३ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार!
राठी भाषा ही मूळची आर्यांची भाषा मानली जाते. भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी ही भाषा सातपुडा पर्वतरांगांपासून खाली कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली व स्थिरावली. भाषा दर दहा कोसांवर बदलते आणि त्यानुसार मराठी संभाषणाच्या विविध शैली विकसित होत गेल्या. मराठी भाषा बोलणारे राज्य म्हणून १९६० साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यानंतर आजपर्यंत मराठी भाषेचा सतत विकास आपण बघतो. त्यापूर्वी असणाऱ्या काळातील मराठी भाषेचा प्रवास देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
इसवी सन ५०० ते ७०० या काळात पूर्ववैदिक, वैदिक नंतर संस्कृत, पाली प्राकृत यात विविध उत्क्रांत होत मराठी भाषेचा उगम झालेला मानला जातो. ‘श्री चामुन्डाराये करविले’ असे शिलालेखावरील मराठी भाषेत लिखित पहिले वाक्य श्रावणबेळगोळ येथे असल्याचा दाखला उपलब्ध आहे. संत वाङमयातून मराठीचा लिखित प्रसार होत गेला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांमधून लिखित तसेच बोलीभाषेतील मराठी प्रगत आणि प्रगल्भ होत होती. मराठी भाषेबाबत संत ज्ञानेश्वर यांनी केलेले वर्णन सार्थ आहे. ‘परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरेचि रसिके मेळविण’.
भाषेत असणारे सौंदर्य आणि ते अधिक खुलविणारे अलंकार सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्याचाही स्विकार करणारी भाषा म्हणून मराठीला पाहिले जाते. सर्व भाषांमधील शब्दांना जोडत आल्याने मराठी अधिकच समृद्ध झालेली आहे. इतक्या वर्षांच्या प्रवासात विविध शासकांचा अंमल या प्रांतावर राहिला त्यामुळे मराठी भाषेत शब्दसंग्रह सातत्याने वाढत राहिला. अरबी, फारसी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषेतील शब्द मराठीत कायमचे आले आणि आज ते मराठी भाषेचा भाग बनलेले आपणास दिसतात. आज संगणक युगात मराठी इंटरनेटच्या प्रमुख भाषांपैकी एक आहे आणि मराठी भाषक आवर्जून मराठीचा वापर करतात, ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
३ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार! Marathi Abhijat Bhasha Gaurav Din:
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रीगण या बैठकीस उपस्थित होते.
३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ (Marathi Abhijat Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. यात म्हटले आहे की, या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्य मंत्रिमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त करते, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या प्रस्तावाचा आशय असा, मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी भाषा समितीने मोठे काम केले. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालय , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला आहे. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरत आले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तमाम मराठी भाषिकांना आनंद झाला आहे. मराठी माणसांसाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक थोर साहित्यिक, संशोधक, अभ्यासकांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मेहनतीला या निर्णयामुळे यश लाभले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी आणखी ऊर्जा, प्रेरणा मिळाली आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिद्धपूर येथे या विद्यापीठाचे मुख्यालय असणार आहे. मराठी भाषेतील अभ्यास, संशोधन याला चालना देता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे जगभरातील मराठी प्रेमींसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आहे. या निर्णयासाठी हे मंत्रीमंडळ केंद्र सरकारचे अभिनंदन करत आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडवणीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदनही केले.
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनाच्या दृष्टीने मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे, भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांचे बळकटीकरण, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थ्यांना भरीव मदत करणे या गोष्टी साध्य होणार असल्याचेही प्रा. पठारे यांच्या समितीने नमूद केले आहे.