महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना

आपण या लेखात ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना व सविस्तर माहिती पाहूया. राज्यात ग्रामपंचायतीमार्फत जवाहर रोजगार योजना, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी (आरएलईजीएस), संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इत्यादि योजना राबविल्या जात होत्या. सन २००६ पर्यंत या विकास योजना म्हणून राबविण्यात येत होत्या, व २००६ नंतर त्यांचे कायद्यात रूपांतर झाले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ केंद्र शासनामार्फत पारित केल्यानंतर, तसेच महाराष्ट्र रोजगार हमी कायदा २००६ मध्ये सुधारणा केल्यानंतर गावांतील प्रत्येक प्रौढ व्यक्तिची नोंद करून त्याने कामाची मागणी केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत हद्दीत कामे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ग्रामसभा ही कामाचे नियोजन करणारी यंत्रणा असून गावातील प्रौढ व्यक्तीकडून जॉबकार्डसाठी अर्ज स्वीकारणे व त्यांनी केलेल्या कामाच्या मागणीप्रमाणे शेल्फवरील मंजूर कामांपैकी आवश्यकतेप्रमाणे काम सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत हे कामाच्या नियोजनाच्या संदर्भात मूळ घटक आहे.

ग्रामपंचायत स्तरावर मग्रारोहयोचे अभिलेख व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीची म्हणजेच सरपंच व ग्रामसेवक यांची आहे. या कामात ग्रामसेवकांना मदत करण्यासाठी व संगणकीय माहिती इ. भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांच्या सेवा बाह्यस्थ (outsourcing) पद्धतीने घेतल्या जातात. ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात सुधारित मार्गदर्शक सुचना एकत्रितपणे देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना – Gram Rojgar Sevak:

ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात देण्यात आलेले आदेश अधिक्रमीत करून ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

१. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख व नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी सरपंच व ग्राम सेवकांची असेल. मात्र या कामात मदत करण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकाची असेल. त्यांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.

अ) ग्राम रोजगार सेवकाचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे असेल.

ब) ग्राम रोजगार सेवक पदाच्या मानधनातून त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालेल, अशी अपेक्षा त्याने धरू नये. ग्राम रोजगार सेवकाचे उत्पन्नाचे अन्य मार्ग असल्यास ते करून ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवक पदाचे काम करण्यास मुभा राहील. ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवक पदाचे हे मानधन त्याचे अधिकचे उत्पन्न असेल.

क) कामाच्या प्रमाणानुसार त्याला मानधन प्रदान केले जाईल.

ड) ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांची सेवा तात्पुरत्या स्वरुपाची असेल. ते राज्य शासन/जिल्हा परिषद/पंचायत समितीचे कर्मचारी नसतील. तसेच ते ग्रामपंचायतीचेही नियमीत कर्मचारी नसतील.

नियुक्ती प्राधिकारी:

अ) ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांच्या सेवा उपलब्धते संदर्भात ग्राम सभा (ग्रामपंचायत नव्हे) निर्णय घेईल.

ब) त्याला काढून टाकण्याच्या संदर्भात ग्रामपंचायत किंवा सरपंच यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसून केवळ ग्रामसभेस त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल.

क) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवक बदलू नये.

ड) सबळ कारणावरून ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकाला काढून टाकण्यापूर्वी त्याला नैसर्गिक न्यायानुसार ग्रामसभेत त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी आणि त्याबाबत ग्राम सेवकाचे अभिप्राय घ्यावेत.

इ) गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) किंवा तत्सम अधिकारी यांनी त्यांना नियुक्तीचे आदेश देऊ नयेत.

शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यकता:

राग्रारोहयोचे अभिलेख ठेवणे व ग्राम रोजगार सेवकांना मदत करणे हे ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकाचे काम असल्याने तो किमान दहावी पास असावा. (१२ वी पास असलेल्यास प्राधान्य राहील.)

अ) जर दहावी पास नसलेल्या उमेदवाराची नियुक्ती पुर्वी करण्यांत आलेली असेल तर त्याची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास हरकत नाही.

ब) त्याला वेबसाईटवर ग्रामपंचायत क्षेत्रातील राग्रारोहयोच्या कामाची माहिती भरण्याचे काम करावयाचे असल्याने पुढील ६ महिन्यामध्ये त्याने MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी लेखी कारणे नमूद करून फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर कालावधी पुढील ६ महिनेपर्यंत वाढवू शकेल. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल.

क) भविष्यात त्याच्या कामाच्या संदर्भात काही चाचण्या किंवा परीक्षा घेण्यात येतील. जर या परीक्षांमध्ये तो पास झाला नाही तर त्याला कामावरून कमी करण्यास तो पात्र राहील.

नियुक्तीच्या संदर्भात इतर अटी:

अ) उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असावे, तसेच गांवकऱ्यांचे त्याच्याबद्दल मत चांगले असावे.

ब) उत्तम आरोग्य असावे.

क) गावातील अंगमेहनतीचे काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तिना विशेषतः महिला, अनुसूचित जाती/जमातीच्या व अन्य तत्सम प्रवर्गातील ग्रामस्थांना ज्यांच्यामधून मुख्यतः मजूर उपलब्ध होणार असतात त्यांना संवेदनशिलतेने व व्यवस्थित हाताळण्याची क्षमता असावी.

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या:

१) मग्रारोहयोच्या संदर्भातील पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे, ते जतन करणे व त्यावर स्वाक्षरी करणे.

२) ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकाने ग्राम सेवकाचे मार्गदर्शनाखाली अभिलेखांमध्ये सर्व प्रकारच्या नोंदी घ्याव्यात. तसेच सर्व अभिलेख योग्य प्रकारे, व्यवस्थितपणे व परिपूर्ण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी ग्रामरोजगार सेवकाची राहील. तथापि, त्यावर नियंत्रण व प्रती स्वाक्षरी ग्रामसेवकाची राहील.

३) भविष्यात मजूरांच्या हजेरीसाठी वापरावयाची यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची क्षमता व तयारी असावी.

४) मजूरांचे हजेरीपत्रक तयार करणे, ते भरणे व सांभाळणे.

५) रोजगार कार्यक्रम गावात सुरळीतपणे व सुनियोजितपणे राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणे.

६) मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना व तत्सम तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणे, व शासनाच्या आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार कार्यक्रमा संदर्भात सहाय्य करणे.

७) मस्टर रोल गट विकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणे आणि बँक व पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून मजूरांच्या मजूरी प्रदानास विलंब होणार नाही याबाबत दक्ष राहणे.

८) मस्टरची प्राथमिक जबाबदारी ग्रामरोजगार सेवकाची राहील. मात्र प्रतिस्वाक्षरीबाबत खालीलप्रमाणे व्यवस्था राहील.

कामे  स्वाक्षरी              प्रतिस्वाक्षरी
ग्रामपंचायत  ग्राम रोजगार सेवकग्राम सेवक
यंत्रणा ग्राम रोजगार सेवक यंत्रणांचे तांत्रिक अधिकारी

९) दैनंदिन कामाची नोंद असलेली डायरी ग्रामरोजगार सेवकाने लिहीणे, व ग्रामसेवकास सादर करणे अनिर्वाय राहील.

१०) ग्रामरोजगार सेवकाने ठराविक दिवशी/वेळी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून कामाचे नियोजन करावे आणि त्याबाबतची माहिती ग्रामसेवकास देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करणे.

तसेच खालील शासन निर्णय दि. २ मे, २०११ मधील परिच्छेद क्र. ७ नुसार ग्रामरोजगार सेवकांना प्रदाने करण्याच्या संदर्भात दिलेल्या सूचना कायम ठेऊन त्याअनुषंगाने खालील प्रमाणे अधिक सूचना देण्यात आल्या आहेत.

अ) गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामरोजगार सेवकांना अदा करण्यात येणारे मानधन ग्रामसेवकांकडून त्यांच्या कामाचा अहवाल घेतल्यानंतर अदा करण्यात यावे.

ब) यंत्रणांद्वारे केल्या जाणाऱ्या कामाची गणना करुन विहीत दराने ग्रामरोजगार सेवकांना मानधन अदा करण्याबाबत कार्यवाही तहसिलदार यांनी करावी.

ग्रामरोजगार सेवकांनी नियमीत कामकाजात वरील प्रमाणे कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्यात तसेच ग्रामसेवकांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर सोपविलेली कामे त्यांच्याकडून पूर्ण करुन घ्यावीत. तसेच त्यांच्या कामाचा आढावा वेळोवेळी घेऊन त्यांना आवश्यक असेल तेथे मार्गदर्शन ग्रामसेवकांनी करावे.

गैरवर्तणूक:

१) मग्रारोहयोच्या अभिलेखाची नीट काळजी न घेणे व चांगल्या प्रकारे काम न करणे

२) भ्रष्टाचार व खोट्या हजेरी पत्रकाबाबत तक्रारी आल्यास त्या गैरवर्तणुकीशी संबंधित समजण्यात येतील.

३) मजुरांना वाईट वागणूक देणे.

४) मजुर व विशेषतः महिला मजुर यांचेशी गैरवर्तणुकीच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास मानधनात कपात करण्यापासून कामावरून निष्कासित करण्यापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

एका ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवकांची संख्या:

शक्यतो एका ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवक असावा. तथापि ग्रामपंचायत मोठी असल्यास किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे असल्यास किंवा आदिवासी व मागास भाग असल्यास किंवा जेथे ग्रामपंचायतीमध्ये जास्त गांवे विखुरलेल्या स्वरूपात असतील तर एकापेक्षा जास्त ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवक घेता येतील.

ग्राम रोजगार सेवकांना प्रदाने:

१) ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या मजुरीच्या प्रदानावर वेळोवेळी निश्चित केलेल्या दराने मानधन.

२) सदर मानधन ६% प्रशासकीय खर्चाच्या निधीमधून देण्यात येईल.

३) गट विकास अधिकाऱ्यांकडून शक्यतो दर पंधरा दिवसांनी मानधन अदा करण्यांत येईल. परंतु १ महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रदाने करू नयेत.

४) गट विकास अधिकारी कार्यालयात जाण्यासाठी किंवा ग्राम सेवकांच्या सूचनेप्रमाणे प्रवास करण्यासाठी केलेल्या खर्चाची तसेच अन्य तत्सम खर्चाची देयके ६% प्रशासकीय खर्चाच्या निधीमधून अदा करण्यात येतील.

ग्राम रोजगार (Gram Rojgar Sevak) सेवकांच्या सेवा उपलब्धतेबाबत वरीलप्रमाणे कार्यवाही करून, त्यांच्या सेवेचा वापर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यांत यावा.

हेही वाचा – ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारी संदर्भात शासन नियम

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना

  • प्रशांत बाळासाहेब धुमाळ

    ग्रामरोजगार सेवकांचे मानधन कोण देत आणि साधारणपणे ते किती असावे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.