दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण !
दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचून दहिहंडी फोडण्याच्या आयोजनाबाबत मा. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल झालेल्या जनहित याचिका क्र.५६/२०१४ प्रकरणी मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या अनुक्रमे दिनांक ११.०८.२०१४ व दिनांक १७.०८.२०१६ रोजीच्या आदेशांच्या अनुषंगाने दहिहंडी उत्सवादरम्यान गोविंदांच्या मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास संदर्भ क्र.१ येथील दिनांक ११.०८.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत व गोविंदा उत्सवाच्या आयोजनाच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच, संदर्भ क्र.२ येथील दिनांक २४.०८.२०१६ च्या शासन निर्णयान्वये मानवी मनोरे उभारण्याच्या खेळ प्रकारास साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याच्या तसेच या क्रीडा प्रकाराबाबत राज्य संघटनेमार्फत विस्तृत नियमावली तयार करण्यासंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संदर्भ क्र.५ व ६ येथील शासन निर्णयान्वये दहिहंडी उत्सवादरम्यान अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय / निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर गतवर्षी म्हणजे सन २०२२ मध्ये झालेल्या दहीहंडी उत्सवापूर्वी मा. मुख्यमंत्री महोदयांनी गोविंदांना विमा संरक्षण देण्याची घोषणा केली होती. तथापि, त्यावेळी दहीहंडी उत्सव अत्यंत नजीक असल्याने व कमी कालावधीत विमा उतरवण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे अपघातग्रस्त गोविंदांसाठी त्यावर्षी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. तथापि, सदर शासन निर्णय केवळ त्याच वर्षापूरता लागू असल्यामुळे सन २०२३ या चालू आर्थिक वर्षामध्ये येणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने दहिहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदाचा विमा उतरवणे व प्रो- गोविंदा लीग स्पर्धेचे आयोजन करणेबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ जुलै २०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्यासोबत दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची दिनांक ११ ऑगस्ट, २०२३ रोजी ऑनलाईन बैठक पार पडली. या दोन्ही बैठकांमधील चर्चा, निर्देश व सूचना व संदर्भ क्र.७ येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा प्रस्ताव विचारात घेऊन तसेच दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षेबाबत मा. न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश व त्याअनुषंगाने शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश विचारात घेऊन, सन २०२३ मधील दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५०,००० गोविंदांना विमा संरक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत शासन निर्णय :
दहिहंडी उत्सव / प्रो-गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात/दुर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. या अनुषंगाने गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ५०,००० गोविंदांना प्रति गोविंदा रु. ७५/- चा विमाहप्ता याप्रमाणे एकूण रु. ३७,५०,०००/- (अक्षरी रुपये सदतीस लक्ष, पन्नास हजार फक्त) इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहिहंडी समन्वय समिती (महा.) या संस्थेस वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील :-
अ.क्र | विवरण | विमा संरक्षण |
1 | अपघाती मृत्यू | रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष) |
2 | दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास | रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष) |
3 | एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास | रु.५,००,००० (रु. पाच लक्ष ) |
4 | कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व ( Permanent total disablement) | रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष) |
5 | कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व (Permanent partial disablement) | विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारी नुसार |
6 | अपघातामुळे रुग्णालयीन खर्च | प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (एक लक्ष) |
सदर विमा संरक्षण योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी सोबतच्या परिशिष्ट-अ प्रमाणे राहतील. सदर अटी / शर्तीबरोबरच संबंधित विमा कंपनीने विहित केलेल्या अटी / शर्ती लागू राहतील.
विमा संरक्षणाचा कालावधी हा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत राहील.
यावरील खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून भागविण्यात येईल.
वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली रक्कम / निधी “दहिहंडी समन्वय समिती (महा.)” या संस्थेस प्रदान करण्यात यावी.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!