भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर बाबत शासन निर्णय जारी !
महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ (सुधारणा) अधिनियम, २०११ मधील कलम २८-१ (अअ) मधील पोट कलम (३) मध्ये केलेल्या सुधारणेनुसार माजी खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या जमिनीसंदर्भात शासन परिपत्रक क्रमांक आयसीएच- ३४९८/ प्र.क्र.२३/भाग-जी/ल-७, दिनांक ०४/०५/२०१२ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. उक्त मार्गदर्शक सुचनेतील सुचना क्र.९.१ “ज्या पात्र प्रतिग्रहीत्यास (पात्र माजी खंडक-यांस) (यापुढे ज्याचा उल्लेख प्रतिग्रहीता म्हणून असेल) वरील परिच्छेद ३ व ६ नुसार जमिनीचे वाटप करण्यात आले आहे तो सदर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग-१ म्हणून धारण करील.” अशी होती. तद्नंतर उक्त मार्गदर्शक सुचनेतील सुचना क्र.९.१ मध्ये संदर्भ क्र.२ वरील शासन शुध्दीपत्रक क्र. आयसीएच- ३४९८/प्र.क्र.२३/भाग-जी/ल-७, दि.०८/११/२०१२ अन्वये “ज्या पात्र प्रतिग्रहीत्यास (पात्र माजी खंडकऱ्यांस) (यापुढे ज्याचा उल्लेख प्रतिग्रहीता म्हणून असेल) वरील परिच्छेद ३ व ६ नुसार जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, तो सदर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण करील. अशा जमिनी भोगवटादार वर्ग-१ या सत्ताप्रकाराने देण्यासाठी आवश्यक त्या अधिनियमात स्वतंत्ररित्या सुधारणा करण्यात येतील,” असे सुधारीत शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत.
आता, महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ (सुधारणा) अधिनियम, २०२३ अन्वये उक्त अधिनियमामध्ये कलम २८-१ (अअ) मधील पोट कलम (३) खाली नवीन पोटकलम (३-१अ) तसेच पुर्वीच्या पोटकलम (३अ) ऐवजी नवीन पोटकलम (३अ) अतंर्भुत करण्यात आलेले आहे.
सबब, महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ (सुधारणा) अधिनियम, २०२३ मधील कलम २८-१ अअ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने सुधारीत मार्गदर्शक सूचना विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर शासन परिपत्रक:-
अ) महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ (सुधारणा) अधिनियम, २०२३ अन्वये उक्त अधिनियमामध्ये कलम २८-१ (अअ) मधील पोट कलम (३) खाली नवीन पोटकलम (३-१अ) अन्वये माजी खंडकरी शेतकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-२ वरुन भोगवटादार वर्ग-१ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे.
सबब, माजी खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या जमिनीसंदर्भात निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्र.२ वरील शासन शुध्दीपत्रक क्रमांकः आयसीएच- ३४९८/प्र.क्र.२३/भाग-जी/ल-७, दि.०८/११/२०१२ रद्द करण्यात येत आहे. तसेच महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: आयसीएच-१३७०/६८७२९-एम (Spl.) दि. १५/०५/१९७१ व शासन परिपत्रक क्र.आयसीएच-३४९८/प्र.क्र.२३/ भाग-जी/ल-७ दि. ०४/०५/२०१२ मधील मार्गदर्शक सुचनेतील संबधित तरतूदी या परिपत्रकान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत.
ब) महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम २८- १ अअ मधील पोट कलम (३) मधील तरतूदीनुसार माजी खंडकरी यांना वाटप करण्यात आलेल्या जमीनी भोगवटादार वर्ग-२ वरुन भोगवटादार वर्ग-१ करण्यासंदर्भात महाराष्ट्र शेत
जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ (सुधारणा) अधिनियम, २०२३ मधील कलम २८-१ (अअ) मधील पोट कलम (३) खालील पोट कलम (३-१अ) मधील तरतुदीनुसार खालील प्रमाणे सुधारीत मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत, त्या विचारात घेऊन कार्यवाही करावी.
