निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती
प्रचलित कार्यपध्दती प्रमाणे निवृत्तिवेतनाचे प्रदान संबंधित निवृत्तिवेतनधारकांच्या बँक खात्यांमध्ये करण्यात येत असून सदर बँक खात्यांमधून निवृत्तिवेतनधारक त्यांच्या गरजेप्रमाणे रकमा आहरीत करुन त्यांचा विनियोग करतात. निवृत्तिवेतनधारकांच्या सोयीसाठी शासन निर्णयान्वये निवृत्तिवेतन संवितरणासाठी निवृत्तिवेतनधारकाच्या आणि कुटूंब निवृत्तिवेतनाचे प्राधिकारपत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या वैवाहीक जीवनसाथीदार व्यक्तीच्या नावे संयुक्त बैंक खाते उघडण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.
अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) विकलांगता (Inability) अक्षमता (Disability) इत्यादिंमुळे काही निवृत्तिवेतनधारक किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारक त्यांच्या निवृत्तिवेतनविषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीशः हाताळू शकत नाहीत. अशा निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहीक जीवनसाथीदार हयात असतील, तर उपरोल्लेखित शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेमुळे त्यांना निवृत्तिवेतनाच्या रकमा आहरित करण्यासाठी अडचणी येत नाहीत. तथापि, ज्या निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहीक जीवनसाथीदार हयात नसतील किंवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार (यथास्थिती पती पत्नी) देखील अशाच प्रकारच्या शारीरीक – मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता यामुळे निवृत्तिवेतन विषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील, अशा निवृत्तिवेतनधारकांना मात्र उपरोल्लोखित असमर्थतांमुळे किंवा अक्षमतांमुळे त्यांच्या निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार करतांना अडचणी येत असून, हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. या संदर्भात उचित कार्यवाही करणेबाबत उपोदघातातील नमूद सुनावणीच्या अनुषंगाने मा. उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून देखील निर्देश देण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) – विकलांगता (Inability) – अक्षमता (Disability) इत्यार्दिमुळे निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार करतांना निवृत्तिवेतनधारकांना सामोरे जावे लागत असलेल्या हालअपेष्टा आणि समस्या दूर करण्यासाठी आणि अशा निवृत्तिवेतनधारकांच्या सोयीसाठी प्रचलित विधिसंमत चौकटीमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची आणि त्याबद्दल स्पष्टता करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती शासन निर्णय:
ज्या निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) विकलांगता (Inability) अक्षमता (Disability) इत्यादिंमुळे त्यांच्या निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीशः हाताळणे शक्य होत नसेल, अशा निवृत्तिवेतनधारकांनी उपोद्घातातील नमूद शासन निर्णयान्वये कुटूंब निवृत्तिवेतनाचे प्राधिकारपत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे. त्या वैवाहीक जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करावा.
परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्तिवेतनधारकांचे किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहिक जीवनसाथीदार (यथास्थिती पती / पत्नी) देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादिंमुळे निवृत्तिवेतन विषयक संयुक्त बैंक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार हयातच नसतील, अशा निवृत्तिवेतनधारकांना / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विहित कार्यपध्दती किंवा प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९’ अंतर्गत पालक (Guardian) नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल.
३) भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा विहित कार्यपध्दती :
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘अभिकर्ता बँकांद्वारा शासकीय निवृत्तिवेतनाचे संवितरण’ यासंदर्भात अभिकर्ता बँकांना मुख्य परिपत्रकाद्वारे (Master Circular द्वारे) वेळोवेळी विस्तृत मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या जातात. अलीकडे असे मुख्य परिपत्रक दिनांक ०१ एप्रिल, २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे. उपोदघातातील अनुक्रमांक ३ समोर नमूद भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य परिपत्रकाद्वारे वृद्ध / आजारी / विकलांग / अक्षम निवृत्तिवेतनधारकांद्वारे निवृत्तिवेतनाचे आहरण याबाबत परिच्छेद ७, ८ आणि ९ अन्वये खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे.
” वृद्ध / आजारी / विकलांग / अक्षम निवृत्तिवेतनधारकांद्वारे निवृत्तिवेतनाचे आहरण.
