महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

वन महोत्सव कालावधीत अमृतवृक्ष आपल्या दारी योजना

राष्ट्रीय वननीती १९८८ नुसार पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे. तथापि महाराष्ट्र राज्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या हे प्रमाण कमी आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण व औद्योगिकरणामुळे वातावरण बदल होऊन जागतिक तापमान वाढ होत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेला अत्यंत महत्त्व आहे.

महाराष्ट्र राज्य हरितीकरणाच्या विविध योजना राबवून राज्याचे हरित आच्छादन वाढविण्यामध्ये आणि देशाच्या वन धोरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नांमध्ये अग्रेसर आहे. राज्याने यापूर्वी ५० कोटी वृक्ष लागवड, बेल वन, अमृत वन, पंचायतन वन अशा योजनांच्या माध्यमातून वनीकरणासोबतच लोकसहभाग वाढविण्याचा आणि जनपरंपरांचा आधार घेऊन वन आणि वृक्ष संवर्धनाचा प्रयत्न केला आहे. दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.

या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. याव्यतिरिक्त केंद्र शासनाकडून अलिकडेच “एक पेड माँ के नाम – Plant4Mother” ही संकल्पना राबविणेबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत.

१५ ऑगस्ट २०२२ मध्ये आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली असून अमृतकाळ सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी, आणि प्रत्त्येकाचा यात सहभाग मिळावा तसेच येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्र वनविभागामार्फत वनमहोत्सव काळात “अमृतवृक्ष आपल्या दारी” योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेद्वारे प्रत्येक नागरिकास अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये सहभाग घेता येऊ शकेल व पर्यावरण संवर्धनामध्ये सहभागी होता येईल.

वन महोत्सव कालावधीत अमृतवृक्ष आपल्या दारी योजना:

केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम Plant4Mother” योजनेची देखील पूर्तता व्हावी तसेच राज्याने यापूर्वी अवलंबिलेले वृक्ष लागवडीचे धोरण अखंडपणे पुढेही चालू राहावे आणि या कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामुहिक पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना माफक दरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वन महोत्सवाच्या कालावधीत “अमृतवृक्ष आपल्या दारी” योजना राबविण्याच्या उद्देशाने तसेच त्यानंतरच्या सर्वसाधारण कालावधीत खाली नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.रोपांचे वर्गीकरणरोपांची प्रतवारीवन महोत्सव कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप (रुपये)सर्वसाधारण कालावधीत प्रति रोपाचा दर (रुपये)
९ महिन्यांचे सर्वसाधारण प्रजातीचे रोपA२१३३
B१३२६
C११२४
2१८ महिन्यांचे व त्यावरील सर्वसाधारण प्रजातीचे रोपA५३८३
B३२६७
C२६६०
3बांबू कंदA१७
B१२
4१५ महिन्यांचे पिशवीतील बांबू रोपA१३२५
B१८

ज्या शासकीय यंत्रणांना/स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करावयाची आहे व त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे मात्र त्यांच्याकडे रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद उपलब्ध नाही, अशा यंत्रणांना या वन महोत्सव कालावधीत उपलब्ध जागेच्या प्रमाणात वृक्षलागवड करणेसाठी आवश्यक रोपांचा मोफत पुरवठा नजिकच्या रोपवाटिकेतून रोपांच्या उपलब्धतेनुसार केला जाईल. याव्यतिरिक्त वनीकरणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनुभवी अशासकीय संस्थांना शासकीय जमिनीवर (वनेत्तर) वृक्षलागवड करावयाची असल्यास त्यांनी आवश्यक असलेल्या रोपांची मागणी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत केल्यास त्यांना देखील रोपांचा मोफत पुरवठा उपलब्धतेनुसार करण्यात येईल.

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होणेकरिता व या कार्यात त्यांचा अधिकाअधिक सहभाग मिळवण्याकरिता आणि अशा शाळा व महाविद्यालयांच्या परिसरांभोवती संरक्षक भिंती असल्याने रोपांचे संरक्षण व संवर्धन होणे सोयीचे असल्याने वृक्ष लागवड करू इच्छिणारी शाळा / विद्यालय/ महाविद्यालय यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना वन महोत्सव कालावधीत मागणीनुसार मोफत रोपांचा पुरवठा उपलब्धतेनुसार करण्यात येईल.

