आयटी रिटर्न कसा फाइल करावा ? जाणून घ्या सविस्तर माहिती !
व्यक्तिगत करदाते, नोकरदार यांनी कराचा हिशोब देणारे रिटर्न्स फासल करण्याची शेवटची तारीख (सध्यातरी, नंतर कदाचित त्याला मुदतवाढ मिळेल; पण रिस्क का घ्या?) म्हणजे ३१ जुलै तेव्हा आतापर्यंत रिटर्न भरायची काही तयारी केली नसेल तर तुमचं उत्पन्न आणि त्यावरचा कर याची जुळवाजुळव आता ताबडतोब सुरू करा आणि हा रिटर्न भरताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
रिटर्न कुठे फाइल कराल ? Income tax return File:
कराचा हिशोच फक्त ऑनलाइनच सादर करावा लागतो. त्यामुळे https://eportal.incometax.gov.in/iec/foservices ही वेबसाइट अतिशय महत्वाची आहे.
या वेबसाइटवर तुम्ही टप्प्याटप्प्याने येणारी माहिती वाचून सूचनांचा पाठपुरावा केलात तर रिटर्न भरणं सोपं होईल. त्यात तुम्हाला लागू फॉर्म कुठला, हे सहज निवडता येईल.
तुम्हाला मिळालेलं उत्पन्न आपोआप त्या फॉर्ममध्ये भरलं गेलेलही पहायला मिळेल. आधारशी जोडलेल्या मोबाइलवर ओटीपी मिळवून शेवटी फायलिंग प्रक्रिया संपवता येईल.
आयटी वेबसाइटचा उपयोग काय ?
१. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर, ते देणारे, म्हणजे आपला एम्प्लॉयर किवा व्याज देणारी बँक, कर कापतात आणि सरकारला भरतात.
२. हा कर किती कापला आणि भरला त्याचा हिशोब म्हणजे 26AS. त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले तेव्हा कापले गेलेले पैसे आपल्या नावाने सरकारला भरले गेलेले आहेत की नाही, हे तपासून पाहणं अत्यावश्यक आहे.
३. लक्षात ठेवा, समोरच्याने पैसे कापूनही टीडीएस भरला नाही, तर कर भरायची जबाबदारी तुमची आहे. त्याशिवायही मिळालेलं जवळपास सर्व उत्पन्न काय आणि कुठून आहे. मोठेमोठे कोणते व्यवहार तुम्ही केलेले आहेत. शेअर्स वगैरेचे किती व्यवहार तुम्ही केलेत, या सगळ्याचा तपशील तुम्हाला AIS मध्ये पहायला मिळतो.
४. थोडक्यात, ही दोन स्टेटमेंट म्हणजे तुमची आर्थिक कुंडली आहे. कर भरताना ती नक्की पहायला हवी.
कराचे काय दर लागू होणार ?
गेल्या दोन वर्षापासून सरकारने दुहेरी करपद्धती आणलेली आहे. यात तुम्हाला मिळणाऱ्या काही सवलती नाकारल्या तर कराचा कमी दर लागू होईल आणि या सवलती घेऊन करपात्र उत्पन्न कमी केलं तर दर जास्त लागू होतो, यापैकी कोणत्या पद्धतीत तुम्हाला कमी रक्कम भरावी लागेल, ते तपासा आणि त्यानुसार करपद्धती स्वीकारा. सहसा करपत्रक भरण्यासाठी तज्ज्ञाकडे जावं, हे उत्तम पण तसं केलं तरी तज्ज्ञ काय करत आहेत, याची माहिती आपण स्वतःही ठेवावी, हे त्याहून उत्तम.