शेतसारा ऑनलाइनही भरता येणार; भूमी अभिलेख विभागाचा प्रकल्प लवकरच राज्यभर!
मनपा प्रॉपर्टी टॅक्सच्या धर्तीवरच आता शेतसारादेखील ऑनलाइन भरता येणार आहे. याची तयारी भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे. या सुविधेमुळे शेती कर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर घरबसल्या भरता येणार आहेत.
या करांच्या वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरोघरी फिरावे लागत होते. तसेच वसुली वेळेवर होत नव्हती. थकीत कराची माहितीही खातेदारांना नसते. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली आहे.
राज्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांमध्ये या सुविधेचा वापर केला जाणार आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील एका गावाचा समावेश होणार आहे. प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरात ही सुविधा उपलब्ध होईल.
शेतसारा म्हणजे काय ?
शेतसारा म्हणजेच जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्ठ भार आहे. इंग्रजांच्या आधीपासून जमिनीवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. पुढे नव-नवी करआकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारला जाणारा हा कर आजही कायम आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते.
अडचण काय ?
शेतीचा कर हा अल्प असल्याने ती वसुली अपेक्षेप्रमाणे होत नाही. थकबाकी मोठी झाल्यावर हा कर मोठा वाटतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या सात-बारा उतारा ऑनलाइन असल्याने तलाठी कार्यालयातही जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसुल होत नाही.
सर्व्हे नंबरनिहाय माहिती:
या सुविधेमुळे सर्व्हे नंबर अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम (जमीन महसूल) किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे. तसेच जमिनींचा अनधिकृत वापर सुरू असल्याची माहिती मिळणार असून, त्याचा दंडही ऑनलाइन भरता येईल.
संगणक प्रणाली अंतिम टप्प्यात भूमि अभिलेख विभागाने ई चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम तीन महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी सांगितले.
अनेक खातेदारांना फायदा
अनेक खातेदार हे शहरात राहतात. तर काही खातेदार नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. त्यामुळे या नागरिकांना आपल्या जमिनींच्या कराची माहिती मिळत नाही व कर जमा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा नागरिकांना आता हा कर भरणे सोयीचे होणार आहे.
हेही वाचा – ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!