महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य अधिकार आणि जबाबदाऱ्या !

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदी नुसार सरपंच, उपसरपंच, आणि सदस्यांना आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. गावामध्ये बरेच सदस्य कुणाच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत निवडणूका लढवत असतात, आणि निवडणूक जिंकून ग्रामपंचायत सदस्य देखील होतात. काहींना तर सदस्य पदाची नेमकी कर्तव्य आणि अधिकार काय असतात हे देखील माहीत नसते. अनेकवेळा ग्रामपंचायत सदस्य हा फक्त त्याच्या पदाच्या नावापुरता मर्यादित असल्याचे आपल्याला चित्र बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य अधिकार आणि जबाबदाऱ्या:

ग्रामपंचायत सदस्य हा ग्रामपंचायत आणि खेड्यातील ग्रामस्थ यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आपापल्या प्रभागातील ग्रामस्थांच्या समस्या व प्रभागातील विकास कामांची माहिती घेऊन ती वॉर्डातील ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभेत सादर करुन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे आणि ग्रामपंचायतीच्या मासिकग्राम सभेत त्याचे विविध अधिकार ठामपणे मांडणे ही त्याची मुख्य भूमिका आहे.

ग्रामपंचायत सदस्य अधिकार:

१) मासिक सभेची नोटीस सभेपूर्वी किमान पूर्ण तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना प्राप्त करण्याचा अधिकार असतो.

२) सभेची नोटीस मिळाल्यावर त्यातील विषयांचा अभ्यास करून त्यावर विधायक चर्चा घडवून आणण्यास सहभागी होणे.

३) ग्रामपंचायतीने बोलावलेल्या प्रत्येक मासिक सभेला आणि ग्रामसभेला हजर राहून सभेच्या कामकाजात भाग घेणे.

४) प्रत्येक सभेत शिस्त राखणे व वेळेची भान ठेवून चर्चा करणे.

५) सभेपुढे मांडावयाचे विषयाबाबत सरपंचांना पाच दिवस अगोदर लेखी पत्र देणे.

६) सभेमध्ये विषयाशी सुसंगत चर्चा करणे.

७) मासिक सभेमध्ये सदस्यांनी एखादा विषय, विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना नोटीस देण्याचा अधिकार असतो. तीन किंवा तीन पेक्षा अधिक सदस्यांनी एखादा विषय, विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना नोटीस दिली, तर तो विषय, विषय पत्रिकेत घेणे सरपंचांना बंधनकारक आहे.

८) मासिक सभेमध्ये सरपंच आणि उपसरपंचाच्या अनुपस्थितीत, उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाला अध्यक्ष म्हणून राहण्याचा अधिकार असतो.

९) ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या निम्म्या किंवा त्याहून जास्त सदस्यांना लेखी मागणी करून विशेष मासिक सभा बोलावण्याचा अधिकार आहे.

१०) ग्रामपंचायत सभेमध्ये संबंधित विषयावर/ठरावांवर आपली मत मांडणी करण्याचा अधिकार सदस्याला असतो.

११) ग्रामपंचायतीच्या कारभारात गैरप्रकार आणि गैरव्यवहार होत असल्यास विरोध करण्याचा अधिकार असतो.

ग्रामपंचायत सदस्य जबाबदाऱ्या:

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १७८ नुसार हानी, अपव्यय किंवा दुरूपयोग याबद्दल सदस्यांची जबाबदारीची तरतूद केली आहे. जेव्हा पंचायतीच्या कोणत्याही पैशाची किंवा इतर मालमत्तेची हानी, अपव्यय किंवा दुरूपयोग झाला असेल आणि अशी हानी, अपव्यय किंवा दुरूपयोग करण्यात पंचायतीचा कोणताही सदस्य सामील असेल किंवा तो त्याच्या गैरवर्तनामुळे किंवा सदस्य या नात्याने असलेल्या त्यांच्या कर्तव्याची अक्षम्य हयगय केल्यामुळे झाला असेल किंवा होणे सुकर झाले असेल तेव्हा अशी हानी, अपव्यय किंवा दुरूपयोग याबद्दल पंचायतीचा असा प्रत्येक सदस्य जातीने जबाबदार असेल.

जर संबंधित सदस्यास तद् विरुद्ध कारण दाखवण्याची पुरेशी संधी दिल्यानंतर पंचायतीच्या कोणत्याही पैशाची किंवा इतर मालमत्तेची हानी, अपव्यय किंवा दुरूपयोग हा प्रत्यक्ष अशा सदस्याच्या गैरवर्तनामुळे किंवा अक्षम्य हयगयीमुळे झाला अशी जिल्हाधिकाऱ्याची खात्री झाली तर, जिल्हाधिकारी, लेखी आदेशाद्वारे, अशी हानी, अपव्यय किंवा दुरूपयोग यांच्या प्रतिपूर्तीसाठी, आवश्यक तेवढी रक्कम ठरवलेल्या तारखेपूर्वी पंचायतीस देण्याविषयी अशा सदस्यास निर्देश देईल. अशा रीतीने रक्कम भरण्यात आली नाही तर, जिल्हाधिकारी, ती जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करून ग्रामनिधीत जमा करील. जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, कलम १४०, पोट कलम (६) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे आपले गाऱ्हाणे दूर करण्यासाठी तशाच मुदतीत जिल्हा न्यायालयाकडे अपील करता येईल, आणि त्या न्यायालयाला त्या कलमान्वये ते जो कोणताही आदेश देऊ शकेल तो आदेश देता येईल.

१) ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवर व निधीवर सतत लक्ष ठेवणे त्यांचा गैरवापर टाळणे आणि गैरवापर करणाऱ्यास परावृत्त करणे.

२) ग्रामपंचायतीची मालमत्ता किंवा ग्रामनिधी यांचा गैरवापर होत असेल किंवा अनिष्ट गोष्टी घडत असतील तर मालमत्तेचा व निधीचा होणारा गैरवापर आणि घडणाऱ्या अनिष्ट गोष्टी सरपंचाचा लक्षात आणून देणे.

३) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते स्वच्छता इत्यादी बाबी सुरळीत चालू राहतील याची काळजी घेणे.

४) सदस्य जरी विशिष्ट प्रभागातून ग्रामपंचायतीवर निवडून आले असले तरी जनहिताची कामे सर्व भागासाठी करणे.

वरील प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या तर आपल्या ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत होऊन गावाचा विकास होण्यास मदत होईल.

हेही वाचा – ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य निरर्हता/अपात्र नियम विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य अधिकार आणि जबाबदाऱ्या !

  • आनंद

    ग्रामपंचायत सदस्य फक्त ठराविक लोकांचे ऐकत असेल तर काय करावे लागेल

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.