डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना; सौर ऊर्जा कुंपण योजनेस मंजुरी
गावातील नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास साधून त्यांची उत्पादकता वाढविणे, गावक-यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे व गावक-यांच्या सहभागातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच वन व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे व या माध्यमातून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या सीमेच्या २ कि.मी. आतील संवेदनशील गावांमध्ये संदर्भ -१ च्या शासन निर्णयानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजना सुरु करण्यात आली.
या योजनेस गावक-यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून सदर योजनेची व्याप्ती वाढवून वन्यप्राणी भ्रमण मार्गातील गावे, ग्रामवन असलेली गावे व संरक्षित क्षेत्रामधून पुर्नवसीत गावे यांचा सदर योजनेत संदर्भ क्र. २ चे शासन निर्णयानुसार समावेश करण्यात आला. सदर योजने अंतर्गत वनाशेजारील गावातील १००% कुटुंबांना स्वयंपाक गॅस (LPG) पुरवठा करण्याची अतिरिक्त बाब संदर्भ क्र. ३ चे शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आली. तद्नंतर संदर्भ क्र. ४ व ५ च्या शासन निर्णयानुसार सदर योजने अंतर्गत वन्यप्राण्यांकडून शेत पिकाची नुकसानी थांबविण्यासाठी सामुहीक चेनलिंक फेन्सिंग ही बाब समाविष्ट करण्यात आली.
मागील काही वर्षात नवेगांव – नागझिरा व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे गावातील शेतकरी लाभार्थीना प्रायोगिक तत्वावर व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपण देण्यात आले. सदर प्रयोगाचे अवलोकन केले असता सौर ऊर्जा कुंपणाची किंमत लोखंडी जाळीच्या कुंपणाच्या तुलनेत अत्यल्प आहे, तसेच वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्यता कमी आहे आणि हंगाम संपल्यानंतर कुंपण काढून ठेवणे शक्य आहे जेणेकरुन वन्यप्राणी भ्रमणमार्ग पुनश्च सुरळीत होतात. अशा विविध कारणांमुळे सौर कुंपणाचे प्रत्यक्षात फायदे जास्त असून त्याची स्वीकार्यता वाढलेली आहे. सदरचे अनुभवामुळे व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपण देण्याबाबत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजनेत विशेष तरतूद असावी अशी मागणी पुढे येत आहे. लोखंडी जाळीचे कुंपणाचे योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद, त्याकरिता लागणारा निधी व लोखंडी जाळीचे कुंपणाच्या तुलनेत सौर ऊर्जा कुंपणाची उपयुक्तता या सर्व बाबींचा विचार करुन संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रासाद मुखर्जी जन – वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे शासनाचे विचाराधीन होते. त्याअनुषंगाने आता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना; सौर ऊर्जा कुंपण योजना: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे:
सौर ऊर्जा कुंपणाकरीता लाभाचे स्वरुप:
संवेदनशील गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात येईल. निश्चित केलेल्या मापदंडाचे सौर ऊर्जा कुंपण साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यास करण्यात येईल. याकरीता प्रतिलाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या ७५% किंवा रूपये १५,०००/- या पैकी जी कमी असेल त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने उर्वरीत २५ % किंवा अधिकच्या रक्कमेचा वाटा लाभार्थ्याचा राहील.
कार्यान्वयीन यंत्रणा:-
दिनांक ०४.०८.२०१५ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद २.०१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याची कार्यवाही ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत राबविण्यात येईल. ज्या गावात ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तित्वात नसेल तेथे समिती गठीत करावी.
सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्यासाठी संवेदनशील गावांची निवड :
१. सौर ऊर्जा कुंपण ही बाब डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजनेचा एक भाग म्हणून कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याकरीता सद्य: स्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजने अंतर्गत गावांची निवड करण्यासाठीचे निकष या बाबीस लागू राहतील.
२. वनवृत्तनिहाय वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेतपीक नुकसानीच्या मागील तीन वर्षातील गावनिहाय घटनांच्या संख्येच्या अनुषंगाने प्राथम्यक्रमानुसार संवेदनशील गावांची यादी संबंधित मुख्य वनसंरक्षक/वनसंरक्षक (प्रादेशिक/वन्यजीव) हे तयार करतील.
३. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती अनुदानाच्या उपलब्धतेप्रमाणे वनवृत्तनिहाय प्राथम्यक्रमानुसार संवेदनशील गावांची निवड करेल व त्यास शासनाची मान्यता घेईल. समितीची संरचना खालीलप्रमाणे असेल:
अ.क्र. | समिती सदस्य | पदनाम |
1 | प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर | अध्यक्ष |
2 | प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर | सदस्य |
3 | अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पूर्व, नागपूर | सदस्य |
4 | अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई | सदस्य |
5 | अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर | सदस्य |
6 | आयुक्त, कृषि यांनी नियुक्त केलेले संचालक दर्जाचे अधिकारी | सदस्य |
7 | वनसंरक्षक/उप वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन, वन्यजीव) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांचे कार्यालय | सदस्य सचिव |
लाभार्थ्यांचे निवडीचे निकष :
१. सदर लाभार्थीकडे गावातील शेतीचा ७/१२, गाव नमुना ८ अथवा वनहक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील.
