे बाजार व राळेगणसिद्धी अश्या आदर्श गावांचा उल्लेख करता येईल. त्या गावातील सरपंचानी अनके प्रश्न, अडचणीना सामोरे जात आपल्या गावाचं नाव लोकांसमोर ‘आदर्श गाव’ म्हणून ठेवलं. अश्या सरपंचाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपापली गावे विकासपथावर नक्कीच आणता येतील.
१) आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील:
औरंगाबाद जिल्हयातील पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना आज महाराष्ट्रातील प्रत्येक गाव-खेडे ओळखतात. स्वतःच्या गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेले सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्तीमत्व. गावात विज, पिण्यायोग्य पाणी, चांगले रस्ते, उत्तम शिक्षण आणि आरोग्य या पाच गोष्टींवर त्यांनी भर दिला. गावातील लोकांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम गावात राबवले. उच्चशिक्षीत नसले तरीही, त्यांची इच्छाशक्ती मात्र प्रचंड होती. त्यांनी सर्व अडचणीवर मात करीत एक आदर्श गाव निर्माण केले. गावात राबवलेल्या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात.
मोफत पिठाची गिरणी:
ग्रामपंचायतीला घरी टॅक्स मागायला जायची गरज पडत नाही. वर्षाकाठी ९०% ते ९५% कर वसुली होते. ग्रामपंचायततर्फे गावात धान्य दळण्यासाठी मोफत पिठाच्या २ गिरण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या अभिनव उपक्रमाचा लाभ, कर भरणारे प्रत्येक कुटुंब घेत असुन त्यांना वर्षभर मोफत दळुन दिले जाते.
वाढदिवस उपक्रम:
ग्रामपंचायतीद्वारे गावातील प्रत्येक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा, त्यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात येतो, एक वृक्षरोप देऊन वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात येते.
सी.सी.टी.व्ही कॅमेरे:
गावात शाळा, कार्यालय व महत्वाच्या ठिकाणी एकुण ३२ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सी.सी टी व्ही कॅमेरामुळे नोकरवर्गावर नियंत्रण ठेवले जाते तसेच गावातील प्लॉस्टिक बंदी, गुटका बंदी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व गावाची सुरक्षा करीता मदत होते.
सामुहिक भोजन उपक्रम:
प्रत्येक महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी संपुर्ण नागरिकासांठी समुह भोजनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येतं. हा उपक्रम गावात वर्षभर राबविण्यात येतो.
कचरा व्यवस्थापन:
गावातील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी २ कचरा कुंड्याची व्यवस्था ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे. कचरा संकलित करुन कचऱ्यापासुन कंपोस्ट खत तयार करण्यात येते.
सौर दिवे व बायोगॅस:
गावात विविध ठिकाणी १५ सौर दिवे लावण्यात आले. बायोगॅसचे एकुण ११ प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत. त्यापैकी बायोगॅसचे २ प्रकल्प शौचालयाला जोडण्यात आले.
वटवृक्ष आणि महिला:
वटपोर्णिमेनिमित्त गावातील महिलांना वटवृक्षाच्या रोपट्यांची ग्रामपंचायतकडुन भेट देण्यात येते तसेच, महिला बचत गट आणि विविध प्रशिक्षणाचा लाभ महिलांना देण्यात येतो.
यासारखे अनके उपक्रम गावात राबवून त्यांनी गावाला स्वयंपूर्ण बनवले.
२) आदर्श सरपंच पोपटराव बागूजी पवार:
अहमदनगर जिल्हयातील हिवरे बाजार गावाचे सरपंच पोपटराव पवार यांना आज महाराष्ट्रातील प्रत्येक गाव-खेडे ओळखतात. शिक्षण एम. कॉम पर्यंत झालेलं. १९७२ मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळात गावातील शेती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. लोकांकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन शिल्लक नव्हते. बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आणि त्यातून अनेक लोकांना दारूचे व्यसन जडले. १५ वर्षे हे सर्व हिवरे बाजार हे गाव सहन करीत होते मात्र यातून कोणीही मार्ग काढायला तयार नव्हते. १९८९ साली पोपटराव पवार हे गावचे सरपंच झाले. त्यांच्या डोक्यात सतत गाव सुधारण्याच स्वप्न होते. आणि त्या स्वप्नाने ते पूर्णतः झपाटून गेले होते. योग्य नियोजन आणि गावाचा विकास आराखडा तयार करून त्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात आणले. गावात झाडे तोडण्यावर बंदी करून वृक्षारोपणावर भर दिला. त्यामुळे गावातील नैसर्गिक सौंदर्य जपले गेले.
व्यसनमुक्ती:
गावात पूर्णतः दारूबंदी केली. त्यामुळे गावातील कौटुंबिक जीवनातील कलह कमी झाला.
अतिक्रमण:
आपली जमीन, गावाबाहेरच्या परक्या माणसाला विकायची बंदी केली. त्यामुळे परकीय अतिक्रमण आटोक्यात आले.
