मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, श्रीमती चित्रा वाघ, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन ! CMMRF App:
रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्यासाठी 8650567567 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ‘रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
या आनंद मेळाव्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत एक वर्षातील आढावा घेणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटींचा आकडा कधी पोहोचला हे समजलेसुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाहीत, मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो. आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची काळजी घेण्याचे काम या सरकारने केले आहे.
आपल्याला जो काही अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे. एक सही एखाद्याला उपचार देत असेल, त्याचा जीव वाचत असेल तर मला अशा कितीही सह्या केल्या तरी कमीच वाटतात असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
अधिकारांचा वापर सर्वसामान्यांसाठी करतो. सामान्यांसाठी केलेल्या सह्या कमीच वाटतात. कोरोना काळात आपली माणसं परकी झाली होती. या परिस्थितीमध्ये कोरोना काळात एक टीम म्हणून काम केलं. कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलं नाही असेही त्यांनी सांगितले.
श्री. शिंदे म्हणाले, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रखडलेले प्रकल्प देखील पुढे नेण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली. याचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांना होत आहे. महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले असून त्यामुळे राज्यात रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना, स्वतः सेवेचे दूत बनून लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्यातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही असे यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मोबाईलॲप: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष संपर्क/व्हॉट्सॲप हेल्पलाईन : मदतीसाठी +918650567567 क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा व्हॉट्सॲप करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
कार्यालयाचा पत्ता: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, 7 वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मुंबई-४०००३२
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२६९४८.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!