महाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

आता गावठाण लगतच्या जमिनीसाठी बिनशेती परवानगीची गरज नाही ! (महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुदीनुसार)

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० अन्वये, कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिध्द केल्यावर, अशा ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापराकरिता कलम ४२ अन्वये, कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही, अशा स्वरुपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम ४२ ब ही सुधारणा करण्यात आलेली आहे.

आता गावठाण लगतच्या जमिनीसाठी बिनशेती परवानगीची गरज नाही !

ज्या क्षेत्रासाठी प्रारुप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि अशा प्रारूप प्रादेशिक योजनेबाबतची आवश्यक ती नोटीस यथोचितरित्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली किंवा अशी प्रादेशिक योजना मान्य करण्यात आली असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ याच्या कलम १८ अन्वये अशा जमिनीबाबत विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर, कलम ४२ च्या प्रयोजनांसाठी अशा जमिनीच्या वापरास, तत्सम अकृषिक वापरामध्ये रुपांतरीत करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल अशा स्वरुपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम ४२ क ही सुधारणा करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील करावयाच्या कार्यवाहीसंदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक एनएए -२०१७/प्र.क्र.११५/टी -१, दिनांक १९ ऑगस्ट, २०१७ अन्वये देण्यात आलेले आहेत.

तसेच, सन २०१८ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२ अन्वये, कोणत्याही गावाच्या ठिकाणाच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्राकरिता निवासी प्रयोजनासाठी जमीन वापराच्या रुपांतरणासाठी तरतूद करण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये कलम ४२ ड अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील करावयाच्या कार्यवाहीसंदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक एनएपी -२०१७/प्र.क्र.१४२/टी -१, दिनांक १४ मार्च, २०१८ अन्वये देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुद:

१. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४२ (ब) ४२ (क) व ४२ (ड) समाविष्ट केल्यानंतर अकृषिक परवानगीच्या कार्यपध्दतीत बदल झालेला आहे. त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिक योजना व प्रारुप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिध्द केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी तसेच गावठाणापासून २०० मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपध्दतींचा जमीन मालकांनी लाभ व्हावा अशी शासनाची भूमिका आहे.

२. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४२ (ब) ४२ (क) व ४२ (ड) समाविष्ट केल्यानंतर जमीन मालकांना पुर्वीच्या बिनशेती परवानगीसाठी लागणारे विविध विभागाचे नाहरकत दाखले, त्यामध्ये होणारा कालापव्यय कमी होवून जमीन मालकांनी अकृषिक आकार/रुपांतरण कर इत्यादी रक्कम भरल्यानंतर त्यांना सनद देण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) च्या सुलभ कार्यपध्दतीचा सर्व संबंधित जमिन मालकांनी लाभ घेण्यासाठी, प्रिंट मिडीया/ इलेक्टॉनिक मिडीयाद्वारे जनतेस आवाहन करण्यासाठी संबंधित जमिन मालकांना शासनाचे योजनेचा फायदा होण्यासाठी व शासनाचा महसूल वाढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपध्दती होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपध्दती होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:

महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी सूचना:

१) महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारित तरतुदींच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांनी अंतिम विकास योजना/प्रारुप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम १२२ खालील घोषित हद्दीपासून २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इ. अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात (झोन निहाय) ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचे गट नंबर/स. न. दर्शविणा-या याद्या तयार करण्यात याव्यात. तसेच, सदर यादीतील पूर्वीचे जे ग. नं./ स. न. अलहिदा अकृषिक झालेले आहेत ते वगळून उर्वरीत जमिनीच्या स./ग. नं. ची यादी व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तयार करावी.

२) यानुसार, संबंधित जमीन धारकांना मानीव अकृषिक वापराच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी व रुपांतरण कर भरण्याबाबतचे चलन पाठवावे.

३) यादी तयार करतांना ज्या जमिनी भोगवटदार वर्ग -२ आहेत त्या जमिनीच्याबाबतीत सक्षम प्राधिका-याची पुर्व परवानगी घेतली आहे किंवा नाही? प्रकरणी शासनाचा नजराणा भरलेला आहे किंवा नाही? याची खात्री करावी. (गाव नमुना नं. १ क व इनाम नोंदवही वरुन देखील शहानिशा करावी.)

४) ज्या मिळकतीसंदर्भात विविध न्यायालयात वाद सुरु आहे अशा भुधारकांना नोटीसा काढण्यात येवू नये. प्रत्यक्षात तलाठी यांनी गावी सदर मिळकतीचे स्थळ निरिक्षण करुनच नोटीस काढावी.

५) सिलिंग कायद्यांतर्गत ज्या जमिनी अतिरिक्त ठरविलेल्या गेल्या आहेत, तसेच ज्या भुखंडास नागरी जमीन कमाल धारणा कायदयाच्या कलम २० प्रमाणे तळेगाव दाभाडे योजना मंजुर आहे, त्याबाबतचे आदेश व धोरणाची खात्री करुनच भूधारकांना नोटीस देण्यात यावी.

६) अंतिम विकास योजना/प्रारुप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम १२२ खालील घोषित हद्दीपासून २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इ. अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात (झोन निहाय) ज्या बिनशेती न झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनींना अकृषिक आकारणीचे आदेश लागु करण्यापुरते हे परिपत्रक आहे. इतर बाबतीत शासनाचे प्रचलित आदेश लागु राहतील.

७) तसेच ना – विकास क्षेत्र अथवा ग्रीन झोन मधील क्षेत्रास किंवा त्याच्या काही भागास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १८ अन्वये अशा जमिनीबाबत आधीच विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर अशा क्षेत्रासही अकृषिक दर्जा प्राप्त झाल्याचे मानण्यात घेऊन त्यावरील कराची आकारणी करून सनद देण्याची कार्यवाही करावी.

८) याबाबत सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांनी दर १५ दिवसांनी याबाबतीत स्वतः तपासणी करुन आढावा घ्यावा आणि अधिनस्त अधिकाऱ्यांचे कामकाज नियमाप्रमाणे होत आहे किंवा कसे? याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी स्तरावर नियमितपणे घ्यावा. तसेच, याबाबत संबंधित जमीन मालकाने अर्ज केल्यास उपरोक्त बाबींची खात्री करुन या परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.

९) या प्रक्रियेच्या अनुषंगाने, अशा जमिनींना शासनाचे प्रचलित तरतुदीनुसार अकृषिक सारा व रुपांतरीत कर शासन जमा करुन घेतल्यानंतर सर्व प्रकरणात संबंधितांना परिशिष्ट “अ” मधील नमुन्यात सनद देण्याचे अधिकार संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना प्रदान करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे, तहसिलदार यांनी विनाविलंब कार्यवाही करावी.

१०) अशा प्रकारची प्रकरणे हाताळतांना शासनाचा नजराणा/अधिमूल्य बुडून आर्थिक नुकसान होणार नाही तसेच शासनाचे इतर नियम/अधिनियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

अकृषिक वापराची परवानगी नमुना:

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ ब/४२ क/४२ ड मधील तरतूदींन्वये भोगवटादारास द्यावयाची सनद (अकृषिक वापराची परवानगी) नमुना:

ज्याअर्थी,……………………………………………………………………………………………………… या जमीन धारकाने महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ व/४२ क/४२ ड च्या तरतुदीन्वये, जमीन सर्व्हे.क्र./न.भू.क्र ……….. क्षेत्र ………..गाव …….. तालुका……. जिल्हा …………. या जमिनीवर ……….या रहिवास / वाणिज्य अन्य अकृषिक प्रयोजनासाठी उक्त संहितेच्या कलम ४७ अ नुसार देय रूपांतरण कराची वर नमुद अकृषिक प्रयोजनार्थ वापरापोटी आकारणीची रक्कम रु ….. चलन क्र ……………… अन्वये दि …………… रोजी भरणा केली आहे. त्याअर्थी आता, उक्त संहितेमधील तरतुदीच्या नियमांच्या आणि खालील शर्तींना अधिन राहून उपरोक्त जमिनीच्या धारकास सदर जमिनीवर, उक्त नमूद करण्यात आलेला अकृषिक वापर अनुज्ञेय करण्यात आल्याचे मानण्यात आल्याने उक्त संहितेच्या कलम ४२ ब/४२ क/४२ ड अन्वये ही सनद देण्यात येत आहे.

१. वरीलप्रमाणे अनुज्ञेय केलेल्या अकृषिक वापरामध्ये नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मंजूरीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही.

२. जमिनीवर प्रत्यक्ष विकास अथवा बांधकाम सुरु करण्यापूर्वी सक्षम नियोजन प्राधिकरणाची विकास परवानगी घेणे आवश्यक राहिल.

३. जिल्हाधिकारी/नियोजन प्राधिकरण यांच्या मान्यतेने रेखांकन मंजूर केल्याशिवाय क्षेत्राची पोटविभागणी करता येणार नाही अथवा छोटे भूखंड करुन विक्री करता येणार नाही.

४. नियोजन प्राधिकरणाच्या मान्यतेने सदर जमिनीच्या वापरामध्ये किंवा वापराच्या क्षेत्रामध्ये कोणताही बदल झाल्यास, त्याची माहिती अशा मंजूरीपासून ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांना देणे बंधनकारक राहिल.

५. अकृषिक वापर अनुज्ञेय करण्याच्या या सनदेव्यतिरिक्त वित्तीय संस्था नियोजन प्राधिकरण यांनी इतर कोणत्याही स्वरुपातील बिन शेती आदेशाची मागणी करु नये.

(तहसिलदाराची स्वाक्षरी)

(तहसिलदाराची मोहोर)                                                                                                          (तहसिलदाराचे नांव व पदनाम)

महसूल व वन विभाग शासन परिपत्रक – महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुदींच्या अनुषंगाने, करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत महसूल व वन विभागाचे शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अकृषीक आकारणी व बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अर्जाचा नमूना:

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम ४२ पोट कलम ४२ क आणि ड प्रमाणे अकृषीक आकारणी व बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “आता गावठाण लगतच्या जमिनीसाठी बिनशेती परवानगीची गरज नाही ! (महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुदीनुसार)

  • Sushant Bhande

    गावठाण बिगरशेती सुधारित आदेश १४ एप्रिल २०२२ चा मिळावा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.