घर खरेदी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती !
आपण या लेखामध्ये घर खरेदी कशी करावी? याची सविस्तर माहिती घेणार आहोत. घर घरेदीबाबत अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उकल होणे खूप गरजेचे आहे.
घर खरेदी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती !
रो हाऊस (ओळीत बंगला) बांधताना घ्यावयाची काळजी :
रो हाऊस बांधताना बांधकाम उद्योजकाने (Builder Developer) जी जमीन रो हाऊस प्रकल्पासाठी विकत घेतली त्या जमिनीचा शोध अहवाल बांधकाम उद्योजकाच्या वकिलाने घेतला असेल त्या शोध अहवालाची खरी नक्कल मागवणे गरजेचे आहे. ती नक्कल निष्णात वकिलामार्फत तपासून घ्यावी. कारण जमीन वादातून मुक्त असेल तरच रो हाऊसचे बांधकाम निर्वेध मानता येईल.
तसेच ज्या जमिनीवर रो हाऊस बांधले आहेत त्या जमिनीबाबत मूळ जमीन मालक आणि बांधकाम उद्योजक यांच्यामध्ये झालेल्या जमीनविषयक कराराच्या खऱ्या नकला पाहणे. कुलमुखत्यारपत्र (Power of Attornary) विकसन करार (Development Agreement) असेल तर खरेदी खत (Sale Deed) यांच्या खऱ्या नकला पाहणे.
रो हाऊस साठी खरेदी केलेली जमीन एन.ए. बिनशेती केल्याची जिल्हाधिकारी यांच्या हुकुमाची खरी नक्कल तपासणे.
1) रो हाऊसचा आराखडा – नकाशा मंजूर केल्याची जिल्हाधिकारी आणि नगररचना खात्याच्या हुकुमाची खरी नक्कल पाहणे.
2) रो हाऊसचा आराखडा (Plan) नकाशा प्रत्यक्ष पहा.
3) बांधकाम उद्योजकाकडून जमिनीच्या मालकी सह रोहाऊस (Registerd Sale Deed) खरेदीखताने विकत घेणे.
4) बांधकाम उद्योजकाकडून स्वतंत्र बंगला विकत घेताना प्रत्येक भूखंडाचा मंजूर आराखडा आणि त्यावरील बंगला याबाबतही वरीलप्रमाणे कागदपत्रे तपासा.
5) निष्णात वकिला मार्फत दुय्यम निबंधकाच्या कार्यालयातील शोध अहवाल मिळवणे.
6) जमिनीचे निर्वेध हस्तांतरण आणि सर्व परवाने घेऊन बांधलेली अधिकृत इमारत हे दोन महत्त्वाचे पैलू लक्षात घेऊन शोध अहवाल घ्यावा.
7) जमीन मालकाचे नाव व पत्ता घेणे.
8) विकसनकर्त्यांचे नाव व पत्ता घेणे.
9) वास्तुविशारदाचे नाव व पत्ता घेणे.
10) वास्तुविशारदाचे लायसन्स नंबर व मुदत घेणे.
11) स्ट्रक्चरल इंजिनीअरचे नाव, पत्ता, लायसन्स नंबर घेणे.
12) साईटचा पत्ता घेणे.
13) बांधकाम परवानगी क्रमांक व दिनांक पाहणे.
14) भूखंडाचे एकूण क्षेत्र तपासणे.
15) प्रत्येक भूखंडाचे क्षेत्र तपासणे.
16) मंजूर इमारतींची संख्या तपासणे.
17) जोत्याचे क्षेत्र तपासणे.
18) पाणी पुरवण्याची सोय पाहणे.
तसेच ज्या सदनिकाधारकांनी ‘गुंठेवारी दाखला’ मिळवला आहे त्याची निष्णात वकिला मार्फत तपासणी करा आणि नंतरच रो हाऊस खरेदी करा.
