श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना – Shravan Bal Seva Rajya Nivrutti Vetan Anudan Yojana
राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना – Shravan Bal Seva Rajya Nivrutti Vetan Anudan Yojana:
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नाव नसलेल्या व रु २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- अशी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/ अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/-, १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये ११००/- व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य ) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/ अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १२००/- अशी करण्यात येत आहे.
६५ वर्ष व ६५ वर्षावरील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा रुपये २००/- आणि ८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून लाभार्थ्यास देण्यात येणा-या दरमहा अनुक्रमे रुपये ४०० व रुपये १००/- अर्थसहाय्यात प्रत्येकी दरमहा रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- ( ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी केंद्र शासनाचे रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- ) तर ( ८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/- ) अशी करण्यात येत आहे.
तसेच दारिद्रय रेषेखालील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- ( केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष या वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/- ), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- ( केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ६००/- ) व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य ) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- ( केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटाकरीता रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये १०००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/- ) अशी करण्यात येत आहे.
पात्रतेचे निकष, अटी व शर्ती:
१. किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
२. वय ६५ व ६५ वर्षावरील.
पात्रतेची अर्हता
कुटुंबाचे नांव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये ५०,०००/- तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता रुपये २१,०००/- पर्यंत असावे.
आर्थिक सहाय्य/निवृत्तीवेतन
(अ) दारिद्रयरषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या व कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु २१०००/- पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना रुपये १०००/- प्रतिलाभार्थी दरमहा अर्थसहाय्य मिळेल. तसेच सदर योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- व १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये ११००/- आणि २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य ) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा रुपये १२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
(ब) दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली ( ६५ ते ७९ वर्ष वयोगट ) रुपये २००/- याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये ८००/- असे एकूण दरमहा रुपये १०००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक) रुपये ५००/- याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये ५००/- असे एकूण दरमहा रुपये १०००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून ( ६५ ते ७९ वर्ष वयोगट ) दरमहा रु .२००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य ) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु. ८००/-, रु. १००/- व रु. १०००/- असे एकूण अनुक्रमे दरमहा रु. १०००/- रु. ११००/- व रु. १२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून ( ८० वर्ष व त्यापेक्षा अधिक ) दरमहा रु. ५००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक ) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु. ५००/- रु. ६००/- व रु. ७००/- असे एकूण अनुक्रमे दरमहा रु. १०००/- रु. ११००/- व रु. १२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
वयाचा दाखला
१) ग्रामपंचायतीच्या/नगरपालिकेच्या/महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इ. पुरावे तपासून ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
२) वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल यांची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नांव, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकिय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकिय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचा दाखला
तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदाराकडून रु.५ /- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार ) ( अर्जाचा नमुना परिशिष्ट- १० मध्ये दिला आहे ) किंवा दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती/कुटूंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षाकित उतारा.
रहिवाशी दाखला
ग्रामसेवक/तलाठी/मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधिन राहून सामावून घेतले जाईल.
एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.
अर्ज मंजूर करण्याची पध्दत:
(१) अर्ज करण्याची पध्दत :
- (अ) अर्जदार आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी निर्धारित केलेल्या अर्जाच्या दोन प्रतीमध्ये, तो रहात असलेल्या भागातील संबंधित तलाठयाकडे अर्ज करील.
- (ब) अ अर्जासोबत लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटींच्या पुष्ठ्यर्थ संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून अशा प्रमाणपत्रांच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळावाव्यात.
- (क) तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करुन अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे, याची सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी व अर्जदाराला विहित नमुन्यात पोच पावती द्यावी. तलाठी यांनी नोंदवही ठेवणे व त्यामध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक राहील.
- (ड) तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्राची छाननी व पडताळणी करुन अर्ज संबंधित तहसिलदार/नायब तहसिलदार यांचेकडे पाठवावेत.
(२) तहसिलदार/नायब तहसिलदार यांच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी :
- (अ) संबंधित तहसिलदार/नायब तहसिलदार यांच्याकडे आलेले अर्ज, प्राप्त तारखेनुसार लावण्यात येतील व त्यांना नोंदणी क्रमांक देऊन एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेण्यात येईल.
- (ब) आलेल्या अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पडताळणी संबंधित तहसिलदार नायब तहसिलदार यांनी करावी व समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार यांनी अर्जदारांची यादी विशेष सहाय्य योजना समितीसमोर प्रत्येक महिन्यास निर्णयासाठी ठेवावी.
- (क) प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समितीने करावी व छाननीनंतर लाभार्थ्यांची निवड समितीने करावी. अशी निवड झाल्यानंतर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सूचना फलकावर लावण्यात यावी.
- (ड) अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कळवावे आणि ज्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत त्यांनाही कारणासह कळवावे.
- (इ) अर्जाच्या छाननीमध्ये सदस्य सचिवांनी नामंजूर करण्याचे प्रस्तावित केलेले, पण समितीने पात्र ठरविलेल्या अर्जाबाबत उप विभागीय अधिकारी (महसूल) पुनर्विलोकन करुन निर्णय घेतील.
- (ई) लाभार्थ्यांची यादी ग्रामसभा/प्रभाग सभेला माहितीसाठी पाठवावी. सदर पात्र तसेच अपात्र अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीच्या व प्रभाग कार्यालयाच्या सुचना फलकावर लावावी. सदर यादीचे वाचन ग्राम सभेत व प्रभाग कार्यालयात करावे. ग्रामसभेने/प्रभाग कार्यालयाने काही व्यक्तींची चुकीची निवड झाली आहे, असे पुराव्यासह कळविल्यास अशा अर्जाची पडताळणी करुन समितीसमोर फेरविचारार्थ ठेवावेत.
- (फ) केंद्र शासनाच्या निकषानुसार वर्षातून दोनदा ग्रामसभेच्या स्तरावर अपात्र लाभार्थी शोध मोहिम घ्यावी.
आर्थिक सहाय्य मंजूर करणे व तिचे वितरण:
आर्थिक सहाय्य समितीमार्फत मंजूर केले जाईल. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांची माहिती दर महिन्यास शासनाला कळविण्यात यावी.
लाभार्थीच्या याद्या :
- (अ) लाभार्थ्यांच्या याद्या तयार करुन अशा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये/नगरपालिकेमध्ये/महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात याव्यात. अशा याद्यांची एक अद्ययावत प्रत ग्रामपंचायत/नगरपरिषद/महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हयातील सर्व योजनांच्या योजनानिहाय लाभार्थी याद्या संगणकीकृत करून ठेवाव्यात. लाभार्थ्यांच्या याद्या लावणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सक्तीचे आहे. याची जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट नोंद घ्यावी.
- (ब) जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या याद्या वेबसाईटवर टाकून त्या वेळोवेळी अद्ययावतकेल्या जातील.
संपर्क: अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय/तलाठी कार्यालय/तहसील कार्यालयात संपर्क साधावा.
हेही वाचा – विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज (Special Assistance scheme)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!