आजारी आणि विकलांग निवृत्तिवेतनधारकांना बँकांमधून निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन काढताना येणाऱ्या समस्यांचे / अडचणींचे निराकरण करण्यासाठी, अभिकर्ता बँका अशा निवृत्तिवेतनधारकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करू शकतातः असे निवृत्तिवेतनधारक, जे इतके आजारी आहेत की ते धनादेशावर स्वाक्षरी करण्यास असमर्थ आहेत / बँकेत प्रत्यक्ष शारीरिकरित्या उपस्थित राहण्यास असमर्थ आहेत.
असे निवृत्तिवेतनधारक, जे काही शारीरिक दोष / अक्षमतेमुळे न केवळ बँकेत शारीरिकरित्या उपस्थित राहण्यास असमर्थ आहेत, किंबहूना धनादेश / पैसे काढण्याच्या फॉर्मवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटविण्यास देखील सक्षम नाहीत.
अशा वृद्ध / आजारी / अक्षम निवृत्तिवेतनधारकांना त्यांची बँक खाती हाताळता यावी यासाठी बँका खालीलप्रमाणे प्रक्रिया अवलंबू शकतातः
जेथे वृद्ध / आजारी निवृत्तिवेतनधारकाच्या अंगठ्याचा किंवा पायाच्या बोटाचा ठसा घेण्यात येईल, तेथे तो एक जबाबदार बँक अधिकारी आणि बँकेला ज्ञात असलेली अन्य एक व्यक्ती अशा दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या समक्ष घेण्यात येईल.
जेथे निवृत्तिवेतनधारक त्याच्या / तिच्या अंगठ्याचा / पायाच्या बोटाचा ठसा देखील उमटवू शकत नाही आणि बँकेत शारीरिकरित्या प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास देखील सक्षम नाही, तेथे धनादेश / पैसे काढण्याच्या फॉर्मवर एक जबाबदार बँक अधिकारी आणि बँकेला ज्ञात असलेली अन्य एक व्यक्ती अशा दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या समक्ष एक ठसा घेतला जाऊ शकेल.
जबाबदार बँक अधिकारी त्याच बँकेमधील आणि प्राधान्याने ज्या शाखेमध्ये निवृत्तिवेतनधारकाचे निवृत्तिवेतन खाते आहे त्याच शाखेमधील अधिकारी असावा.
वर नमूद केल्याप्रमाणे धनादेश / पैसे काढण्याच्या फॉर्मच्या आधारे बँकेतून निवृत्तिवेतनाची रक्कम कोण काढणार आहे, हे बँकेच्या शाखेला अवगत करण्याबाबत देखील संबंधित निवृत्तिवेतनधारक यांना सांगण्यात येईल आणि त्या व्यक्तीची ओळख दोन स्वतंत्र साक्षीदारांद्वारे पटविण्यात येईल. बँकेतून प्रत्यक्ष रक्कम काढणाऱ्या सदर व्यक्तीस तिची स्वाक्षरी बँकेमध्ये सादर करण्यास सांगण्यात येईल.”
परिस्थितीने ग्रस्त निवृत्तिवेतनधारक किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारक उपरोल्लेखित परिच्छेद नमूद प्रचलित सुविधेचा वापर करु शकतील.
‘अभिकर्ता बँकांद्वारा शासकीय निवृत्तिवेतनाचे संवितरण’ यासंदर्भात उपोद्घातातील अनुक्रमांक ३ समोर नमूद भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख परिपत्रक (Master Circular) मधील परिच्छेद ७, ८ आणि ९ अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतूदींचा मूळ इंग्रजी उतारा (Excerpt) सुलभ संदर्भासाठी या सोबत सहपत्र १ म्हणून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
नमूद परिस्थितीने ग्रस्त असलेल्या ज्या निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोल्लेखित प्रमुख परिपत्रक (Master Circular) मधील परिच्छेद ७, ८ आणि ९ अन्वये विहित करण्यात आलेली उपरोल्लेखित कार्यपध्दती अनुसरणे शक्य होणार नाही किंवा सोयीचे ठरणार नाही, अशा निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता – अक्षमता यांचा समावेश अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६’ च्या कलम २ मधील (एस) अन्वये परिभाषित करण्यात आलेल्या बहु विकलांगतेच्या अंतर्गत होत असेल, तर, अशा निवृत्तिवेतनधारकांना / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना ‘प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९’ च्या कलम १४, १५, १६ आणि १७ अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतुदींच्या अंतर्गत ‘पालक (Guardian)’ या व्यवस्थेचा लाभ घेता येईल.