खाजगी व्यक्तीकडून स्वतंत्र बंगला घेताना घ्यावयाची काळजी :
1) ज्या जमिनीवर बंगला बांधला आहे त्या जमिनीचे मूळ खरेदीखत, इंडेक्स टू सुची 2 मूळ प्रत, पावती मूळ प्रत पहाणे गरजेचे आहे.
2) बंगल्याचा आराखडा – Plan मंजुरीचा आदेश आणि जमीन N.A. बिनशेती केल्याचा आदेश तपासणे.
3) बंगला बांधणारा मूळ मालक कोण? याची खात्री करणे.
4) मूळ मालकाचे वारस कोण? हे तपासणे.
5) मूळ मालकांच्या वारसांकडून बंगला घेताना सर्व वारसांची माहिती घेणे.
6) जर शासनाने दिलेल्या जमिनीवरील बंगला विकत घेताना सक्षम शासकीय अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
7) लीजहोल्ड – दीर्घकालीन कराराने घेतलेल्या जमिनीवर बंगला बांधला असेल तर करारातील अटी व मुदत लक्षात घेणे.
8) तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील शोध अहवाल मिळवा वर्तमानपत्रात बंगला खरेदीची नोटीस प्रसिद्ध करा.
9) बंगल्याच्या जमिनीची मालकी निर्वेध असेल आणि इमारतीचा, बंगल्याचा आराखडा मंजूर असेल तर कागदपत्रे तपासून निष्णात वकिलाच्या मदतीने व्यवहार नोंदणीकृत करावा.
10) शोध अहवालाच्या मुख्य निकषांपैकी आवश्यक ते सर्व निकष शोध अहवालासाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे.
बांधकाम उद्योजकाकडून सदनिका-दुकान खरेदी करताना घ्यावयाची काळजी:
1) मूळ जमीन मालक आणि बांधकाम उद्योजक (Promoters & Builders) यांच्यामधील विकसन करार (Development Agreement), कुलमुखत्त्यारपत्र (Power of Attornary), साठेखत इत्यादी करारांच्या खऱ्या नकला तपासणे गरजेचे आहे.
2) तसेच जमिनीच्या मालकीच्या हस्तांतरणाच्या प्रवासाच्या इतिहासाबाबत बांधकाम उद्योजकाच्या वकीलाने घेतलेल्या शोध अहवालाची खरी नक्कल पाहणे . कारण जमीन वादातून मुक्त असेल तरच इमारतीच्या बांधकामाला अडथळा येणार नाही.
3) जमीन मालकाचे नाव व पत्ता तपासणे.
4) विकसनकर्त्यांचे नाव व पत्ता घेणे.
5) वास्तुविशारदाचे नाव पत्ता घेणे.
6) वास्तुविशारदाचे लायसन्स नंबर व मुदत तपासणे.
7) स्ट्रक्चरल इंजिनीअरचे नाव, पत्ता, लायसन्स नंबर तपासणे.
8) साईटचा पत्ता घेणे.
9) इमारतीच्या मंजूर आराखड्याची खरी नक्कल पाहणे.
10) बांधकाम परवानगी क्रमांक व दिनांक तपासणे.
11) भूखंडाचे क्षेत्र पाहणे.
12) मंजूर चटई क्षेत्र तपासणे.
13) जोत्याचे क्षेत्र पाहणे.
14) वापराचा तपशील, निवासी वापराचा तपशील, व्यापारी दुकानाचा तपशील पाहणे.
15) एकूण निवासी सदनिका तपासणे.
16) एकूण व्यापारी सदनिका तपासणे.
17) सुधारित बांधकाम परवानगी क्रमांक, दिनांक पाहणे.
18) जर बांधकाम अपूर्ण असेल तर बांधकाम विकत घेण्याचा करार करावा. (Agreement to Sale)
19) इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे पण तुम्हाला जी सदनिका/दुकान खरेदी करायचे आहे त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्याविषयीचे भोगवटा पत्र मागवणे गरजेचे आहे.
20) इमारतीमधील सर्वांच्या वापरासाठी असलेली जागा व सुविधांबाबत Deed of Decclaration ची खरी नक्कल मागवणे.
21) इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) मागवणे.
