महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. सद्यस्थितीत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करणे व आहारात वैविधता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत. योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.

सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित शासन निर्णय :-

१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे राहील.

अ.क्र.पाककृती नाव
1व्हेजिटेबल पुलाव
2मसाले भात
3मटार पुलाव
4मुगडाळ खिचडी
5चवळी खिचडी
6चणा पुलाव
7सोयाबीन पुलाव
8मसुरी पुलाव
9अंडा पुलाव
10मोड आलेल्या मटकीची उसळ
11गोड खिचडी
12मुग शेवगा वरण भात
13तांदळाची खीर
14नाचणीचे सत्व
15मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस)

सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनु.क्र.१ ते १२ पाककृती वेग-वेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल.

परिशिष्ट “अ” मध्ये पाककृतीनिहाय दर्शविण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्यांचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे. सदरप्रमाणानुसार शिजविलेला आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी/कडधान्य यांची बचत शक्य आहे.

तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्हातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरुप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य / डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य / डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा. (उदा.इ.१ ली ते इ.५ वीसाठी तांदळाचे प्रमाण ५० ग्रॅम (५० टक्के) घेतल्यास कडधान्य / डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला यांचे प्रमाणदेखील त्याच मर्यादेत (५० टक्के) निश्चित करावेत.)

तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. सबब, उपरोक्त अनु.क्र.४ नुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदूळापासून तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेली कडधान्य (स्प्राऊट्स) यांची कोशिंबीर या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्यानुषंगाने याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) देण्यात यावेत.

विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसांकरीता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस नाचणीसत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहेत. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.

गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी शाळा स्तरावर वितरीत करावी. सदर निधीमधून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ, साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना विहित पदार्थांचा लाभ देण्यात यावा. याबाबतच्या खर्चाचा आढावा शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी घ्यावा. सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात येईल.

प्रस्तुत योजनेंतर्गत शाळास्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी करावा.

नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल.

योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे निर्णय घ्यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा. प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच आहार विद्यार्थ्यांना देणे आवश्यक राहील.

सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरुन परिपत्रकान्वये आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – One State One Uniform Scheme : एक राज्य एक गणवेश योजना सुरू!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.