प्राथमिक शिक्षण:
प्राथमिक शिक्षणावर ग्रामपंचायतीने मोठा भर दिला आहे. त्यामुळे गावात १००% ने साक्षरतेचे प्रमाणे वाढले.
भूजल संधारणाची कामे:
श्रमदानातून भूजल संधारणांच्या कामांमुळे, गावात भूजल पातळी वाढली आणि गाव पाणीदार झाले. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाला गती मिळाली.
रोजगार निर्मिती:
गावात व्यवसाय-उद्योगांना चालना देऊन, रोजगार निर्मिती केली. यामुळे रोजगार लोकांचे स्थलांतर थांबले व गावाचे दरडोई उत्पन्न वाढले. एवढेच नव्हे तर, शहरात स्थलांतरित झालेली लोकं जन्मभूमीत परतले.
आज या गावाचं मॉडेल महाराष्ट्रातील जवळपास १००० गावामध्ये महाराष्ट्र सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.
वरील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की, पोपटराव पवार उच्च शिक्षित होते मात्र भास्करराव पेरे पाटील जास्त शिकलेले नाहीत. तरीही दोघांनी आपापली गावे आदर्श करून दाखवली. गावच्या विकासासाठी सरपंच किती शिकलेला आहे याला फारसं महत्त्व नाही. परंतु तो किती कार्यक्षम आहे? लोकांच्या समस्यांची त्याला किती जाणीव आहे? आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तो किती सक्षम आहे? या गोष्टी महत्वाच्या आहेत. एखाद्या गावाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरपंचाला प्रामुख्याने स्वतःच्या गावाबद्दलची आपुलकी, दृढ निश्चय, प्रचंड इच्छाशक्ती, कमालीची जिद्द आणि योग्य नियोजन या पाच पैलूंची आवश्यकता असते.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या,सदस्य,पँनल प्रमुख कसा असावा,कसा नसावा:
1) गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजनारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा.
2) गावचा होणारा सरपंच सदस्य हा गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.
3) जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासन कडून दोन टँकर असताना गावात एकच टँकर कधी तरी टाकणारा वरून उपकाराची भाषा करणारा नसावा कारण ते त्याचे कर्तव्य आहे.
4) गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयोग निधी सर्व मिळून म्हणजे सरपंच,ग्रामसेवक,आणि स्वयंघोषित लोकल नेते,आदी जन वाटून खाणारे नसावे पुन्हा गाववाल्यांना माहीत झाल्यावर आम्ही पैसे देतो म्हणून पुन्हा पैसे बुडवणारे लबाड नसावा.
5) शासनाचे स्कीम लाभार्थींना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारे नसावा उदा,घरकुलासाठी पाच दहा हजार रुपये घेऊन पार्टी करणारा नसावा.
6) मनरेगा मधून मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थीकडून दहा पंधरा हजार घेणारा नसावा.
7) दारिद्रय रेषेत नाव घालण्यासाठी दोन हजार रुपये घेणारा नसावा.
8) ग्रामपंचायत सदस्य/सदस्या आपल्या वार्ड तील समस्याची जाणीव असणारा असावा आणि पोटतिडकीने कामे करणारा असावा.
9) गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा.
10) लोकांना खोटी आश्वासने देऊन लोकांना नोकरी लावतो.अडचणीच्या काळात पैसे देऊन व्याज उकळणारा आदी मार्गाने लुबाडणूक करून लोकांची दिशाभूल करणारा नसावा.
11) गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलणारा आणि शाळेतील मुख्याध्यापला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा.
12) सर्वात महत्वाचे म्हणजे गावासमोर आमचे भांडण आहे असे दाखवून गावासाठी आलेले पैसे वाटून खाणारा नसावा.
13) गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा तर नकोच उदा भावाला एक पद, बायकोला एक पद, चुलत भावाला एक पद,स्वतःला अनेक पदे, आणि सब माल अंदर सगळं मलाच पहिजे अशी भावना असणारा नसावा.
14) गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा.
15) सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर त्याच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा.
16) ग्रामपंचायत सदस्य हा गावातील वॉर्डातील घनकचरा, गटारी ,रस्ते पाणपुरवठा यांचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा. ना दारू पिऊन धाब्यावर बसवून गावच्या विकासाच्या चर्चा करणारा.
17) कायम वर वर गोड गोड गप्पा मारून हात हलवून फसवनारा तर अजिबात नसावा.
18) जवळच्या व्यक्तीची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा.
19) सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पँनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पँनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा.
20) सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा असावा.
21) पँनल प्रमुख गावात राहणारा असावा गावातील कोणत्याही संस्थाच्या निवडणूका आल्यावर गावात येणार नसावा आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या पाय पडणारा नसावा.
22) ग्रामस्थांनो जर का वरील गुण तुमच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, पँनल प्रमुख यांच्यात दिसले नाहीत तर तुमच्या गावाच्या विकासाला खिळ बसलीच समजा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!