जुना फ्लॅट, घर खरेदी केल्यास आता मालमत्ता कर थेट नावावर ; दस्त नोंदणीवेळीच सुविधा उपलब्ध !
नवं घर खरेदी केल्यानंतर त्या घरासाठीच्या कागदपत्रांपासून आर्थिक पाठबळापर्यंतची जुळवाजुळव आणि त्यानंतर घर नावावर होण्यापर्यंतची प्रक्रिया बरीच मोठी असते. मोठी असण्यापेक्षा या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असे येतात जेव्हा हे सर्व कधी संपणार? हाच प्रश्न आपल्या मनात घर करू लागतो. ही पावती, ती पावती, अमुक दाखला, तमुक व्यक्तीच्या सह्या, विविध कर अशा एक ना अनेक गोष्टी यादरम्यान आपण पाहत असतो, त्यांची गरजेनुसार सर्व गोष्टी मिळवत असतो. पण, आता या भल्यामोठ्या प्रक्रियेमध्ये आणि त्यातही जर तुम्ही एखादा जुना फ्लॅट किंवा घर खरेदी करत असाल तर, या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.
जुना फ्लॅट, घर खरेदी केल्यास आता मालमत्ता कर थेट नावावर ; दस्त नोंदणीवेळीच सुविधा उपलब्ध !
नव्याने खरेदीखत केलेल्या जुन्या मालमत्तेवरील कर व पाणीपट्टी थेट तुमच्या नावावर होण्यासाठी आता महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही सुविधा आता दस्त नोंदणीवेळीच उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यात पुणे, पिंपरी महापालिकांसह राज्यातील १५ महापालिकांचा समावेश आहे. प्रॉपर्टी कार्डवरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव महापालिकेच्या दप्तरी लावण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीतील कोणतेही जुने घर, फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यावरील मालमत्ता कर, पाणीपट्टी बिल आपल्याला स्वतःच्या नावावर करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी वेळेची मर्यादा नसल्याने सरकारी पद्धतीने तुम्हाला हेलपाटे मारावे लागतात. मात्र, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दस्त नोंदणी करतानाच ‘आय सरिता’ या प्रणालीचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे दस्त नोंदणी करताना संबंधित मालमत्तेचा युनिक आयडी अर्थात ईपिक क्रमांक दस्त नोंदणीवेळेस नमूद करावा लागणार आहे. त्यापूर्वी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महापालिकेशी तांत्रिकदृष्ट्या हा क्रमांक संबंधित खरेदीदाराच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल? याचे तांत्रिक सहकार्य पुरविले जाणार आहे.
दस्त नोंदणी झाल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही माहिती महापालिकेला ऑनलाइन दिल्यानंतर त्यांच्याकडील प्रणालीद्वारे तुम्ही खरेदी केलेली मालमत्ता तुमच्या नावावर नोंदवली जाईल व मालमत्ता कर व पाणीपट्टी तुमच्या नावावर दिसू लागेल.
ग्रामीण भागात जमीन खरेदी केल्यावर तलाठ्याला फेरफार करताना अशी सुविधा आहे. महापालिकेसोबत आय सरिताचे एकत्रिकरण केले आहे. नगरपालिका प्रशासन संचालनालयानेही याबाबत पुढाकार घेतला असून काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्व नगरपालिकांमध्येही ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
पुढील लेख देखील वाचा!
- मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
- नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर !
- खरेदीखत, साठेखत आणि गहाणखत विषयीची संपूर्ण माहिती पहा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!