Pik Spardha 2024 : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचं आवाहन !
शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 च्या पिकस्पर्धेत (Pik Spardha) सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. राज्य, तसेच जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचं आवाहन ! Pik Spardha:
पिक स्पर्धेत (Pik Spardha) जिल्ह्याकरिता खरीप हंगामासाठी मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, भूईमूग व सुर्यफुल पिके स्पर्धेसाठी समाविष्ट केली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर शेतजमीन असणे व ती जमिन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिक स्पर्धांमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील, ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. स्पर्धेकरीता सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रूपये प्रवेश शुल्क राहणार आहे.
पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा व आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.
पिक स्पर्धामध्ये राज्य ते तालुकास्तरावरील विजेत्या स्पर्धकास ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे, त्यास्तरावरील त्या क्रमांकाच्या खालचास्तर व क्रमांकाकरीता स्पर्धकास त्याच पिकासाठी पुढील पाच वर्षे स्पर्धक म्हणून बक्षिसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तथापि विजेतास्तरावरील त्या क्रमांकाच्या वरील स्तर व क्रमांकाकरीता स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षिसासाठी पात्र राहणार आहे.
पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप हे सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम ही तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार रूपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस 2 हजार रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रूपये, तिसरे बक्षीस 5 हजार रूपये, तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये व तिसरे बक्षीस 30 हजार रुपये याप्रमाणे आहे.
मुग आणि उडीद, सोयाबीन, तूर, मका ज्वारी, बाजरी, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी अर्ज सादर करून पिकस्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जुलै 2024 2 सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ.
अर्ज करा : अर्ज करण्यासाठी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात भेट देऊन अर्ज सादर करावा.
पिकस्पर्धेच्या (Pik Spardha) मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
हेही वाचा – Pik Vima : खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, 1 रुपयात भरला जाणार पीकविमा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!