१) “ज्या व्यक्तीनीं (खंडकरी शेतकऱ्यांनी) औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्टयाने (खंडाने) दिलेल्या जमिनी वर्ग-१ भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग-२ भोगवट्यावर दिलेल्या जमिनी महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) अधिनियम, २०२३ महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रथम प्रसिध्द केलेल्या दिनांकापासुन त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता, वर्ग-१ भोगवट्यावर देण्यात आले असल्याचे मानण्यात येतील. त्यानुसार संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या स्तरावरुन गावनिहाय आढावा घेवुन या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासुन एक महिन्याच्या कालावधीत गावनिहाय एकच आदेश करुन गावदप्तरी अंमल घ्यावा. (फेरफार, अधिकार अभिलेख इत्यादी बाबत)
२) ज्या व्यक्तीनीं (खंडकरी शेतकऱ्यांनी) औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्टयाने (खंडाने) दिलेल्या जमिनी वर्ग-२ भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग-२ भोगवट्यावर दिलेल्या जमिनी धारणाधिकार भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करता येईल. तथापि, त्यासाठी जर अशा जमिनींना लागू असलेल्या संबंधित कायद्यात किंवा त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये संबधित अधिनियम व नियमांच्या तरतुदींनुसार अशा रूपांतरणाबाबत जी कायदेशीर तरतूद असेल त्यानुसार कार्यवाही करणे व त्या कायद्यात निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेवुन कार्यवाही करणे आवश्यक राहील.
३) ज्या खंडकरी शेतक-यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन परवानगी घेऊन विहीत अधिमुल्य रक्कम भरुन हस्तांतरित केली असेल अशा प्रकरणी प्रस्तुत जमीन भोगवटादार वर्ग-२ वरुन भोगवटादार वर्ग-१ रुपांतरित करण्याबाबत ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतेवेळी भोगवटादार वर्ग-१ होती त्याबाबत संबधित तहसिलदार उपरोक्त नमुद (१) प्रमाणे कार्यवाही करतील व ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतेवेळी भोगवटादार वर्ग-२ होती त्याबाबत उपरोक्त नमुद (२) प्रमाणे कार्यवाही करावी.
४) ज्या खंडकरी शेतक-यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन विनापरवानगी हस्तांतरित केली असेल किंवा विहीत अधिमुल्य रक्कम भरलेली नसेल अशा प्रकरणी झालेला शर्तभंग नियमानुकुल करताना उक्त अधिनियमातील कलम २९ मध्ये नमुद केलेली अधिमुल्य रक्कम भरल्यानंतर व जिल्हाधिकारी यांच्या पुर्वमान्यतेने भोगवटादार वर्ग-२ वरुन भोगवटादार वर्ग -१ रुपांतरित करण्याची कार्यवाही उपरोक्त क्र. १) व २) मधील तरतूदी विचारात घेवुन करण्यात यावी.
क) उक्त अधिनियमातील कलम २८-१ (अअ) मधील पोटकलम ३अ मध्ये महाराष्ट्र महसूल संहिता, १९६६ च्या कलम २ च्या खंड (१०) मध्ये परिभाषित केलेल्या गावठाण किंवा गावाच्या जागेच्या हद्दीपासुन ५ किलोमीटर अंतरातील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीन्वये ग्रामपंचायतीकडुन केवळ गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणीपुरवठा योजना या सार्वजनिक प्रयोजनार्थच जमीन मागणी अनुज्ञेय राहील.
महसूल व वन विभाग शासन निर्णय: महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 (सुधारणा) अधिनियम 2023 अन्वये कलम 28-1 अअ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम – शासन निर्णय २०२१
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
माझी जमीन भोगवटादार 2 ची आहे आणि 1मध्ये करण्यासाठी काय करावे लागेल