नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (PoCRA) योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन करण्यात आले.
PoCRA योजनांची गावातील सद्यस्थिती पहा:
“ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेमुळे पोक्रा अंतर्गत प्रत्येक गावाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. यामुळे या प्रकल्पाअंतर्गत योजनांना अधिक चालना व हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन मिळेल.”
पोक्रा अंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती या ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेत देण्यात आली आहे. महा पोक्रा संकेतस्थळावर खास एक विभाग विकसित करण्यात आला आहे. जिल्हा, तालुका व त्यातील गाव निवडून गावाची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे. https://mahapocra.gov.in/village-profile या लिंकवर जाऊन कोणीही कोणत्याही गावाची माहिती पाहू शकतात.
हवामानात होणारे बदल शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेकदा आपल्या भागातील शेती योजनांची माहिती शेतकऱ्यांना एका ठिकाणी उपलब्ध नव्हती, ती आता सहज उपलब्ध होत आहे.
PoCRAअंतर्गत १५ जिल्ह्यांतील प्रत्येक प्रकल्प गावातील पोक्राचे समूह सहायक, कृषीसहायक, शेतीशाळा प्रशिक्षक, संबंधित तालुका व उपविभागीय कृषी अधिकारी असे प्रकल्प कर्मचारी व अधिकारी, तसेच सरपंच व ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी यांची संपर्क सूची देण्यात आली आहे.
यामुळे सर्वसामान्य शेतकरी संबंधितांशी थेट संपर्क साधू शकतात. तसेच, गावातील शेतकऱ्यांनी घेतलेला वैयक्तिक लाभ व घटकनिहाय अनुदान वितरण, एकूण नोंदणी व अर्ज संख्या कळेल. ग्राम कृषी संजीवनी समितीच्या पुढाकाराने गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे, गावातील पाण्याचा ताळेबंद, पिकाखालील एकूण क्षेत्र याचा तपशील असा एकूण गावाचा लेखाजोखा येथे मांडण्यात आला आहे. गावाचा नकाशा देखील यामध्ये पहायला मिळेल. यामुळे अत्यंत पारदर्शकपणे सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
सन २०११ ची जनगणना, २०१० ची कृषी गणना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी तथा PoCRA प्रकल्पाचा डेटाबेस यांच्या आधारे ही ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेच्या मार्गदर्शक सूचना व लाभासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक या दर्शिकेत उपलब्ध होतील.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!