तथापि, प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९’ च्या कलम १४, १५, १६ आणि १७ अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतुदींच्या अंतर्गत ‘पालक (Guardian)’ या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक निवृत्तिवेतनधारकांना / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६’ च्या कलम २ मधील (एस) अन्वये परिभाषित करण्यात आलेल्या बहु विकलांगतेच्या अंतर्गत विकलांगताग्रस्त असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे समुचित प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. याबाबतची कार्यपध्दती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय क्र. अप्रवि-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६ दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आलेली आहे.
प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९’ च्या प्रयोजनार्थ ‘पालक (Guardian)’ म्हणून नियुक्ती (Appointment) आणि निरसन (Removal) याबाबतची कार्यपध्दती प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास नियम, २०००’ मधील नियम १६ आणि १७ तसेच ‘राष्ट्रीय न्यास विनियम, २००१’ मधील विनियम ११, १२ आणि १३ अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतूदींनुसार विनियमित होईल.
सुलभ संदर्भासाठी ‘प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९’ च्या कलम १४, १५, १६ आणि १७ अन्वयेविहित करण्यात आलेल्या तरतूदींचा मूळ इंग्रजी उतारा (Excerpt) या सोबत सहपत्र २ म्हणून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच ‘प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास नियम, २००० मधील नियम १६ आणि १७ आणि राष्ट्रीय न्यास विनियम, २००१’ मधील विनियम १०, ११, १२ आणि १३ अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतूदींचा मूळ इंग्रजी उतारा (Excerpt) देखील सुलभ संदर्भासाठी या सोबत अनुक्रमे सहपत्र ३ आणि सहपत्र ४ म्हणून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
‘पालक (Guardian)’ यांच्या माध्यमातून निवृत्तिवेतन घेण्याच्या सुविधेचा वापर करणा-या निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांच्या संदर्भात अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांनी, निवृत्तिवेतनाची / कुटूंब निवृत्तिवेतनची रक्कम निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर, शासनाची जबाबदारी राहणार नाही. सर्व प्रयोजनासाठी ‘पालक (Guardian)’ यांनी निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांच्या बँक खात्यामधून आहरीत अथवा हस्तांतरीत केलेली रक्कम ही निवृत्तिवेतनधारकाने / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाने आहरीत अथवा हस्तांतरीत केली आहे, असे समजण्यात येईल. ‘पालक (Guardian)’ यांनी निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या बँक खात्यामधून केलेल्या सर्व व्यवहाराची अंतिम जबाबदारी संबंधित निवृत्तिवेतनधारक / कुटूंब निवृत्तिवेतनधारक यांची राहील.
निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन फक्त निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या हयातीतच देय असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती संबंधित ‘पालक (Guardian)’ यांनी यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय तसेच संबंधित बँक यांना विनाविलंब व कोणत्याही परिस्थितीत मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्याचे आत कळविणे बंधनकारक राहील. अशा माहिती अभावी बँक खात्यात निवृत्तिवेतनाची / कुटूंब निवृत्तिवेतनाची रक्कम जमा केली गेल्यास ते अतिप्रदान असेल व सदर अतिप्रदानाची रक्कम परत करण्याची
जबाबदारी ‘पालक (Guardian)’ यांची राहील. तसेच संबंधित निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यूबाबत सूचना प्राप्त झाल्याबरोबर संबंधित बँकेकडून संबंधित बैंक खात्याचे व्यवहार तात्काळ स्थगित करण्यात येतील. निवृतीवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकानंतर माहितीअभावी त्यांच्या बँक खात्यात निवृत्तिवेतनाची रक्कम जमा केली गेल्यास, ते अतिप्रदान असेल व सदर अतिप्रदानाची रक्कम बँकेकडून शासनास परत करणे आवश्यक राहील.
निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यू समयी त्यांच्या बँक खात्यामध्ये शिल्लक असणाऱ्या रक्कमा, अथवा मृत्यू दिनांकानंतर अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांनी अनावधानाने अशा निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा केलेल्या रक्कमा ‘पालक (Guardian)’ यांना आहरित करता येणार नाहीत. मृत निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या बँक खात्यामध्ये मृत्यू समयी शिल्लक असलेल्या रकमा आहरित करण्यासाठी प्रथम यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे ही ‘पालक (Guardian)’ यांची आणि संबंधित बँकेची जबाबदारी राहील. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांचेकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर; अशा रक्कमा प्रचलित पध्दतीनुसार निवृत्तिवेतनधारकाने / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाने नामनिर्देशन केले असल्यास, नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करता येतील आणि नामनिर्देशन केले नसल्यास कायदेशीर वारसदारास रक्कमांचे प्रदान करण्यात येईल.
उक्त कार्यपध्दतीचे पालन न झाल्यामुळे शासकीय रकमांची हानी झाली तर, त्या रक्कमा शासन खाती भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही ‘पालक (Guardian)’ यांची राहील. शासकीय अतिप्रदानाची रक्कम निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या बँक खात्यातून किंवा ‘पालक (Guardian)’ यांच्या नांवे असलेल्या अन्य वैयक्तिक खात्यातून वसूल करण्यात येईल.
मूळ निवृत्तिवेतनधारक / कुटूंब निवृत्तिवेतनधारक आणि ‘पालक (Guardian)’ हे दि.१ मे आणि १ नोंव्हेबर रोजी हयात असल्याचा दाखला यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांना त्या महिन्याचे निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन अदा करण्यापुर्वी म्हणजेच दिनांक १५ मे आणि १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याची जबाबदारी ही ‘पालक (Guardian)’ यांची राहील. ‘पालक (Guardian)’ यांच्या माध्यमातून निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या एकूण निवृत्तिवेतनधारकांपैकी / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांपैकी कमीत कमी एक दशांश (१/१०) निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांच्या बाबतीत ते हयात असल्याची खात्री व्हिडीओ कॉलींग (VC) द्वारे यथास्थिती सहायक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तिवेतन), अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा अपर कोषागार अधिकारी (निवृत्तिवेतन), जिल्हा कोषागार कार्यालय यांचेकडून प्रतिवर्षी न चुकता करण्यात यावी आणि त्याचा अहवाल संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना दिनांक ३१ मे आणि ३० नोव्हेंबर पूर्वी पाठविण्यात यावा.
व्हिडीओ कॉलींग (VC) द्वारे निवृत्तिवेतनधारकाची / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाच्या हयातीची खात्री करण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांनी निवृत्तिवेतन प्रणालीमार्फत यादृच्छिक (Random) स्वरुपात एक दशांश (१/१०) निवृत्तिवेतनधारकांची / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांची निवड करावी. त्यांच्या हयातीच्या तपासणीसाठी ‘पालक (Guardian)’ यांना दिनांक व वेळ कळविण्यात यावी. व्हिडीओ कॉलींग (VC) साठी निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांच्या बाजूने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ‘पालक (Guardian)’ यांची राहील.
जर ‘पालक (Guardian) यांना व्हिडीओ कॉलींगद्वारे (VC) तपासणी करुन घेण्यास अडचणी येत असतील तर, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार / उप कोषागार कार्यालयातील लिपीक / पर्यवेक्षक यांनी निवृत्तिवेतनधारकांच्या / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांच्या घरी जावून निवृत्तिवेतनधारक / कुटूंब निवृत्तिवेतनधारक हयात असल्याची तपासणी करावी. याकरीता रु.५००/- इतके तपासणी शुल्क आणि प्रवास खर्च रु.८/- प्रती किलोमीटर या दराने आकारणी करण्यात यावी. तपासणी शुल्क आणि प्रवास खर्च विषयी लागू असलेल्या रकमेचा भरणा ‘पालक (Guardian)’ यांना करावा लागेल. त्यासंदर्भातील रितसर पावती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार / उप कोषागार कार्यालयाकडून देण्यात येईल. तपासणी शुल्क आणि प्रवास खर्च रक्कम वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक १०११/प्र.क्र. ८८/कोषा प्रशा-५, दिनांक २२ जानेवारी २०१३ मधील नमूद लेखाशिर्षाखाली शासनाच्या प्रचलित नियामप्राणे जमा करण्यात यावी.
