कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ !
शासन निर्णयान्वये “सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना” या योजनेंतर्गत नवविवाहित दांपत्यांना (Kanyadan Yojana Anudan) अनुदान म्हणून रु. २०,०००/- इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून रु. ४,०००/- देण्यात येत आहे.
कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ!
मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि. २० मे, २०२३ रोजी पालघर येथील सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान, सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेवून विवाह करणाऱ्या दांपत्यांसाठी देण्यात येणाऱ्या (Kanyadan Yojana Anudan) अनुदानात रु. २५,०००/- पर्यंत वाढ करण्याबाबत घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागांतर्गत “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना” अंतर्गत नवविवाहित दांपत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात रु. २५,०००/- व सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना रु. २,५००/- एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास दि. १३ मार्च, २०२४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये “आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपरोक्त योजनेशी समरुप असलेल्या विवाह योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने या विभागांतर्गत सुरु असलेल्या कन्यादान योजनेंतर्गत लाभार्थीना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयातील सुधारणा:
“सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना” या योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-
(क) सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या रु. २०,०००/- (रु. वीस हजार फक्त) इतके अनुदान वधुचे वडील, आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे देण्यात येते.
सदर अनुदानात रु. २५,०००/- (रु. पंचवीस हजार फक्त) पर्यंत वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(ख) सदर योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रति जोडपे रु. ४,०००/- (रु. चार हजार फक्त) इतके अनुदान देण्यात येते. तथापि, सदरच्या अनुदानात कोणताही बदल नाही.
(ग) इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. १ येथे नमूद शासन निर्णयातील परिशिष्ट-अ,ब, क व ड प्रमाणे पात्रतेचे निकष, विवाहाची माहिती सादर करण्याचा विहित नमुन्यातील प्रस्तावाचा नमुना, हमीपत्र व प्रतिज्ञापत्र इत्यादी बाबी यापुढेही कायम राहतील.
(घ) इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. १ येथे नमूद शासन निर्णयामध्ये “सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तुरुपात देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वधुचे वडील, आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे (क्रॉस चेकने) लग्नाच्या दिवशी देण्यात यावी” अशी तरतूद आहे. आता, त्यात बदल करुन अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पध्दतीने लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात यावी, अशी तरतूद या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे.
(ड) सदर सुधारित तरतूदी शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू होतील.
संपर्क कार्यालयाचे नांव:
अधिक माहितीसाठी संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय – Kanyadan Yojana Anudan GR :
सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थींच्या (Kanyadan Yojana Anudan) अनुदानात वाढ करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – कन्यादान योजना – Kanyadan Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!