वारस नोंद, ई फेरफार अर्जासाठी शुल्क निर्धारित ! Enrollment of heirs, E Ferfar
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना तसेच संदर्भ क्र.१ च्या शासन परिपत्रकान्वये ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं. ७/१२, ८-अ डिजीटल स्वरूपात उपलब्ध केले आहेत. सदर संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देणेत आले आहेत त्यांची नक्कल फी संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेली आहे. अधिकार अभिलेखामध्ये फेरफार घेण्याची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली असून, त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (NIC), पुणे यांचेमार्फत ई-फेरफार प्रणाली विकसीत केली आहे. यापुर्वी अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकाला तलाठी कार्यालयात समक्ष अर्ज कागदपत्रांसह दाखल करावा लागत असे. यासाठी आता ई-हक्क प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. याव्दारे कोणत्याही खातेदार नागरीकांना फेरफारसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्र अपलोड करून ई-हक्क प्रणाली व्दारे थेट संबंधित तलाठी यांचेकडे दाखल करता येतात.
महाभूमी पोर्टल वर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावरून उपलब्ध होणारे डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८-अ ज्यावर दर्शविलेल्या क्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी पडताळणी क्रमांकाआधारे त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे, असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दि.२३.११.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व कायदेशीर व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य समजले जातात. हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख शासनाच्या महाभूमी पोर्टल वर सामान्य नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.
सदर डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख उपलब्ध करून घेण्यासाठी प्रत्येक खातेदाराकडे संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि इंटरनेट जोडणी उपलब्ध असेलच असे नाही, म्हणून असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सामान्य जनतेला उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा सेवा केंद्र यांनी आकारावयाच्या नक्कल फी बाबत एकवाक्यता राहावी व नागरिकांची आर्थिक पिळवणूक होवू नये याकरीता तसेच ई-हक्क प्रणालीव्दारे नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.
वारस नोंद, ई फेरफार अर्जासाठी शुल्क निर्धारित – E-Modification Application Charge शासन निर्णय :-
ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं. ७/१२, ८-अ संगणकीकृत करण्यात आले असून संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देणेत आले आहेत त्यांची नक्कल फी शासन निर्णयान्वये निश्चित केलेली आहे. सदर संगणकीकृत अभिलेख खालील तक्त्यात नमूद केलेल्या दरानुसार सेतू/आपले सरकार सेवा केंद्र / महा ई-सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र. | अभिलेख | दर | २ पेक्षा अतिरिक्त पृष्ठ संख्या असल्यास |
१ | ७/१२, ८-अ | रू.२५/- (पृष्ठ संख्या २ पर्यंत) | प्रति पृष्ठ रु. २/- |
वर नमूद रू.२५ ची विभागणी ही राज्य शासन रू.५/-, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचेकडील स्विय प्रपंजी लेखा खाते रू.१०/- आणि सेतू/आपले सरकार सेवा केंद्र / महा ई-सेवा केंद्र रू.१०/- अशी राहील. २ पेक्षा अतिरिक्त पृष्ठे असल्यास प्रतिपृष्ठ रू.२/- प्रमाणे शुल्क सेवा केंद्र चालकास घेता येईल.
डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नं.७/१२ व गाव नमुना नं. ८-अ ज्यावर दर्शविलेल्या क्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी पडताळणी क्रमांकाआधारे त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे, असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दि.२३.११.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व कायदेशीर व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य समजण्यात यावेत.
भूलेख संकेतस्थळावरील https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवरून विनाशुल्क उपलब्ध होणारे विनास्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८-अ ज्यावर महाभूमी चा वाटरमार्क असतो आणि ज्यावर क्युआर कोड किंवा १६ अंकी पडताळणी क्रमांक दर्शविलेला नसतो असे अधिकार अभिलेख फक्त माहितीसाठी असून ते कोणत्याही कायदेशीर व शासकीय कामासाठी अवैध समजण्यात येतात. सदर विनास्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ व ८-अ कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र अथवा संग्राम केंद्रचालक यांना त्यांचे सही शिक्क्याने विक्री/वितरण करता येणार नाहीत. सदर बाबत सविस्तर सुचना माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.
ई-हक्क प्रणालीव्दारे एक फेरफार अर्ज नोंदविण्यासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे व अंदाजित दर याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येत आहे.
अ.क्र | फेरफार प्रकार | आवश्यक कागदपत्रे | अंदाजित पृष्ठ संख्या | सेतू/ आपले सरकार सेवा केंद्र / महा-ई सेवा केंद्रांकरीता अंदाजित दर |
A | B | C | D | E |
१ | ई-करार | सोसायटी ई-करार प्रत व अधिक १ कागदपत्र | २ | रु.२५/- |
२ | बोजा दाखल करणे / गहाणखत | बँकेची प्रत व गहाण खताची प्रत व अधिक १ कागदपत्र | ३ | रु.२५/- |
३ | बोजा कमी करणे | बँकेची प्रत व अधिक १ कागदपत्र | २ | रु.२५/- |
४ | वारस नोंद | मृत्यु दाखला सत्यप्रत, इतर व अधिक १ कागदपत्र | ३ | रु.२५/- |
५ | मयताचे नाव कमी करणे | अर्जदाराचे ओळखपत्र, मृत्युचा दाखला व स्वयंघोषणा संमत्ती पत्र | ३ | रु.२५/- |
६ | अ.पा.क. शेरा कमी करणे | खातेदाराचा वयाचा पुरावा व अधिक १ कागदपत्र | २ | रु.२५/- |
७ | एकुम्या (एकत्र कुटुंब प्रमुख) नोंद कमी करणे | एकुम्या संबधित फेरफार, सहधारक / वारस स्वयंघोषणा पत्र व अधिक १ कागदपत्र | ३ | रु.२५/- |
८ | विश्वस्थांचे नाव बदलणे | धर्मादाय आयुक्त यांचे आदेश पत्र व अधिक १ कागदपत्र | २ | रु.२५/- |
वर नमूद रू.२५ ची विभागणी ही महा-ई सेवा केंद्र / आपले सरकार/सेतू सारख्या संस्थांकडून प्रचलित सेवाशुल्क आकारणी रू. १५/- अधिक ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क र.रू.१०/- अशी राहील. सदरचे ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क हे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचे कार्यालयातील स्विय प्रपंजी लेखा खाते यामध्ये जमा करण्यात येईल. वर नमूद पृष्ठसंख्येपेक्षा अतिरिक्त पृष्ठे असल्यास प्रतिपृष्ठ रू.२/- एवढे अतिरिक्त शुल्क सेवा केंद्र चालकास घेता येईल. तथापि, कोणत्याही खातेदार नागरीकाने वैयक्तिकरित्या सदर कागदपत्रे अपलोड केल्यास, सदर सेवा खातेदार नागरीकास निःशुल्क राहील.
उपरोक्त सुचना सर्व विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
सदर शासन निर्णय माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अनौ. संदर्भ दिनांक ७.३.२०२२ नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग शासन निर्णय: महसूल विभागांतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देणे व ई-हक्क प्रणाली व्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Kabja nond kashi kartat tyabaddal mahiti dya jamin dar maran pavla ahe. Ani tyachya var amachi jamin ahe.