२. लाभार्थी हा गावातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. तथापि, एखाद्या व्यक्तीकडे मुद्या क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज असल्यास त्यास ही अट लागू राहणार नाही.
३. ज्या व्यक्तीवर वनगुन्हा नोंदविण्यात आला असेल अशा व्यक्तीस योजनेचा लाभ देय असणार नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या वनपट्टयासंदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्यास सदर योजनेचा लाभ देय राहील.
४. या योजने अंतर्गत वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण अथवा सामुहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवड करण्याची कार्यपध्दती:
१. संवेदनशील गावाची निवड झाल्यावर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती आवश्यक माहिती ग्रामपंचायत सुचनाफलकावर प्रसिद्ध करावी.
२. अर्जदारांनी सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांचेकडे अर्ज करणे आवश्यक राहील.
३. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समितीने अर्जदारांची पात्रता निश्चित केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्फत उपवनसंरक्षक यांचेकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा.
सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे मापदंड (Specification) :
सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे तांत्रिक मापदंड (Technical Specification) निर्धारित करणेसाठी व गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती खालीलप्रमाणे असेल:
अ.क्र. | समिती सदस्य | पदनाम |
1 | प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर | अध्यक्ष |
2 | अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण | सदस्य |
3 | अधिक्षक अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग | सदस्य |
4 | अधिक्षक अभियंता, महावितरण | सदस्य |
5 | प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय | सदस्य |
6 | प्राध्यापक, शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर | सदस्य |
7 | आयुक्त, कृषि यांनी नियुक्त केलेले संचालक दर्जाचे अधिकारी | सदस्य |
8 | अतिरिक्त महासंचालक, महाऊर्जा | सदस्य |
9 | वनसंरक्षक/उप वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन, वन्यजीव) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांचे कार्यालय | सदस्य सचिव |
सदर समितीने सौर ऊर्जा कुंपण साहित्य हे याप्रकारच्या साहित्याकरीता Bureau of Indian Standards मार्फत निश्चित केलेल्या मापदंडानुसार असेल याची खात्री केल्यानंतर साहित्याच्या मापदंडास महाऊर्जा यांचेकडून तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेईल. सौर ऊर्जा कुंपण साहित्य पुरवठा करण्याची कार्यपध्दती:
१. सौर ऊर्जा कुंपण साहित्य खरेदी करण्याची कार्यवाही वनवृत्त स्तरावर खालील संरचनेप्रमाणे गठीत समिती मार्फत करण्यात यावी.
अ.क्र. | समिती सदस्य | पदनाम |
1 | मुख्य वनसंरक्षक/वनसंरक्षक (प्रादेशिक/वन्यजीव) | अध्यक्ष |
2 | उप वनसंरक्षक/उप संचालक/विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक/वन्यजीव) | सदस्य |
3 | सह संचालक, लेखा व कोषागार किंवा जिल्हा कोषागार अधिकारी दर्जाचा अधिकारी | सदस्य |
4 | उद्योग सह संचालक (विभागीय कार्यालय)/प्रतिनिधी | सदस्य |
5 | संबंधित अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण | सदस्य |
6 | तांत्रिक तज्ज्ञ | सदस्य |
7 | वनवृत्त कार्यालयातील विभागीय वन अधिकारी | सदस्य सचिव |
२. खुल्या स्पर्धात्मक इ – निविदा प्रक्रियेची RFP प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) हे मंजूर करतील.
३. उपरोक्त समिती भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन सौर ऊर्जा कुंपणाचे तांत्रिक समितीव्दारे निश्चित करण्यात आलेले तांत्रिक मापदंडानुसार खुल्या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेव्दारे वनवृत्तनिहाय सौर ऊर्जा कुंपणाच्या आवश्यक मात्रेकरीता पुरवठादाराची निवड व दर निश्चित करतील. त्यानंतर संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती गावाकरीता मंजूर मात्रा निवड झालेल्या पुरवठादाराकडून उपलब्ध करुन घेईल.
४. पुरवठादाराची नियुक्ती करण्यापूर्वी शासनाने प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळेत साहित्याची तांत्रिक मापदंडाकरिता तपासणी करण्यात यावी.
५. प्रत्येक सौर ऊर्जा कुंपण साहित्याला unique kit chassis number emboss करण्याची व पाच वर्षापर्यंत साहित्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील.
