ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी
आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास दि. १३.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
तथापि, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी-शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी शासन निर्णय :-
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
सदर “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यासाठी निकष व इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे आहेत:-
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/ मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संलग्न (attach) करतील.
मुलभूत पात्रता:
१. विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.
२. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
४. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
५. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
६. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
७. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.
८. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
शैक्षणिक निकष:
१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPAचे गुण असणे आवश्यक राहील.
३. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्याथ्यर्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
४. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ३०% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
५. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील.
६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
७. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
८. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
९. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
इतर निकष:
१. योजनेचा लाभ १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु, इंजीनिअरिंग / वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्षे अनुज्ञेय असेल.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल.
४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
५. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि, उपरोक्त ५ वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.
६. सदर योजनेतंर्गत सन २०२४-२५ करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थी अशा रितीने प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल. तद्नंतर सन २०२५-२६ पासून व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहिल. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांस पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. उर्वरीत सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे शासन परिपत्रक क्र.वगृयो-२०२३/प्र.क्र.१२/योजना-५, दि.१३.०३.२०२३ मधील विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल.
७. विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, ज्या विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल.
८. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
९. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी / व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.
१०. सदर योजनेतंर्गत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे.
सामाजिक प्रवर्ग | सदर योजनेतंर्गत अनुज्ञेय आरक्षण |
इतर मागास प्रवर्ग | ५९ |
विमुक्त जाती व भटक्या जमाती | ३४ |
विशेष मागास प्रवर्ग | ६ |
अनाथ | १ |
एकुण | १०० |
११. योजनेतंर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल, त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा ५०% इतकी राहील, व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
१२. सदर योजनेतंर्गत महिलांसाठी ३०% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
२. स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत)
३. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
४. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र / करारनामा
५. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा
अनुदान वितरण :-
सदर योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे अनुदान वितरण करण्यात येईल -:
योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेली भोजन, निवास व निर्वाहभत्त्याची पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्या-मधून आगाऊ जमा करण्यात यावी. सदरहू योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्यात नमूदप्रमाणे वेळापत्रक ठरविण्यात येत आहे,
हप्ता | त्रैमासिक कालावधी | रक्कम जमा करण्याचा कालावधी |
पहिला हप्ता | माहे जून ते माहे ऑगस्ट | ज्या दिवशी विद्यार्थ्याचा / विद्यार्थीनीचा ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज मंजूर होईल, त्यानंतर ७ दिवसामध्ये. |
दुसरा हप्ता | माहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबर | माहे ऑगस्टचा दुसरा आठवडा |
तिसरा हप्ता | माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी | माहे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा |
चौथा हप्ता | माहे मार्च ते माहे मे | माहे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा |
तक्यात नमुद वेळापत्रक हे जरी १२ महिन्यांचा कालावधी दर्शवित असले तरी प्रस्तूत योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यास एका शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांचा कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील. सदर १० महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांची राहील. तथापि, लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये देय असलेली रक्कम जमा करावी.
अनुज्ञेय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.
या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस इतर कोणताही भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाहीस उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
संनियंत्रणः-
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) तसेच संबंधित जिल्हयातील वसतिगृहाचे गृहपाल, यांचे संनियंत्रण राहील. तसेच प्रस्तुत योजनेची राज्यस्तरावरील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.
विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परिक्षेचा निकाल १५ दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहील.
विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ संबंधित अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंतच देय असेल. (उदा. इंजिनिरींग अभ्यासक्रम कालावधी ४ वर्षे असल्यास त्यास ४ वर्षेच लाभ मिळेल) विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची १२% व्याजासह वसुली केली जाईल.
सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विदयार्थ्यांना पदवी/पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करतांना एटीकेटी (ATKT) प्राप्त झाली त्या विदयार्थ्याला फक्त एकदाच या अटीतून सुट देण्यात येईल. (म्हणजेच एखादया विदयार्थ्यास दुसऱ्या वेळेस एटीकेटी मिळाल्यास तो सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास अपात्र ठरेल.)
ज्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंर्गत अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगावू देण्यात येईल व त्यानंतर शैक्षणिक संस्थेच्या प्रत्येक तिमाहीची हजेरी ७५ % पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरीत तिमाहिची रक्कम अदा केली जाईल. ही अदा करण्यात येणारी रक्कम आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
सर्व प्रादेशिक उप संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे त्यांच्या अधिनस्त प्रादेशिक विभागातील सर्व जिल्हयाच्या सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्या सहाय्याने सदर योजनेचा मासिक आढावा घेतील.
सदर योजनेच्या अटी व शर्ती वेळोवेळी आवश्यक वाटल्यास सुधारीत करण्याचे अधिकार शासनास राहतील.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” ही योजना राबविल्यामुळे शाश्वत विकास ध्येय क्र.२,४,१० चे लक्ष्य क्र.२.१,४.१.१०.२ सन २०३० पर्यंत साध्य करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणारा खर्च मागणी क्रमांक झेडजी-३, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इमाव, विजाभज (स्वयंम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (कार्यक्रम) (२२२५एफ ८३५) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात येईल.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग:
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ” साठी निकष व अटी लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !