महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य प्रवास व दैनिक भत्ते नियम १९६६
आपण या लेखात ग्रामपंचायत सदस्य प्रवास व दैनिक भत्ते नियम १९६६ विषयी सविस्तर माहिती घेऊया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) याच्या कलम १७६, पोट – कलम (२), खंड (चार -अ) आणि कलम ३२-अ अन्वये सदस्यांना द्यावयाचे प्रवास भत्ते व दैनिक भत्ते नियमानुसार पंचायतीचा सरपंच व उपसरपंच धरून पंचायतीच्या सदस्यांना पंचायतीच्या कोणत्याही कामकाजाच्या संबंधात केलेल्या प्रवासांसाठी विहित करण्यात येईल असा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देता येईल अशी तरतूद आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य प्रवास व दैनिक भत्ते नियम:
1) या नियमांच्या उपबंधास अधीन राहून पंचायतीच्या सदस्याने राज्यशासन किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती याद्वारे किंवा त्यांच्या वतीने आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिर, चर्चामंडळ, स्नेहसंमेलन किंवा संमेलन यांना उपस्थित राहण्यासाठी प्रवास भत्ता व दैनिक भत्ता मिळण्याचा हक्क राहील.
2) पंचायतीच्या कोणत्याही कामकाजासंबंधात पंचायत समितीच्या सभापतीच्या मान्यतेने, केलेल्या प्रवासाबद्दल; मुंबई नागरिक सेवा नियम, १९५९ या अन्वये दरमहा [१९०] रूपयांहून अधिक वेतन मिळणाऱ्या तृतीय श्रेणीच्या शासकीय कर्मचाऱ्यास जे दर अनुज्ञेय आहेत त्याच दरांनी त्यास प्रवास भत्ता व दैनिक भत्ता मिळण्याचा हक्क राहील.
3) पंचायतीच्या कोणत्याही सदस्याने संबंधित पंचायतीचे मुख्यालय किंवा अशा पंचायतीची हद्द किंवा त्याच्या निवासस्थानाचे उपयोगी ठिकाण यांपैकी जे ठिकाण दूरचे असेल त्यापासून [आठ किलोमीटर्सचे] आत केलेल्या कोणत्याही प्रवासांच्या बाबतीत त्यास असा प्रवासभत्ता किंवा दैनिक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
प्रवास भत्ता व दैनिक भत्ता याबाबतची मागणी केव्हा स्वीकारू नये:
नियम ३ अन्वये केलेल्या प्रवासाच्या बाबतीत प्रवास भत्ता व दैनिक भत्ता यांची मागणी करणाऱ्या कोणत्याही बिलासोबत असा प्रवास करणे आवश्यक आहे किंवा त्यास परवानगी दिली आहे असे त्या नियमात निर्दिष्ट केलेल्या प्राधिकाऱ्याचे पत्र (मूळ पत्र किंवा त्याची रीतसर प्रमाणित केलेली प्रत) असल्याखेरीज असे बिल पंचायतीच्या चिटणिसाने स्वीकारता कामा नये.
इतर मार्गाने प्रवास भत्ता मिळविला असेल, तेव्हा कोणताही प्रवास भत्ता देता कामा नये:
उक्त प्रवासाबद्दल प्रवास भत्ता व दैनिक भत्ता इतर कोणत्याही मार्गाने मिळविला असेल तर, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता यांबाबतची कोणतीही मागणी ह्या नियमान्वये अनुज्ञेय असणार नाही.
मागणी दाखल करण्यासाठी कालमर्यादा:
1) ज्या प्रवासाच्या बाबतीत प्रवास भत्त्याची मागणी करण्यात आली असेल असा प्रवास ज्या वित्तीय वर्षात केला असेल, त्या वित्तीय वर्षात अशा प्रवास भत्त्याची मागणी केली पाहिजे.
2) ज्या महिन्यात प्रवास करण्यात आला असेल त्या महिन्याच्या पुढील महिन्याच्या १५ व्या दिवसापूर्वी करता येईल. परंतु तो देय झाल्यावर तीन महिन्यांनंतर करता येणार नाही.
3) फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात केलेल्या प्रवासाबद्दल प्रवास भत्त्याची मागणी त्यानंतरच्या एप्रिल महिन्याच्या समाप्तीपूर्वी केल्यास, लगतनंतरच्या वित्तीय वर्षात पैसे देण्यासाठी ती स्वीकारता येईल.
4) मागणी देय झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत अशी मागणी केली असेल परंतु पत्रव्यवहारातील विलंबामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्या मागणीतील पैसे जर त्याच महिन्यात दिले गेले नसतील तर, ते पुढील वित्तीय वर्षात किंवा त्यानंतर देता येतील.
5) कोणतीही मागणी देय झाल्यापासून तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर केली असेल तर पंचायतीने मान्य करावयाच्या पुरेशा व वैध कारणांशिवाय ती स्वीकारता कामा नये.
नियंत्रण अधिकारी:
सरपंच हा त्याच्या स्वत:चा नियंत्रण अधिकारी राहील आणि पंचायतीचा उपसरपंच आणि इतर सदस्यांचा प्रवास व दैनिक भत्ता यांबाबतच्या मागण्यांच्या प्रयोजनाकरिता सुद्धा तोच नियंत्रण अधिकारी असेल.
भत्त्याची मागणी:
(१) नियम ३ अन्वये अनुज्ञेय असलेल्या दैनिक व प्रवास भत्त्याची मागणी ह्या नियमांना जोडलेल्या नमुन्यात दाखल केली पाहिजे.
(२) प्रवास व दैनिक भत्त्याची मागणी करणाऱ्या पंचायतीच्या सदस्याने पुढीलप्रमाणे पत्रे सोबत जोडली पाहिजेत:
(अ) पंचायतीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या किंवा राज्य शासनाच्या खर्चाने कोणतेही मोफत स्थलांतर करण्यासाठी तरतूद केलेली नव्हती,
(ब) त्याने प्रवास भत्त्याची केलेली मागणी ही नियमानुसार आहे आणि मागणी केलेली रक्कम बरोबर आहे,
(क) इतर कोणत्याही मार्गाने त्याला या पूर्वी या मागणीबाबत कोणतीही रक्कम मिळालेली नाही,
(ड) त्याने खरोखरच प्रवास केलेला आहे.
सर्वसाधारण, या नियमात तरतूद न करण्यात आलेल्या बाबीसंबंधाने दैनिक प्रवास भत्त्याबाबतच्या मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ चे उपबंध या नियमात तरतूद केलेल्या प्रवासाबाबत लागू होतील.
हेही वाचा – महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच आतिथ्य भत्ता नियम, १९९५
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!