पोलिस, संरक्षण बल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात क्षेत्र व मनुष्यबळ उपलब्ध असते. संरक्षण बलाकडील क्षेत्र हे संरक्षित असल्यामुळे तिथे लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची हमी असते. तथापि, त्यांच्याकडे वनीकरणासाठी सामान्यतः आर्थिक तरतूद नसते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या संरक्षण बलांना वनमहोत्सव कालावधीत उपलब्ध जागेनुसार वृक्षलागवड करणेसाठी रोपांचा मोफत पुरवठा नजिकच्या रोपवाटिकेतून केला जाईल. तसेच संरक्षण बल यांची मागणी असल्यास व शासकीय रोपवाटिकेत रोपे उपलब्ध असल्यास वन महोत्सव कालावधी व्यतिरिक्त सर्वसाधारण कालावधीमध्ये देखील सदरील तरतूद लागू राहील.

उपरोक्तप्रमाणे यंत्रणा/संस्था यांना लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा विभागीय वन अधिकारी, (सामाजिक वनीकरण विभाग) यांचेकडे सोबतच्या मागणी पत्राद्वारे करावी. रोपाची उचल करून वाहतूकीसाठी होणारा खर्च संबंधित यंत्रणा/संस्थेने करावा. सदर यंत्रणा/संस्थांनी पुरवठा करण्यात आलेल्या रोपांच्या लागवडीची माहिती संबंधित विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण / उप वन संरक्षक, प्रादेशिक यांचेकडे देणे बंधनकारक राहील. लागवड केलेल्या रोपांचे Geo Tagging करून पुढील ३ वर्षापर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी (ऑक्टोबर / मे) या कालावधीत घेऊन संबंधीत यंत्रणेने त्याची नोंद त्यांच्याकडील नोंदवहित ठेवावी.

वन महोत्सव कालावधीत “अमृतवृक्ष आपल्या दारी” हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी शहरी भागात मागणीनुसार वनमहोत्सव केंद्र (कमाल १० पर्यंत) १५ जून, २०२४ ते १५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत शासकीय कार्यालयाच्या आवारात उघडून त्याद्वारे रोपे पुरवठा करण्यात यावा. यासाठी उपवनसंरक्षक (प्रादेशिक) व विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण विभाग) यांनी समन्वय साधून वनमहोत्सव केंद्र उघडण्यासाठी कार्यवाही करावी.

वन महोत्सवाच्या कालावधीत (दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर) “अमृतवृक्ष आपल्या दारी” योजनेचे व वन महोत्सवाचे प्रयोजन व महत्व याबाबत प्रभावीपणे सर्वदूर पोहोचणाऱ्या माध्यमातून जिल्हा माहिती अधिकारी / विभागाचे Social Media Handles/ विभागाची Website यांचेमार्फत योग्य प्रसिद्धी करण्यात यावी.

अमृतवृक्ष योजनेत लागवड केलेल्या रोपांची माहिती शासकीय यंत्रणा/शाळा/महाविद्यालये / नागरिक यांनी वन विभागाच्या विकसित केलेल्या “अमृतवृक्ष” मोबाईल अॅप वेब अॅप मध्ये स्वेच्छेने भरण्यास आवाहन करण्यात येत आहे. मोफत पुरवठा केलेल्या रोपांची माहिती संबंधित शासकीय यंत्रणेने सदर अॅपवर भरणे आवश्यक आहे.

वनमहोत्सव योजनेंतर्गत उपरोक्त नमूद केल्यानुसार दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर या वनमहोत्सव कालावधीत मोफत रोपे वाटप, सवलतीच्या दराने वाटप करणे, “अमृत वृक्ष आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रोपे वाटप करणे व सदर योजनेच्या प्रसिध्दीकरीता होणारा खर्च मागणी क्रमांक सी-७, मुख्य लेखाशिर्ष-२४०६ वनीकरण व वन्यजीव-१०१-वन संरक्षण व विकास व पुनर्निर्मिती-(११) (३४) (२४०६ ८५५१) (कार्यक्रम) या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

महसूल व वन विभाग शासन निर्णय : वन महोत्सव 2024-25 वन महोत्सव कालावधीत अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना राबविण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – अन्न व पोषण सुरक्षा अभियानात विविध बाबींसाठी अनुदान

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.