गाव नमुना ४ (संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती
गाव नमुना ४ या रकान्यात, गावातील पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी निश्चित केलेल्या संकीर्ण महसुलाच्या हिशोबाची नोंद असते. पाच किंवा अधिक कालावधीसाठी निश्चित केलेल्या जमीन महसुलाची नोंद गाव नमुना नंबर १, २ व ३ मध्ये असते. हा दररोज भरावयाचा नमुना आहे. आवश्यकता भासताच यात नोंद केली जाते.
गाव नमुना ४ (संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही):
संकीर्ण जमीन महसुलाची उदाहरणे:
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये आकारण्यात येणारे विविध प्रकारचे दंड, भाडे, फी, मोजणी फी, अतिक्रमण दंड व खर्च.
- बिनशेती जमिनीच्या बाबतचा रूपांतरित कर.
- वर्ग दोनच्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करताना आकारण्यात येणारी नजराणा रक्कम.
- भाडेपट्याने दिलेल्या शासकीय जमिनीचे भाडे.
- शासकीय जमिनीवरील गवत, लाकूड, फळे, इत्यादी वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम.
- ताडीच्या झाडांचे उत्पन्न
- सरकारी जमिनीची किंमत इत्यादी.
संकीर्ण जमीन महसुलाचे दोन प्रकार आहेत.
( १ ) स्थानिक उपकरांसह पात्र संकीर्ण जमीन महसूल: ज्या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्या उपयोगाशी असतो अशा संकीर्ण जमीन महसुलावर सर्व साधारण जमीन महसुलाच्याच दराने स्थानिक उपकर बसतो. ( उदा. जमीन भाडे )
( २ ) स्थानिक उपकरांसह अपात्र संकीर्ण जमीन महसूल: ज्या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्या उपयोगाशी नसतो त्यावर स्थानिक उपकर बसत नाही. ( उदा. दंडाची रक्कम )
गाव नमुना नंबर एक व दोनच्या बाबतीत संपूर्ण नोंदीची तपासणी न करता फक्त वाढ आणि घट यांचे ऑडिट होते. गाव नमुना नंबर चारच्या बाबतीत नोंदीचा कालावधी अल्प असल्यामुळे तसेच संपूर्ण नोंदी दरवर्षी नव्याने नोंदवल्या जात असल्यामुळे प्रत्येक नोंदीचे ऑडिट होणे आवश्यक असते.
संकीर्ण महसूल आकारणीचे अधिकार तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना असल्याने तलाठी यांनी संकीर्ण महसूल आकारणी स्वतः ठरवू नये. त्याबाबतचे प्रस्ताव तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना सादर करून योग्य ते आदेश घ्यावेत.
संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशाची कार्यवाही:
सक्षम अधिकाऱ्याच्या संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशाच्या दोन प्रति तहसील कार्यालयाकडे पाठविल्या जातात.
तहसिल कार्यालयातील जमाबंदी लिपिकाने या आदेशाची नोंद तालुका नमुना चार मध्ये संबंधित गावाच्या पानावर घ्यावी. व आदेशाची दुसरी प्रत संबंधित तलाठी यांचेकडे पाठवावी.
जमाबंदी लिपिकाकडून प्राप्त झालेल्या या आदेशाच्या प्रतीच्या माहितीवरून तलाठी यांनी गाव नमुना नंबर चार मध्ये नोंद घ्यावी.
संकीर्ण जमीन महसुलाची वसुली झाल्यानंतर वसुलीची सविस्तर माहिती, चलन नंबर सह वसुली करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्याने जमाबंदी लिपिकास व संबंधित तलाठी याना कळवावी.
अशा वसुलीची नोंद जमाबंदी लिपिकाने तालुका नमुना सात मध्ये घ्यावी व संबंधित तलाठी यांनी अशा वसुलीची नोंद गाव नमुना नंबर आठ ब मध्ये घ्यावी.
दरवर्षी जुलै /ऑगस्ट महिन्यात गाव आणि तालुका पातळीवर या हिशोबांचा मेळ घेण्यात यावा.
वाढीव शेतसारा हा एका वर्षासाठी निश्चित केला जात असल्याने त्याला ‘संकीर्ण जमीन महसूल’ म्हणण्यात येते, त्यामुळे वाढीव शेतसाऱ्याची नोंद गाव नमुना नंबर चार मध्ये घ्यावी. वाढीव शेतसारा स्थानिक उपकरांतुन मुक्त असतो.
शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या जमिनीवरील महसुलाची नोंद ( गाव नमुना नंबर एक, दोन, तीन, चार आणि आठ ब मध्ये करावी.
गाव नमुना चार आणि त्याचा गोषवारा दोन भागात ठेवण्यात यावा.
( १ ) नगर भूमापन सीमांतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठीचा गाव नमुना चार : हा गाव नमुना चार नगर भूमापन कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या गाव नमुना चारशी जुळता असावा. या गाव नमुना चारच्या अचूकतेची जबाबदारी नगर भूमापकाची राहील.
( २ ) नगर भूमापन सीमेच्या बाहेर येणाऱ्या क्षेत्रासाठीचा गाव नमुना चार : या गाव नमुना चारच्या अचूकतेची जबाबदारी तलाठी यांची राहील.
वरील दोन्ही भाग तालुका नमुना चारशी जुळते असावे.
गाव नमुना चार मध्ये एकूण ८ स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे भरावे.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( १ ) मध्ये अनुक्रमांक लिहावा.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( २ ) मध्ये प्रकरणाचा क्रमांक लिहावा.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( ३ ) मध्ये पात्र व्यक्तीचे नाव लिहावे.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( ४ ) मध्ये गाव नमुना आठ अ चा खातेक्रमांक लिहावा.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( ५ ) मध्ये स्थानिक उपकर रु. पै. या स्वरूपात लिहावा.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( ६ ) मध्ये स्थानिक उपकर पात्र रक्कम रु. पै. या स्वरूपात लिहावी.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( ७ ) मध्ये स्थानिक उपकर मुक्त रक्कम रु. पै. या स्वरूपात तीन उपभागात लिहावी.
स्तंभ ( ७ – अ ) मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १७४ खालील ( जमीन महसूल भरण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती ) दंडाची रक्कम रु. पै. या स्वरूपात लिहावी; स्तंभ ( ७ – ब ) मध्ये नोटीस फी ची रक्कम रु. पै. या स्वरूपात लिहावी. स्तंभ ( ७ – क ) मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १५२ खालील ( माहिती देण्यास हयगय केल्याबद्दल दंड ) रक्कम रु. पै. या स्वरूपात लिहावी.
गाव नमुना चारच्या स्तंभ ( ८ ) हा शेरा स्तंभ आहे.
गाव नमुना चारच्या गोषवाऱ्यात एकूण स्थानिक उपकर, (एक) मध्ये स्थानिक उपकर असलेला जमीन महसूल आणि ( दोन ) मध्ये स्थानिक उपकर नसलेला जमीन महसूल तसेच एकत्रीकृत जमीन महसूल, वसुली आणि शिल्लक रक्कम रु. पै. या स्वरूपात लिहावी.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!