22) इमारत सहकारी संस्था म्हणून नोंदणीकृत होणार असेल तर सहकारी संस्थेचा नोंदणी क्रमांक, दिनांक तपासणे.
23) सहकारी संस्थेचे शेअर सर्टिफिकेट मिळवा तसेच सोसायटीचा ना हरकत दाखला घेणे.
24) भावी काळात इमारतींच्या सुविधांचा देखभाल खर्च कसा करावा लागणार आहे? याचे अंदाजपत्रक घेणे.
25) सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर बांधकाम उद्योजकाकडे (Developer Builder) कडे Deed of Conveyance पूर्ण करण्याचा आग्रह धरा व ते पूर्ण करून घ्या. Deed of Conveyance मानीव खरेदीखत म्हणजे ज्या जमिनीवर इमारत उभी आहे त्या जमिनीचा संपूर्ण मालकीहक्क सदनिकेत Flat मध्ये राहणाऱ्या सर्व सदनिकाधारकांकडे कायमचा हस्तांतरीत करणे हा आहे.
26) आवश्यक त्या इमारतीबद्दल गुंठेवारी कायद्याने सक्षम विभाग व अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या आदेशाची व मंजूर नकाशाची प्रत तपासणे.
27) इमारतीचा जो गाळा इमारतीच्या मंजूर आराखड्यात दुकान (Commercial Space) व्यापारी गाळा म्हणून स्पष्टपणे दाखविला आहे तो गाळा – दुकान याआधी सांगितलेली सर्व कागदपत्रे तपासून खरेदी करणे.
सदनिकेची व्यक्तीकडून खरेदी (Resale) करताना घ्यावयाची काळजी:
1) तुम्ही ज्या सदनिका मालकाकडून सदनिका Flat विकत घेणार आहात त्याच्याकडून त्याने बांधकाम उद्योजकाकडून त्यात पूर्वी मिळविलेली कागदपत्रे, दस्तऐवज मागवणे गरजेचे आहे यामध्ये बांधकामपरवाना, मंजूर आराखडा व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मागवणे गरजेचे आहे.
2) सदनिकाधारकाने (Flat Holder) ने बांधकाम उद्योजकाशी (Developer Builder) केलेल्या खरेदी खताची
3) मूळप्रत, इंडेक्स टू ची मूळप्रत, पावतीची मूळ प्रत फक्त तपासण्यासाठी मागवणे. या प्रती सदनिकाधारकाने दाखवल्या नाहीत तर सदनिकेवर (Flat) बँकेच्या कर्जाचा बोजा आहे असे समजावे. पहिल्या सदनिकाधारकाचे कोणत्या बँकेचे, किती रकमेचे कर्ज आहे ही माहिती त्यास उघड करण्यास सांगा. कारण त्याच्या सदनिकेच्या करारांच्या मूळ प्रती बँकेकडे गहाण ठेवलेल्या असतील. अशा प्रकरणात पूर्ण व्यवहार निष्णात वकीलाच्या सहाय्याने करा. बँकेच्या कर्जाची रक्कम सदनिका खरेदीची रक्कम जाणून घ्या.
4) सदनिकेबाबत दुय्यम निबंधक कचेरीतून शोध अहवाल घेणे.
5) सदर इमारतीचा मंजूर आराखडा, बांधकाम परवाना, भोगवटापत्र, पूर्णत्वाचा दाखला याविषयी महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून ही कागदपत्रे मिळवणे.
6) काही प्रकरणात सदनिकाधारक व बांधकाम उद्योजक यांच्या दरम्यान नोटराईज साठेखत, नोंदणीकृत साठेखत, (Agreement to Sale) हे करार उपलब्ध होतात. पण (Sale Deed/ Deed of Apartment) खरेदीखत असे पूर्ण मालकी हक्क शाबीत करणारे पुरावे मिळत नाहीत. अशा प्रकरणात सदनिकेचा सध्याचा भोगवटादार व बांधकाम उद्योजक यांच्यामध्ये मालकीचा पूर्ण हक्क कायमचा देणारा करार, (Sale Deed/ Deed of Apartment) खरेदीखत योग्य कालावधीत पूर्ण झाला तरच त्यानंतर सदर सदनिका सध्याच्या मालकाकडून विकत घेणे.
