आता राज्यातील शासनाच्या तसेच खाजगी जमिनीवर खोदकाम करण्यापूर्वी Call Before u Dig (CBuD) या प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक !
राज्यात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी करताना मोठया प्रमाणात उत्खनन केले जाते. या उत्खननामुळे त्याठिकाणी आधीच अस्तित्त्वात असलेल्या इतर पायाभूत सुविधांना (उदाहरणार्थ रस्ते, पाण्याचे नळ, मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार पायाभूत सुविधा, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या, ऑप्टीकल फायबर केबल्स्, इत्यादी) हानी पोहोचते. यामुळे मालमत्ता व सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच सेवांचा पुरवठा खंडीत होऊन नागरिकांची गैरसोय होते, उत्खनन करणाऱ्या विविध संस्थामध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने Call Before u big (CBUD) या प्रणालीची निर्मिती केली असून या प्रणालीद्वारे उत्खनन संस्था आणि पायाभूत सुविधा मालमत्ता मालक विभाग यांच्यात समन्वय घडवून आणण्यात येणार आहे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय यांनी दि. ०३.०१.२०२३ रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक सी.जी.डी.एल.अ.०३०१२०२३ २४१६४० अन्वये खोदकाम करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांना खोदकाम करण्याच्या कार्यवाहीसाठी Call Before u big (CBUD) या सामाईक प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्या धर्तीवर राज्यातील सर्व मालमत्ता धारक विभाग व सर्व खोदकाम करणाऱ्या संस्थांना Call Before u Dig. (CBuD) या प्रणालीवर नोंदणी करणे व त्याचा वापर करणे बंधनकारक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील शासनाच्या तसेच खाजगी जमिनीवर खोदकाम करण्यापूर्वी Call Before u Dig (CBuD) या प्रणालीवर नोंदणी करण्याबाबत शासन निर्णय:
राज्यात विविध प्रकारच्या खोदकामामुळे रस्ते, पाण्याचे नळ, मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार पायाभूत सुविधा, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या, ऑप्टीकल फायबर केबल्स्, इत्यादी सेवांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच या सेवांना पोहोचणाऱ्या हानीमुळे नागरिकांना निर्माण होणारी असुविधा टाळण्यासाठी, असे उत्खनन करण्यापूर्वी उत्खनन करणाऱ्या संस्था व मालमत्ता धारक विभाग यांना Call Before U Dig (National Broadband Mission, DoT) या प्रणालीवर त्यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे. सदर प्रणाली (App) Android Mobile Phone (भ्रमणध्वनी) मध्ये उपलब्ध असलेल्या Play Store आणि IOS Mobile Phone (भ्रमणध्वनी) मध्ये उपलब्ध असलेल्या App Store मधून Download करता येईल.
सद्य:स्थितीत वर नमूद केलेल्या सेवांसाठी उत्खनन करणाऱ्या संस्था व मालमत्ता धारक विभागांना शासनाच्या खालील विभागांमार्फत नियुक्त केले जाते. म्हणून खालील विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालये व संस्थांना (उत्खनन करणाऱ्या संस्था व मालमत्ता धारक विभाग) Call Before u Dig (CBuD) या प्रणालीवर नोंदणी करुन घेणे बंधनकारक करण्यात येत आहे.
१) नगर विकास विभाग
२) ग्रामविकास विभाग
३) सार्वजनिक बांधकाम विभाग
४) उद्योग विभाग
५) वन विभाग
६) परिवहन व बंदरे, गृह विभाग
७) उर्जा विभाग
८) जलसंपदा विभाग
९) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
उत्खनन करण्यापूर्वी ज्या ठिकाणी उत्खनन करावयाचे आहे अशा मालमत्तेशी संबंधित व्यक्ती / संस्था / प्राधिकरणे / कार्यालये यांच्या कायदेशीर परवानगीनंतर खोदकाम करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संबंधितांनी त्यांना करावयाच्या खोदकामाची नोंदणी Call Before u Dig (CBuD) प्रणालीवरून करून खोदकामाची पूर्व सूचना द्यावयाची आहे. प्रस्तावित उत्खनन स्थळी असलेल्या विविध पायाभूत सुविधांची मालकी असणाऱ्या व्यक्ती / संस्था / प्राधिकरणे / कार्यालये सदर सूचनेबाबत तातडीने कार्यवाही करतील व तिथे असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत खोदकाम करू इच्छिणाऱ्या संस्थेस विहित कालावधीत माहिती उपलब्ध करून देतील.
खोदकाम करणाऱ्या संस्था प्राप्त माहितीनुसार योग्य ती काळजी घेऊन प्रस्तावित स्थळी खोदकामाबाबतची कार्यवाही करतील.
प्रस्तावित स्थळी असलेल्या पायाभूत सुविधांची मालकी असणाऱ्या संस्थाकडून विहित कालावधीत जर कोणतीही माहिती पुरविण्यात आली नाही तर खोदकामाची सूचना देणाऱ्या संस्थेस प्रस्तावित स्थळी खोदकाम करण्यास स्वातंत्र्य असेल.
सदर नियमांचा भंग केल्यास करावयाची दंडात्मक कार्यवाही:
१. खोदकाम करणाऱ्या संस्थाकडून खोदकाम करताना तिथे असलेल्या पायाभूत सुविधांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचल्यास खोदकाम करणारी संस्था पायाभूत सुविधा मालकास नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरतील.
२. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकारणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरानुसार करण्यात यावी. तथापि, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दर उपलब्ध नसल्यास नसल्यास सीपीडब्लूडीच्या दरानुसार करण्यात यावी.
Call Before u Dig मोबाईलॲप (CBuD) : Call Before u Dig मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
Call Before u Dig संकेतस्थळ : Call Before u Dig प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय: राज्यातील शासनाच्या तसेच खाजगी जमिनीवर खोदकाम करण्यापूर्वी Call Before u Dig (CBuD) या प्रणालीवर नोंदणी करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – आपले सरकार २.० – तक्रार निवारण प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत ! Aaple Sarkar 2.0 Grievances Maharashtra
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!