साहित्य वाटप करण्याची कार्यपद्धती :
१. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्याने उर्वरीत २५% किंवा अधिकच्या रक्कमेचा वाटा समिती कडे जमा करावी.
२. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती नियुक्त पुरवठादाराकडून साहित्याचा पुरवठा करून घेईल.
३. नियुक्त पुरवठादाराकडून पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी समितीद्वारे वन परिक्षेत्र अधिकारी व लाभार्थी यांच्या उपस्थितीत करेल. पुरवठा करण्यात आलेले साहित्य निश्चित करण्यात आलेल्या मापदंडानुसार असल्यास साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येईल. तसेच संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून पुरवठाधारकास पुरवठा केलेल्या साहित्याची रक्कम RTGS/NEFT द्वारे वितरीत करावी.
४. शासनाकडून प्राप्त झालेला निधी गावातील पात्र झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या निधी पेक्षा कमी असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची निवड संबंधित संयुक्त वनव्यवस्थापन समिती/ग्राम परिस्थितीकीय विकास समितीने करावी.
लाभार्थी जबाबदारी :
१. लाभार्थ्यांनी सौर ऊर्जा कुंपणाची देखभाल स्वतः करावयाची असून शेतात पिकं नसताना सौर ऊर्जा कुंपण काढून ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची राहील.
२. या योजने अंतर्गत खरेदी केलेले वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण विकणार नाही, हत्तांतरीत करणार नाही तसेच त्याचा दुरुपयोग करणार नाही व या अटींचा भंग झाल्यास लाभार्थ्यास त्यापुढे वनविभागामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही योजनेचे लाभ देय राहणार नाही ( परिशिष्ट -१ ).
योजनेचे संनियंत्रण व तक्रार निवारण :
१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान धोरण) यांनी योजनेच्या सनियंत्रणासाठी गावनिहाय/समितीनिहाय/वनपरिक्षेत्रनिहाय/वनविभागनिहाय लाभार्थ्यांबाबत परिपूर्ण माहिती उपलब्ध होण्याकरिता माहिती व्यवस्थापन प्रणाली (Database Management System) तयार करावी. तसेच लाभार्थीनिहाय सौर ऊर्जा कुंपणाची नोंदणी महाऊर्जा कडे करण्यात यावी.
२. लाभार्थी तक्रार निवारणाची प्रकिया संबंधित संयुक्त वन व्यवस्थापन समिती/ग्राम परिस्थितीकीय विकास समिती यांच्या माध्यमातून संबंधित वन विभागाकडून प्रचलित पध्दतीनुसार करण्यात येईल.
३. संबंधित वनरक्षक/क्षेत्र सहायक सौर उर्जा कुंपणाची देखभाल व्यवस्थित रित्या होत आहे, याबाबत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या/ग्राम परिस्थितीकीय विकास समितीच्या आढावा बैठकीत खातरजमा करावी.
४. संबंधित सहाय्यक वनसंरक्षक हे गावनिहाय योजनेचे वार्षिक मुल्यमापन करतील.
निधीचे स्रोत :
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजना लेखाशीर्ष (२४०६ ८७११) मधील उद्दिष्ट ५० इतर खर्च अंतर्गत खर्च करण्यात येईल. या व्यतिरिक्त शासनाच्या इतर राज्य योजनांतून, जिल्हा योजनेतून, आदिवासी विकास योजना, विशेष घटक योजना, व्याघ्र प्रतिष्ठान, खासदार व आमदार निधीमधुन तसेच मानव विकास मिशन, CSR, जिल्हा सबलीकरण निधी, जिल्हास्तरीय इतर उपलब्ध स्त्रोतांमधून व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपणाकरिता निधी उपलब्ध करून देता येईल.
योजनेची अंमलबजावणीसाठी कार्यात्मक सूचना:
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपण खरेदी प्रक्रिया, साहित्याचे वाटपाबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), नागपूर हे खुल्या स्पर्धात्मक निविदेव्दारे पुरवठादाराची निवड करताना किंमतीचा वाजवीपणा, वस्तुंचे विनिर्देश, त्यांचा दर्जा तसेच निविदेसाठी पूर्व अर्हतेचे निकष, निविंदा दस्ताऐवजांमधील सर्व अटी व शर्ती इ. बाबींची खातरजमा करण्यासंबंधीचे निकष व त्यांची पूर्तता करण्याबाबत उपाययोजना इत्यादीचा समावेश करुन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यात्मक सूचना निर्गमित करतील.
इतर तरतूदी:
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजने संदर्भात दि.०४.०८.२०१५ च्या शासन निर्णयातील इतर सर्व तरतूदी यापुढेही लागू राहतील. वरील शासन निर्णय वित्त विभाग, नियोजन विभाग, आदिवासी विकास विभाग, पदुम विभाग, कृषि विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांचे सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग शासन निर्णय : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!