गाव नमुना ८-अ उतारा धारण जमिनींची नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १६८ ( १ ) अन्वये महसुलाचे प्रदान करण्यासाठी प्रथमतः जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राज्य शासनाला जमीन महसूल आणि उपकर म्हणून देय असणाऱ्या रकमेचा हिशोब करण्यासाठी हा नमुना उपयोगी आहे. यालाच “खातेनोंदवही” असेही म्हणतात.
गाव नमुना ८-अ उतारा:
गाव नमुना आठ-अ मध्ये गावातील प्रत्येक शेतकऱ्याची, त्या गावात विविध ठिकाणी जी शेतजमीन आहे त्याची नोंद असते. गाव नमुना सात- बारा आणि आठ-अ च्या सहाय्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५१ अन्वये खातेपुस्तिका तयार करणे व विहित फी भरल्यानंतर त्याची प्रत देणे तलाठी यांना शक्य होते.
गावात प्रथम गाव नमुना आठ-अ तयार करताना प्रथम जमीन महसुलाचे प्रदान करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची नावे गाव नमुना सात मधून निच्छित केली जातात. अशा व्यक्तीची नावे कागदाच्या चिठ्यांवर लिहून नंतर त्यांना मराठी अक्षरांच्या वर्णानुक्रमे लावून स्वाभाविक क्रमानुसार अनुक्रमांक दिले जातात. हा अनुक्रमांक जमीन महसुलाचे प्रदान करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा आठ-अ मधील खाते क्रमांक बनतो. अशा रीतीने सर्व खाती उघडल्यानंतर गावात काही “मक्ता खाती ” शिल्लक राहतात. त्याची नोंद गाव नमुना आठ -ब मध्ये केली जाते.
गाव नमुना आठ-अ लिहिण्याची पद्धत:
गाव नमुना आठ-अ मध्ये गावातील प्रत्येक खातेदारासाठी स्वतंत्र पान विहित केलेले असते. जास्त जमीन असलेल्या खातेदारासाठी एकापेक्षा जास्त पाने विहित करता येतात. प्रत्येक खातेदाराला अनुक्रमांक दिले जातात. हे अनुक्रमांक दहा वर्षात कधीच बदलू नये. तथापि, गावात बरेच व्यवहार झाले असतील किंवा फेरजमाबंदी किंवा एकत्रीकरणाच्या झाले असेल तर किंवा दर दहा वर्षांनी गाव नमुना आठ-अ पुनर्लेखनाच्यावेळी या अनुक्रमांकात बदल होऊ शकतो.
गाव नमुना आठ-अ मध्ये खातेदारांची नावे लिहितांना ती मराठी अक्षरांच्या वर्णाक्षरानुक्रमे लिहावी. दर दहा वर्षांनी गाव नमुना आठ-अ चे पुनर्लेखन करायचे असते. दहा वर्षाच्या काळात नवीन निर्माण होणाऱ्या खात्याला या नोंदवहीतील शेवटचा क्रमांक देऊन नवीन खातेदाराचे नाव शेवटी लिहावे. अशा नवीन खातेदाराच्या नावाला मराठी वर्णाक्षरानुसार अनुक्रम देणे शक्य नसते. दर दहा वर्षांनी, साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गाव नमुना आठ-अ चे पुनर्लेखन करतांना अशा नवीन खात्यांना दिलेल्या अनुक्रमांची पुनर्रचना करून सर्व नवीन खाती पुन्हा मराठी वर्णाक्षरानुक्रमे लिहावी लागतात.
गाव नमुना आठ-अ मध्ये बदल करावयाची पद्धत:
एखाद्या खातेदाराने जमिनीची विक्री किंवा खरेदी केल्यास त्याच्या धारण क्षेत्रात आणि जमीन महसूल व स्थानिक उपकरात बदल होतो. त्यासाठी गाव नमुना आठ-अ मध्ये खाडाखोड करता येत नाही. खातेदाराच्या जमिनीत झालेले बदल अधिक (+) किंवा उणे (-) या चिन्हांनी दर्शवावा.
