सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Satbara correction in Marathi
आता घरबसल्या सातबारा पाहता येणार त्याचबरोबर सातबारा मध्ये जर काही बदल करावयाचे असल्यास ते बदल देखील घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील. बऱ्याच वेळा असे घडते की खातेदार हे सातबारा मध्ये पुढील कारणास्तव बदल करू इच्छितात या कारणांमध्ये खरेदी खत आधारित झालेला बदल, जमीन लिस त्या आधारे झालेला बदल कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले तर वारसांच्या नावे करण्यात येणारा बदल, जमिनीवर एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असल्यास बँकेद्वारे टाकण्यात येणारा बोजा त्याचबरोबर जर या कर्जाची परतफेड केली असेल तर कर्ज परतफेडी नंतर बोजाची नोंद कमी करणे या व इतर अनेक कामांसाठी खातेदार यांना संबंधित तलाठी यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रे सुपूर्द करावी लागत होती व त्यानंतर ही नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत होती.
परंतु या प्रक्रियेमध्ये फार वेळ जात होता. संबंधित तलाठी यांच्याकडे कागदपत्र सुपूर्द करणे यातही खातेदारांचा वेळ जात होता व त्यामुळे एका व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरण होण्यास बराच काळ लागायचा. त्यातून मधल्या काळात जर पीक विमा मिळाला किंवा भूसंपादन झाले व त्याचा मावेजा मिळाला तर आलेल्या रकमेच्या वाटपा चे अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण व्हायचे.
सबब नोंदणी कृत खरेदीखत, लीज डिड यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार सातबारा अभिलेखावरून एका व्यक्तीचे नाव कमी करून वैधरीत्या दुसऱ्या व्यक्तीची मालकी हक्कात नोंद करणे हे काम त्वरित गतीने करण्यासाठी शासनाने हक्क प्रणाली आणलेली आहे. यासाठी शासनाने ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे.
ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा यांतील माहितीत फरक असल्याचे आपल्या लक्षात येते. दोन्ही उताऱ्यांतील नावे, क्षेत्र यात तफावत आढळून येते. त्यामुळे ही माहिती दुरुस्त करणे गरजेचे असते. महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीद्वारे यात दुरुस्ती करता येणार आहे. यासाठीचा ऑनलाईन अर्ज घरबसल्या तलाठी कार्यालयाला पाठवता येणार आहे. मागील लेखा मध्ये आपण सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशा प्रकारे करावी ते सविस्तर शिकलो, आता सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया.
सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:
१) जमिनीचे सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खालील Property Registration ची वेबसाईट ओपन करा.
https://pdeigr.maharashtra.gov.in
२) आपल्या समोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावाने एक पेज ओपन होईल. यावरील ‘Proceed to login‘ या पर्यायावर क्लिक केले की तिथे तुम्हाला आधी तुमचे login अकाऊंट सुरू करायचे आहे. त्यासाठी ‘Create new user‘ यावर क्लिक करायचे आहे.
३) आता ‘New User Sign Up‘ नावाचे नवीन पेज उघडेल. नवीन युजर अकाउंट Sign Up करण्यासाठी आपली सर्व Contact Information भरून सेव्ह बटन वर क्लिक करा.
४) त्यानंतर या पेजवर खाली ‘Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.’ असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला ‘Back‘ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचे आहे.
7/12 Mutations:
१) लॉगिन केल्यानंतर ‘Details‘ नावाचे एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथे Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. यामध्ये सातबारा दुरुस्ती चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘7/12 Mutations‘ वर क्लिक करायचे आहे.
२) यांनतर इथे गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
३) त्यानंतर तुम्ही “तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा.
४) आपणस विविध प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील, पण आपण इथे सातबारा दुरुस्ती चूक दुरुस्त करायची असल्यामुळे आपण “हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज” हा पर्याय निवडणार आहोत.
१. वारस नोंद
२. बोजा / गहाणखत दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे
वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
7/12 मधील चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज भरा:
१) “हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज” या पर्यायावर क्लिक केल्यावर 7/12 मधील चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचे नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून ‘पुढे जा‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
२) नंतर स्क्रीनवर आपला मसूदा अर्ज जतन केला आहे असा मेसेज येईल व त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील ‘ओके‘ या बटनावर क्लिक करायचे आहे.
३) त्यानंतर खातेदाराचे पहिले नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथे टाकणे गरजेचे आहे.
४) त्यानंतर ‘खातेदार शोधा‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचे आहे.
५) खातेदारकाचे नाव निवडल्यानंतर संबंधित खातेदाराला कोणत्या गट क्रमांकाचा सातबारा दुरुस्त करायचा आहे तो गट क्रमांक येथे निवडायचा आहे.
६) त्यानंतर ‘समाविष्ट करा‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
७) त्यानंतर मग खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.
८) आता ऑनलाईन सातबाऱ्यातील चूक निवडायची आहे यामध्ये सातबाऱ्यातील एकूण क्षेत्र व एकक दुरुस्त करणे, खातेदाराच्या नावात दुरुस्ती करणे, खातेदाराचे क्षेत्र दुरुस्ती करणे या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. आता जर तुम्ही खातेदाराच्या नावात दुरुस्ती करणे हा पर्याय निवडला तर संगणकीकृत सातबारा वरील खातेधारकाचे नाव तिथे दाखवण्यात येते. त्यातील पहिले वडील, पतीचे किंवा आडनाव यापैकी ज्या नावात दुरुस्ती हवी असेल ते दुरुस्त नावं इथे तुम्हाला लिहायचे आहे त्याखाली तुम्हाला दुरुस्तीचा तपशील सविस्तर लिहायचा आहे.
९) त्यानंतर ‘पुढे जा‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे व कागदपत्रे जोडायची आहे. यामध्ये जुना हस्तलिखित 7/12 प्रत अपलोड करायची आहे आणि इतर जुने फेरफार उतारे असतील तर ते जोडायचे आहेत आणि मग कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
१०) पुढे तुम्हाला एक स्वयंघोषणपत्र दिसेल. त्यामध्ये असे नमूद केले आहे कि, सदरच्या अर्जात दिलेली माहिती फक्त ऑनलाईन ७/१२ मध्ये दिसून येत असलेल्या त्रुटी/चुका दुरुस्त करण्यासाठी असून या अर्जाने मूळ हस्तलिखित ७/१२ मधील त्रुटी/चुका दुरुस्त होणार नाही ह्याची मला जाणीव आहे. अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक आहे- अशा आशयाचे हे पत्र असते.
११) सगळ्यांत शेवटी या पत्राच्या खाली सहमत आहे Agree या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सातबारा उताऱ्यातील नाव दुरुस्तीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल. त्यानंतर तो चेक करून मंडळ अधिकाऱ्यांकडे तो पाठवला जातो. त्यांनी तो प्रमाणित केला की मग तुमच्या सातबारा उताऱ्यावर ती दुरुस्ती नोंदवली जाते.
हेही वाचा – गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!