7) काही प्रकरणात इमारत दीर्घकालीन भाडेपट्ट्याने, लीजहोल्ड जमिनीवर बांधलेली असते. त्या लीजहोल्ड (भाडेपट्टा कराराची) नोंदणीकृत मिळवणे . तिचे अवलोकन करा. करार संपुष्टात येण्याची मुदत पहाणे. त्यानंतरच निष्णात वकीलाच्या सल्ल्याने सदनिका खरेदी करणे.
8) काही प्रकरणात शासनाने दिलेल्या जमिनीवर सदनिकेची इमारत बांधलेली असते. अशा प्रकरणात सदनिका विकत घेण्याआधी जिल्हाधिकारी/सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. शासनाचे Land Allotment Letter व शासनाने दिलेल्या आदेशातील, सनदेतील अटी वाचून नंतर निर्णय घेणे .
9) पूर्वीच्या सदनिकाधारकाने (Flat) विकणाऱ्याने मालमत्ताकर (Property Tax) सोसायटी अपार्टमेंटचा देखभाल खर्च, विद्युत महामंडळ यांची देणी दिली आहेत का? याची तपासणी करणे.
10) सदनिकाधारकाला सदनिका (Flat) नामांकनामुळे (Nomination) मिळाली असेल तर नॉमिनीकडून सदनिका (Flat) विकत घेऊ नका. तर मूळ मालकांच्या सर्व कायदेशीर वारसांशी एकत्रितपणे एकाच वेळी हस्तांतरणाचा खरेदीचा करार नोंदणीकृत करणे.
11) सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून तुमच्या व्यवहारासाठी ना हरकत प्रमाणपत्र आधी मागवणे.
सहकारी संस्थेचा भागधारकाचा दाखला (Share Certificate) पाहा. तुमचा खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तो दाखला स्वत:च्या नावे करून घेणे.
12) सदनिकेबाबत दिवाणी न्यायालय/सहकार न्यायालय दावा सुरू आहे का? तपासावे.
तुमचे हस्तांतरण करार-खरेदीखत (Deed of Apartment) नोंदणीकृत करा.
हस्तांतरण शुल्क:
सोसायटीमधील फ्लॅट सदनिकांच्या हस्तांतरणाबाबतचे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
सुधारित उपविधी 2001 मधील नियम क्र 38 ई 9 नुसार सभासदाने आपला गाळा (सदनिका) अन्य व्यक्तीस नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतरित केल्यास सहकारी गृहयोजना / 2001 / प्र.क्र. 188 / 14 दि. 9/8/2001 अन्वये संस्था पुढील जास्तीत जास्त हस्तांतर शुल्क आकारू शकते.
1) म.न.पा व प्राधिकरण क्षेत्र रुपये 25,000/-
2) ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्र रुपये 20,000/-
3) ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्र रुपये 15,000/-
4) ‘क’ वर्ग नगरपालिका क्षेत्र रुपये 10,000/-
5) ग्रामपंचायत क्षेत्र रुपये 5000/-
घरासाठी कर्ज कोणाकडून घ्यावे?
कोणतेही रो-हाऊस, सदनिका, बंगला, दुकान थेट एकरकमी खरेदी करण्याची आपली क्षमता असली तरी एलआयसी हाऊसिंग फायनान्स, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, राष्ट्रीयीकृत वित्तसंस्थांकडून काही रकमेचे कर्ज मुद्दाम मागा. कारण काटेकोर शोध अहवाल घेतल्यानंतर, मालमत्तेच्या कागदपत्रांची कठोर तपासणी केल्यानंतर अशा वित्तसंस्था कर्जमंजूर करतात म्हणून निर्वेध घर किंवा दुकान विकत घेण्यासाठी हा योग्य मार्ग आहे.
हेही वाचा – मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!