खातेदार नसलेल्या व्यक्तीने जमीन संपादन केल्यास अशा खातेदारास शेवटचा खाता क्रमांक देऊन त्याची नोंद या नोंदवहीत शेवटी करावी. एखादे खाते पूर्णतः बंद झाल्यास त्या खात्यावर “खाते रद्द”असा शेरा लिहावा.
खातेदार नसलेल्या व्यक्तीने एखाद्या खातेदाराच्या खात्यावरील संपूर्ण जमीन खरेदी केल्यास त्या नवीन खातेदारास या नोंदवहीतील शेवटचा क्रमांक न देता ज्या खातेदाराकडून संपूर्ण जमीन विकत घेतली आहे त्या खातेदाराच्या पानावरच जुन्या खातेदाराच्या नावाला कंस ( ) करून नवीन खातेदाराचे नाव लिहावे.
गाव नमुना आठ-अ मध्ये ताबडतोब दुरुस्ती करण्याची आवश्यकता नसते. जमीन महसूल वसुलीचा कालावधी साधरणतः ऑक्टोबर महिन्यात सुरु होतो. त्यापूर्वी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात गाव नमुना आठ-अ अद्ययावत करावा.
गाव नमुना आठ-अ अद्ययावत करतांना सर्व प्रलंबित फेरफारांचा निपटारा झाल्याची खात्री करावी, फेरफार नुसार गाव नमुना सात-बारा अद्ययावत असल्याची खात्री करावी तसेच गाव नमुना सात -बारा नुसार सर्व नोंदी गाव नमुना आठ-अ मध्ये अद्ययावत असल्याची खात्री करावी.
गाव नमुना गाव नमुना आठ-अ मध्ये एकूण ७ स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे असतात.
गाव नमुना गाव नमुना आठ-अ -स्तंभ १ मध्ये गाव नमुना सहा ( फेरफार नोंदवही ) मधील फेरफार क्रमांक असतो.
गाव नमुना गाव नमुना आठ-अ- स्तंभ २ मध्ये सदर शेत जमिनीचा भूमापन क्रमांक आणि हिस्सा क्रमांक असतो.
गाव नमुना गाव नमुना आठ-अ -स्तंभ ३ मध्ये सदर शेत जमिनीचे क्षेत्र हे हे.आर. मध्ये असते.
आठ अ उताऱ्यात स्तंभ क्रमांक – ३ क्षेत्र या स्तंभात (३ अ) लागवडीयोग्य क्षेत्र, (३ ब) पोटखराबा क्षेत्र (लागवडीयोग्य नसलेले) आणि (३क) एकूण क्षेत्र असे तीन उपस्तंभ करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्यात यावा, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच रकाना (३अ) मधील लागवडीयोग्य क्षेत्रच आकारणीस पात्र राहील. तर पोटखराबा क्षेत्रावर आकारणी लागू असणार नाही.
गाव नमुना आठ-अ मधील स्तंभ ४ ते ६ ब वसुलीच्या माहितीसाठी आहेत.
मध्ये खातेदाराचा गाव नमुना आठ-अ अन्वये दिलेला खाते क्रमांक असतो.
गाव नमुना आठ-अ- स्तंभ ४ मध्ये सदर शेत जमिनीची आकारणी किंवा जुडी रु. पै. मध्ये असते.
गाव नमुना आठ-अ- स्तंभ ५ मध्ये दुमाला जमिनीवरील नुकसान रु. पै. मध्ये असते.
गाव नमुना आठ-अ- स्तंभ ६ अ मध्ये स्थानिक जिल्हा परिषद कर रु. पै. मध्ये नमूद असते.
गाव नमुना आठ-अ- स्तंभ ६ ब मध्ये ग्रामपंचायत उपकर रु. पै. मध्ये नमूद असते.
गाव नमुना आठ-अ- स्तंभ ७ मध्ये एकूण येणे रक्कम रु. पै. मध्ये नमूद असते.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!