बियाणे वितरण लॉटरीनंतर उर्वरीत लक्षांकाकरीता लाभार्थी निवडीची कार्यपद्धती
राष्ट्रीय खाद्य तेल अभियान/राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (सर्व पिके) व राज्य पुरुस्कृत कापूस/गळीतधान्य योजना सन २०२२-२३ अंतर्गत पिक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीसाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे लॉटरी काढण्यात आली आहे.
बियाणे वितरण लॉटरीनंतर उर्वरीत लक्षांकाकरीता लाभार्थी निवडीची कार्यपद्धती – seed distribution lottery:
मंजूर लक्षांकाच्या तुलनेत महाडीबीटी प्रणालीवर शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्ज संख्या कमी असून निघालेली लॉटरीही पुरेश्या प्रमाणात न निघाल्याचे निदर्शनास आले आहे. लॉटरी पश्चात शिल्लक राहिलेल्या लक्षांकाच्या पुर्तेतेच्यादृष्टीने खालील कार्यपद्धती अवलंबवावी असे निर्देश कृषी आयुक्त महाराष्ट्र सरकारने कृषी अधिकारी यांना दिले आहेत.
अ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (सर्व पिके) व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य):
१) पिक प्रात्यक्षिक
- लॉटरी निघाल्यानंतर पोर्टलवरील अर्ज केलेले जिल्हाअंतर्गत व तालुकाअंतर्गत शिल्लक लाभार्थी यांना प्रथम लाभ देण्यात यावा. याकरीता डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षायादीप्रमाणे लाभ देण्यात यावा.
- वरील पद्धतीनंतर देखील लक्षांक शिल्लक राहत असल्यास लक्षांकाइतके लाभार्थी आत्मा गट, शेतकरी गट व मागासवर्गीय गट व आदिवासी शेतकरी यांच्याकडून (मार्गदर्शक सुचनेनुसार SC/ST लाभार्थ्यांचे प्रमाण राखण्याकरीता) अल्प मुदतीची नोटीस प्रसिद्ध करून अर्ज प्राप्त करून घेऊन स्थानिक सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करून लक्षांक पूर्ण करण्यात यावा.
- ज्याठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी केलेले वाण उपलब्ध नाही त्याठिकाणी जे वाण उपलब्ध आहेत, ते शेतकऱ्यांना देण्यात यावेत. शेतकऱ्यांनी मागणी केलेले वाण उपलब्ध नाहीत म्हणून डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यास योजनेपासून वंचित ठेवण्यात येऊ नये.
- प्रमाणित बियाण्याची उपलब्धता नसल्यास अश्या प्रसंगी आयुक्तालयाने यापूर्वी सूचित केल्याप्रमाणे तंत्रज्ञान आधारीत पिक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात यावीत.
- ज्या शेतकऱ्यांनी आंतरपीक प्रात्याक्षिकांकरीता नोंदणी केलेली आहे परंतु अश्या ठिकाणी कुठल्याही एका पिकाचे बियाणे उपलब्ध असल्यास दुसऱ्या पिकाचे घरचे बियाणे वापरून त्या शेतकऱ्याला आंतरपीक प्रात्यक्षिकांचा लाभ देण्यात यावा. आंतरपिक मध्ये एखादे बियाणे उपलब्ध नाही म्हणून लाभार्थ्यास योजनेपासून वंचित ठेवण्यात येऊ नये. अर्ज केलेल्या आंतरपिकांपैकी जे बियाणे उपलब्ध आहे त्या बियाण्याचा लाभ देण्यात यावा.
२) प्रमाणित बियाणे वितरण
- प्रमाणित बियाणे वितरणाकरीता जर तालुक्यात लाभार्थी शिल्लक नसतील तर जिल्हामध्ये इतर ठिकाणी डीबीटीपोर्टलवर नोंदणी केलेले लाभार्थी यांना प्रथम लाभ देण्यात यावा.
- असे लाभार्थी संपल्यानंतर देखील जर लक्षांक शिल्लक राहत असेल तर त्या परिस्थितीत त्या तालुक्याच्या शिल्लक राहिलेल्या लक्षांकाइतकी लाभार्थी आत्मा गट, शेतकरी गट व मागासवर्गीय गट व आदिवासी शेतकरी यांच्याकडून (मार्गदर्शक सुचनेनुसार SC/ST लाभार्थ्यांचे प्रमाण राखण्याकरीता) अल्प मुदतीची नोटीस प्रसिद्ध करून अर्ज प्राप्त करून घेऊन स्थानिक सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करून लक्षांक पूर्ण करण्यात यावा.
- ज्याठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी केलेले वाण उपलब्ध नाही त्याठिकाणी जे वाण उपलब्ध आहेत, ते शेतकऱ्यांना देण्यात यावेत. शेतकऱ्यांनी मागणी केलेले वाण उपलब्ध नाहीत म्हणून महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यास योजनेपासून वंचित ठेवण्यात येऊ नये.
ब) राज्य पुरुस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास विशेष कृति योजना:
- सदर योजनेबाबत उपरोक्त मुद्दा क्र. अ (१) प्रमाणे कार्यवाही करावी.
- त्याव्यतिरिक्त खालील कार्यपद्धती अवलंबण्यात यावी.
- योजना समूह आधारित पद्धतीने राबवायची असून याअंतर्गत निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांचा १०० हे. च्या समूहात समावेश करावा.
- याव्यतिरिक्त इतर गावातील शेतकऱ्यांची लॉटरीमध्ये निवड झाली असल्यास अश्या लाभार्थ्यांना लाभ देणे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यांना प्राधान्याने राष्ट्रीय खाद्य तेल अभियानातून पिक प्रात्यक्षिक किंवा प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत लाभ देण्यात यावा.
- लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांचा रा.खा.ते. (NFSM – Oilseed) प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे वितरण, मिनिकीट किंवा राज्य योजना प्रात्यक्षिक यापैकी कोणत्याही एका योजनेमध्ये समावेश करून घेण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेला लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे पाहावे.
क) राज्य पुरुस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास विशेष कृति योजना:
- योजना समूह आधारित पद्धतीने राबवायची असून याअंतर्गत निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांचाच १०० हे. च्या समूहात समावेश असावा.
- याव्यतिरिक्त इतर गावातील शेतकऱ्यांची लॉटरीमध्ये निवड झाली असल्यास अश्या लाभार्थ्यांना लाभ देणे क्रमप्राप्त असल्यामुळे अश्या लाभार्थ्यांना प्राधान्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कापूस) योजनेतून पिक प्रात्यक्षिक या बाबीअंतर्गत लाभ देण्यात यावा.
- लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कापूस) प्रात्यक्षिक किंवा राज्य योजना प्रात्यक्षिक यापैकी कोणत्याही एका योजनेमध्ये समावेश करून घेण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेला लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे पाहावे.
- कापूस पिकाकरीता शेतकऱ्यांचा ठराविक खाजगी उत्पादित बियाण्यासाठी आग्रह असतो. यासाठी सदरील राज्य पुरुस्कृत योजनेत शेतकऱ्यांच्या गटांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना वाणाची निवड करण्याची मुभा द्यावी. तथापि, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कापूस) योजनेमध्ये केंद्र शासनाच्या Re – vemped मार्गदर्शक सूचनानुसार कृषि विद्यापीठे किंवा केंद्रीय संशोधन संस्था यांचे बी.टी. वाण किंवा राज्यासाठी शिफारस केलेले नॉन बी.टी. वाण यांचाच वापर करावा.
महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!