अटल बांबू समृध्दी योजना – Atal Bamboo Prosperity Scheme
बांबू हे एक बहुपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्टया अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (Green Gold) असे संबोधले जाते. त्याचे गरीबांचे जीवनात व ग्रामीण उद्योगात विशेष स्थान आहे.
बांबू क्षेत्राचा समुचित विकास करणे व या माध्यमातून स्थानिकांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू अभियान (N.B.M.) ची स्थापना केलेली आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांची उपजिवीका उंचावण्यासाठी शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यु कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी “अटल बांबू समृध्दी योजना” राबविण्याकरीता मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय २८ जून २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी मागणी केल्यास १ हेक्टर क्षेत्राकरिता ६०० टिश्यू कल्चर रोपे घ्यावयाचे प्रावधान करण्यात आले आहे. तसेच सदर योजनेंतर्गत रोपे लागवड, निंदणी, संरक्षण इत्यादी खर्च मात्र शेतकऱ्यांने करावयाचा होता. रोपांचे किंमतीच्या ८० टक्के किंवा ५० टक्के अनुदान म्हणून अनुक्रमे ४ हे.चे खाली किंवा ४ हे. चे वर भुधारणा असल्यास देय होते. त्यानुसार योजनेंतर्गत बांबू लागवड करण्याकरीता फक्त ६०० रोपे देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, रोपांचे देखभालीकरीता सदर शासन निर्णयात तरतूद करण्यात आलेली नाही.
राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत बांबू लागवडीकरीता एकुण रु.१२०/- अनुदान ३ वर्षात विभागून द्यावयाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याला लागवड, खत, निंदणी या कामासाठी अनुदानातून हातभार लागत आहे. या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. परंतु सदर केंद्र पुरस्कृत योजनेतून अत्यल्प अनुदान उपलब्ध होते.
त्यामुळे राष्ट्रीय बांबू अभियान योजने समरुप अटल बांबू समृध्दी योजने अंतर्गत शेतकऱ्याला बांबू रोपे उपलब्ध करुन देण्यासोबतच खत, निंदणी, पाणी देणे, संरक्षण या कामासाठी अनुदान देणे उचित ठरेल. मागील पाच वर्षात रोजंदारी मजुरीचे वाढलेले दर विचारात घेता, शेतकऱ्यांना रु. १७५/- प्रतीरोप इतके अनुदान ३ वर्षात (रु.९०+ रु.५०+ रु.३५) विभागून देण्याची तरतूद केल्यास राज्यात बांबू लागवडीला भरपूर प्रतिसाद मिळून बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्याचे उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
त्यानुषंगाने अटल बांबू समृध्दी योजनेच्या दिनांक २८ जून २०१९ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करुन सदर योजना नव्याने राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
अटल बांबू समृध्दी योजना – Atal Bamboo Prosperity Scheme:-
दिनांक २८ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अटल बांबू समृध्दी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती. तथापि, त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्याची तरतूद सदर योजनेत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या धर्तीवर अटल बांबू समृध्दी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीकरीता अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे.
दिनांक २८ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला १ हेक्टरसाठी ६०० रोपे देण्याची तरतूद आहे. तसेच सदर शासन निर्णयात फक्त रोपांचे किमतीपैकी ८० टक्के किंवा ५० टक्के अनुदान लाभार्थ्यांचे भूधारणा मर्यादेनुसार देण्याची तरतुद आहे. रोपवनातील निंदणी, पाणी देणे, खत देणे, संरक्षण इत्यादी करिता तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर तरतुद रद्द करुन त्याऐवजी २ हेक्टरकरिता १२०० रोपे लागवड व देखाभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे.
योजनेचे उद्दीष्ट :-
अ) शेतक-यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे.
ब) शेतीतून मिळणा-या उत्पन्नाला जोड देण्यासाठी व हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी सहाय्यभूत होण्यासाठी तसेच उद्योगाच्या दर्जेदार कच्चा मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडी खालील क्षेत्र वाढविणे,
क) बांबू लागवडीमुळे शेतक-यांचे उपजिवीकेचे साधन निर्माण करणे आणि शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांची उपजिवीका उंचावण्यास मदत करणे.
टिश्यू कल्चर बंबू रोपकरी प्रजाती
महाराष्ट्रामध्ये मानवेल (Dendrucalamus strictus), कटांग (Bambusa bambusa) या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर मानगा (Oxytenenthara stocksii) ही प्रजाती ही कोकण क्षेत्रात मोठया प्रमाणात आढळून येते.
बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्या तज्ञांसोबत चर्चा करुन वरील ३ स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील ५ प्रजाती निवडण्यात आलेल्या आहेत.
1) Bambusa balcooa
2) Dendrocalamus brandisii
3) Bambusa nutan
4) Dendrocalamus asper
5) Bambusa tulda
वरील नमूद बांबूच्या प्रजाती व्यतीरिक्त इतर प्रजातीचा आवश्यकतेनुसार समावेश करण्याचा अधिकार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म.रा. नागपूर यांचे अध्यक्षतेखाली समितीस देण्यात येत आहे.
योजनेच्या सर्वसाधारण तरतूदी :-
अ) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म.रा. नागपूर यांचे अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने निश्चित केलेल्या दरानुसार टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा केला जाईल.
ब) सदर योजनेअंतर्गत टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षाकरिता प्रति रोपे रु. ३५०/- खर्च अपेक्षित असून त्यापैकी ५०% रक्कम अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल. तसेच सदर अनुदानाची विभागणी वर्षनिहाय रु.९०/- रु.५०/- रु.३५/-= रु. १७५/- याप्रमाणे प्रथम/द्वितीय / तृतीय याप्रमाणे करण्यात येत आहे. पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची रक्कम अनुदानाचे प्रथम वर्षीय हफ्त्यामधून समायोजीत करण्यात यावी.
क) सदर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला २ हेक्टर क्षेत्राकरीता ६०० रोपे प्रति हेक्टर याप्रमाणे एकुण १२०० बांबू रोपे (५५४ मी. अंतरावर) लागवड व देखभालीकरीता अनुदान देण्यात येईल.
ड) लाभार्थ्यांची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी/ बांबू शेतकऱ्यांचा समूह यातील सभासदांना एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तद्नंतर खाजगी शेतकऱ्यांकडून/एकएकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाईल. वरील अनुदान दोन हेक्टर पर्यंत सर्व शेतकऱ्यांना देय राहील.
इ) अटल बांबू समृध्दी योजनेच्या अंमलबजावणीकरीता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म.रा. नागपूर यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून, सदर समितीमध्ये खालील सदस्याची नियुक्ती करण्यात येत आहे.
ई) सदर योजना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर यांचेमार्फत राबविण्यात येईल.
सदर योजनेंतर्गतचा खर्च हा प्रधानशिर्ष ४४०६ वनीकरण व वन्यजीव यावरील भांडवली खर्च (००) (०६) सामुहीक पातळीवर ठोस रोपवन वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम (४४०६-०४९२) या लेखाशिर्षाखाली उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.
सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दि. ०५.०२.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार आणि सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अ.नौ.सं.क्र.६८/१४७५, दि.०१.१२.२०२३ अन्वये व वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.३८८/२०२३/व्यय-१०, दिनांक ०७.१२.२०२३ अन्वये प्राप्त सहमतीनुसार तसेच वित्त विभागाच्या दिनांक १२.०४.२०२३ रोजीचे परिपत्रक आणि वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र/२०१३/प्र.क्र.३०/ २०१३/ विनिमय, भाग-२, दिनांक १७.४.२०१५ अन्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग शासन निर्णय : शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृध्दी योजना राबविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड – पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!