विदयार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या धर्तीवर, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विदयार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna) राबविण्यास दि. ०६.०९.२०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. मा. मंत्रीमंडळाच्या दि. १९.१०.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे, वसतिगृहाच्या लाभापासून वंचित असलेल्या विदयार्थ्यांकरिता लागू असलेल्या विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna) या योजनेकरिता निश्चित केलेल्या निकषामध्ये एकसमानता यावी याकरिता सुधारित प्रस्ताव मा.अ.मु.स (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली दि. ०५.०४.२०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये सादर करण्यात आला. सदर बैठकीमध्ये विद्यार्थ्यांकरीता स्वयंम योजनेच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेले निकष हे विभागाने अर्थसंकल्पीय तरतुद विचारात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेल्या दि. ३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विभागाच्या स्तरावर अंतिम करावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना – Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna:
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु, शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजनेंतर्गत प्रती जिल्हा ६०० याप्रमाणे एकूण २१,६०० विदयार्थ्यांना प्रति वर्षी लाभ देण्यात येईल. त्याकरिता लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावा.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna – पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार, पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येईल.
अ. क्र | खर्चाची बाब | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांसा अनुज्ञेय रक्कम | इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम |
१ | भोजन भत्ता | ३२,००० | २८,००० | २५,००० | २३,००० |
२ | निवास भत्ता | २०,००० | १५,००० | १२,००० | १०,००० |
३ | निर्वाह भत्ता | ८,००० | ८,००० | ६,००० | ५,००० |
प्रती विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च | ६०,००० | ५१,००० | ४३,००० | ३८,००० |
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे निकष:
पात्रता :
१. विद्यार्थी हा मटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा.
२. विदयार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.
३. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
४. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला भटक्या जमाती-क प्रवर्गाचा जातीचा दाखला/ तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिले वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
५. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
६. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
७. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षीक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
८. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बैंक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.
९. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
शैक्षणिक निकष :
१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPAचे गुण असणे आवश्यक राहील. जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर, इयत्ता १२ वी मध्ये प्राप्त गुणांची टक्केवारी विचारात घेतली जावी.
३. सदर योजनेंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७० टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी व ३० टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी असतील.
४. या योजनेंतर्गत निवड केलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
५. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
७. योजनेंतर्गत, तालुकास्तरावर लाभ मंजूर करण्यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्याने इ. १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.
८. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाम अनुज्ञेय राहणार नाही.
९. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
१०. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण विभाग कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
इतर निकष :
१. योजनेचा लाभ १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु, इंजीनिअरिंग / वैदयकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्ष राहील.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही स्वयंम योजनेंतर्गत लाभास पात्र असेल.
४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वयंम योजनेंतर्गत लाभास पात्र असेल, तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
५. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही, उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील, तथापि, उपरोका ५ वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.
६. सदर योजनेतंर्गत, प्रथरा वर्षात प्रवेश पेतलेल्या १५० विदयार्थ्यांना, व्दितीय वर्षात प्रवेश पेतलेल्या १५० विदयार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विदयार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विदयार्थ्यांना अशा रितीने प्रति जिल्हा ६०० विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तदनंतर, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहिल. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्र्तीर्ण विदयार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या व्दितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास व्दितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या-त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे सोबत जोडलेल्या विहित विवरणपत्रात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल.
७. विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा, तसेच, ज्या विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आधार योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वयंम योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल.
८. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
९. सदर योजनेंतर्गत महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल.
१०. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नौकरी / व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.
११. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४% आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा ५०% इतकी राहील, व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे :
१. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
२. स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत)
३. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
४. भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडेपत्र करारपत्र.
५. महाविदयालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
६. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा (वसतिगृहाच्या गृहपालांच्या साक्षांकित प्रतीसह)
निवड प्रकिया:
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यांनी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत.
- सहायक संचालक हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संलग्न (attach) करतील. > पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधीत सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांनी
- संचालक, इतर मागास बहूजन कल्याण संचालनालय, म.रा. पुणे यांच्याकडे विद्यार्थ्यांना अनुदान वितरणासाठी Forward करावेत.
- संचालक, इतर मागास बहूजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी पात्र विद्यार्थ्यांना अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
अनुदान:
सदर योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अनुदान वितरण करण्यात येईल. योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेली भोजन, निवास व निर्वाहभत्त्याची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी. Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna – पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्यात नमूदप्रमाणे वेळापत्रक ठरविण्यात येत आहे.
हप्ता | त्रैमासिक कालावधी | रक्कम जमा करण्याचा कालावधी |
पहिला हप्ता | माहे जून ते माहे ऑगस्ट | ज्या दिवशी विदयार्थ्यांचा / विदयार्थिनीचा ऑनलाईन अर्ज मंजूर होईल, त्यानंतर ७ दिवसामध्ये. |
दुसरा हप्ता | माहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबर | माहे ऑगस्टचा दुसरा आठवडा |
तिसरा हप्ता | माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी | माहे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा |
चौथा हप्ता | माहे मार्च ते माहे मे | माहे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा |
वरील तक्यात नमुद वेळापत्रक हे जरी १२ महिन्यांचा कालावधी दर्शवित असले तरी, प्रस्तूत योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यास एका शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांचा कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील. सदर १० महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांची राहील. तथापि, लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये देय असलेली अनुज्ञेय रक्कम संबंधित विदयार्थ्यांच्या बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. विदयार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल. या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस इतर कोणताही भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाहीस उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परिक्षेचा निकाल १५ दिवसाचे आत देणे बंधनकारक राहील.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
पालकाचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना : पालकाचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शासन निर्णय: भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!