बँक मुदत ठेव स्मार्ट गुंतवणुकीचा पर्याय
पैशांची बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी बँकांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी बहुतेक लोक मुदत (Bank Fixed Deposit) ठेवीला प्राधान्य देताना दिसतात. मुदत ठेवीमध्ये चांगल्या व्याज दरांव्यतिरिक्त इतरही अनेक फायदे मिळतात. त्यामुळे बचतीचा हा सर्वात लोकप्रिय पर्याय झाला आहे. बँक एफडीवर विमा आणि आयकर सूट (Income Tax Exemption) उपलब्ध आहे. काही बँका तर आपल्या खातेदारांना आरोग्य सुविधा (Healthcare Benefits) देखील पुरवत आहेत. त्यामुळे बँक एफडी करताना मिळणाऱ्या विविध सुविधांचा विचार करूनच एफडी करावी. कमी वयातही सुरू करू शकता एफडी सध्या आपल्यासमोर गुंतवणुकीच्या पर्यायांची कमतरता नाही. तरीही योग्य पर्याय निवडून गुंतवणूक करणं हे मोठं आव्हान आहे. तसं पहायला गेलं तर एफडी हे गुंतवणुकीचं नवीन साधन नाही, परंतु बाजारातील अस्थिरता लक्षात घेता तो नक्कीच एक स्मार्ट पर्याय ठरतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एफडी खाते (FD Account) कमी रकमेत आणि लहान वयातही उघडता येतं. यावर सुरक्षेच्या हमीसह चांगला परतावादेखील मिळतो.
गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक तरी योग्य गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे, पण प्रत्येक गुंतवणूक पर्याय हा सर्वांसाठी नसतो. हा एक मुद्दा लक्षात घेतला तरी गुंतवणूक पर्याय निवडणे सोपे जाते.
आपण २०२३ मध्ये शेअर बाजारातील गती पाहिली आहे, पण शेअर बाजारातील उच्च स्तरावर असणारा संभाव्य आर्थिक धोका कोणीही नाकारू शकत नाही, त्यामुळे बँक मुदत ठेव गुंतवणूक पर्यायाचा विचार मध्यमवर्गीय कुटुंबात सर्वप्रथम करणे गरजेचे आहे. तुलनात्मक दृष्टीने विचार केल्यास बँक मुदत ठेव योजनेचे फायदेदेखील खूप मोलाचे आहेत. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
गुंतवणूक पर्यायाबद्दल विचार करताना स्थिर आणि अस्थिर परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा तुलनात्मक विचार केला जातो. शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मालमत्ता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असतो, पण हाती पैसे खेळते राहण्यासाठी बँक मुदत ठेव योजना उत्तम पर्याय आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२४ या काळासाठी बहुतांश स्थिर परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही. अल्पबचत योजनांपैकी फक्त सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षीय मुदत ठेव योजना यांवरील व्याजदरात अनुक्रमे ०.२ आणि ०.१ टक्का व्याज दरवाढ केली गेली आहे.
गुंतवणूक आणि तरलता (लिक्विडिटी) दृष्टीने बँक मुदत ठेव पर्यायाचा अवलंब करण्याची योग्य पद्धत:
- एकच मोठ्या रकमेची गुंतवणूक मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) योजनेत न करता बचत केलेले पैसे किमान दोन मुदत ठेव योजनेत भरावे.
- तीन वर्षांहून अधिक मुदत ठेव कालावधी निवडू नये. सामान्यतः तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर व्याजदर सर्वात अधिक असतो.
- दोनपेक्षा अधिक मुदत ठेवीमध्ये पैशांची गुंतवणूक करणार असल्यास ३ वर्षे – २ वर्षे १ वर्ष, गुंतवणूक कालावधी स्वीकारावा. जेणेकरून तुमच्याकडे दरवर्षी गुंतवणूक केलेले पैसे हाती येतील.
- पैशांची गरज नसल्यास पुन्हा ते पैसे तीन वर्षांसाठी मुदत ठेव योजनेत ठेवावे.
- बँक मुदत ठेवीवर एक टक्का व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे मुदत ठेव गुंतवणूक पर्याय सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा मौल्यवान आहे. कारण मुदत ठेवीवर कर्ज घेतल्यास एक टक्का व्याज द्यावे लागते. याबाबत थोडं स्पष्टीकरण देत आहोत.
- जर तुमचे एक लाख रुपये ७ टक्के व्याजदराने मुदत ठेव योजनेत असल्यास बँकेकडून मुदत ठेवीवरील रकमेच्या नव्वद टक्के म्हणजे नव्वद हजारांचे कर्ज वर्षभरासाठी ८ टक्के व्याजदर आकारून दिले जाईल.
- पैशांची गरज असताना इतक्या कमी व्याजदरात कोणतीही इतर गुंतवणूक योजना कर्ज (तरलता) देत नाही. त्यामुळे मुदत ठेव योजनेकडे परतावा यादृष्टीने न पाहता तरलता दृष्टीने पाहावे.
हेही वाचा – किमान शिल्लक नसल्यास ‘त्या’ खात्यांना दंड नाही, आरबीआयने दिले सर्व बँकांना निर्देश !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!