निवृत्तिवेतनधारक / कुटूंब निवृत्तिवेतनधारक आणि ‘पालक (Guardian)’ यांचा रहिवासाचा परिपूर्ण पत्ता, संपर्कासाठी ई-मेल, दुरध्वनी क्रमांक विषयक अद्ययावत माहिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार / उप कोषागार कार्यालयास पुरवण्याची प्राथमिक जबाबदारी ‘पालक (Guardian)’ यांची राहील. जर व्हिडीओ कॉलींग (VC) साठी निवडलेल्या निवृत्तिवेतनधारकाचा / कुटूंब निवृत्तिवेतनधारकाचा संपर्क होऊ शकला नाही तर, संबधितांचे निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन संपर्क होईपर्यंत स्थगित करण्यात येईल.
ज्या निवृत्तिवेतनधारकांना / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना ‘पालक (Guardian)’ यांच्या माध्यमातून निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन घेण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी अथवा त्यांचे वारसदार किंवा प्रस्तावित ‘पालक (Guardian)’ यांनी या विषयीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन समुचित प्रस्ताव यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय येथे सादर करावा. सदर प्रस्तावासमवेत खालील कागदपत्रे सादर करावीतः
अ) निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहिक जीवनसाथीदार हयात असल्यास (यथास्थिती पती / पत्नी) वृद्ध / आजारी / विकलांग / अक्षम असल्यामुळे बँक खात्याचे व्यवहार करण्यास सक्षम नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आणि हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र ;
ब) निवृत्तिवेतनधारक बहु विकलांगताग्रस्त असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे समुचित प्रमाणपत्रः
क) ‘प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९’ च्या कलम १३ अंतर्गत गठित स्थानिक स्तर समितीने ‘पालक (Guardian)’ म्हणून नियुक्त केल्याचे प्रमाणपत्र / आदेश :
ड) ‘पालक (Guardian)’ यांचे सहपत्र ५ मधील वचनपत्र;
इ) ‘पालक (Guardian) यांच्या पॅनकार्ड / आधारकार्ड / मतदार ओळखपत्र / वाहन चालक परवाना / पारपत्र इत्यादि पैकी एका ओळखपत्राची छायांकीत प्रतः
सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तिवेतन), अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार अधिकारी यांनी ‘पालक (Guardian)’ यांच्या माध्यमातून निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन घेण्याबाबतच्या प्रस्तावाची छाननी करुन कामकाजाच्या पाच दिवसामध्ये सदर सुविधा वापरण्यास अनुमती देण्याबाबत निर्णय घ्यावा. सदर सुविधा वापरण्याच्या कार्यपध्दतीमध्ये, ‘पालक (Guardian)’ यांचे प्राप्त वचनपत्र आणि नियुक्तीपत्र हे दीर्घकालीन महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने त्यांच्या मूळ प्रती स्वतंत्र नस्तीमध्ये क्रमवार लावून ठेवाव्यात आणि छायांकीत प्रती संबंधीत निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन प्रदान आदेशासोबतच्या कागदपत्रास जोडाव्यात. अशा छायांकीत प्रतींवर मूळ प्रती जतन केल्याचा नस्ती क्रमांक व त्यामधील वचनपत्र आणि नियुक्तीपत्र यांचा संदर्भ नमूद करुन ठेवावा.
‘पालक (Guardian)’ यांच्या माध्यमातून निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांची माहिती निवृत्तिवेतन प्रणालीत संकलीत करण्यात यावी. यासाठी संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी निवृत्तिवेतनवाहिनी प्रणालीमध्ये समूचित सुविधा विकसित करुन घ्यावी.
प्रस्तुत शासन निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात येईल. यासंदर्भात महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील.
प्रस्तुत शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभाग, यांनी त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२०२४/प्र.क्र.६/दि.क.२. दिनांक ०५.०२.२०२४ तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, यांनी त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.०३/२०२४/आरोग्य-६, दिनांक ७ जून २०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
वित्त विभाग शासन निर्णय : अतिवार्धक्यामुळे आणि / किंवा शारीरिक व्याधी आणि दूर्धर आजारांमुळे दूर्बलता – विकलांगता – अक्षमताग्रस्त निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन किंवा कुटुंब निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!