गाव नमुना ६-अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6A
मागील लेखामध्ये आपण “गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही)” विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आपण या लेखात गाव नमुना ६-अ ( विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही ) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही दुय्यम नोंदवही आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे ) नियम १९७१, नियम १६ ( ३ ) अन्वये नमुना ३ मध्ये ही नोंदवही ठेवण्यात येते.
गाव नमुना ६-अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) – Gav Namuna 6A:
गाव नमुना सहा मध्ये नोंद केल्यानंतर, तलाठीमार्फत नमुना नंबर ९ मधील नोटीस बजावली जाते. अशी नोटीस बजावल्यानंतर, सदर नोंद प्रमाणित होण्याआधी जर त्या नोंदीबाबत कोणीही तक्रार / हरकत नोंदवली तर :
- तलाठी यांनी अशी तक्रार लेखी स्वरूपात स्वीकारावी.
- सदर तक्रारीची / हरकतीची नोंद गाव नमुना ६ अ ( विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवही ) मध्ये करावी.
- तक्रार / हरकत दाखल करणाऱ्या व्यक्तीला ( नमुना १० मध्ये ) पोहोच द्यावी.
- सदर तक्रार / हरकतीची कागदपत्रे तात्काळ मंडलअधिकारी याना सुपूर्त करावीत.
- साधारणतः अशा तक्रारींचे सर्वसाधारण स्वरूप खालील प्रकारचे असते.
अ. खरेदीदाराने खरेदीचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत.
खरेतर या तक्रारीमध्ये तथ्य नसते. खरेदी दिल्यानंतर खरेदी देणारा याला आपण कमी पैशात जमीन विकली आहे असा समज झालेला असतो किंवा खरेदीदाराला त्रास देणे अथवा त्याच्याकडून जास्त पैसे उकळणे या उद्देशाने अशा तक्रारी केल्या जातात. साधारणपणे व्यवहाराचे सर्व पैसे ताब्यात आल्याशिवाय कोणीही खरेदीदस्त नोंदणीकृत करण्याकामी स्वाक्षरीसाठी जात नाही.
ब . खरेदीदाराने फसवून किंवा इतर कामासाठी बरोबर नेऊन खरेदीदस्तावर सह्या घेतल्या आहेत.
या तक्रारीमध्ये खरेपणा नसतो. नोंदणीकृत दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालयातच होतो. दुय्यम निबंधक कार्यालयात आपण कोणत्या दस्तावर सही करीत आहे हे सही करणाऱ्या सर्वाना माहित असते. शंका असल्यास दुय्यम निबंधक किंवा तेथील कर्मचाऱ्यास विचारणा करता येऊ शकते. त्यामुळे अशा तक्रारीमध्ये खरेपणा नसतो. भारतीय पुरावा कायदा कलम ९१ व ९२ अन्वये नोंदणीकृत दस्ताच्या विरुद्ध दिलेला तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही. फसवणूक झाली असल्यास संबंधिताने फौजदारी स्वरूपाची तक्रार करणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता तक्रारदार महसूल अधिकाऱ्याकडे मुद्दाम तक्रार करतो. दिवाणी न्यायालयाने दस्त बेकायदेशीर ठरविला नसेल किंवा दिवाणी न्यायालयाकडून दस्त रद्द करून घेण्यात आला नसेल तर महसूल दफ्तरी अशा नोंदणीकृत दस्ताची नोंद करणे कायदेशीर ठरते.
क. जमिनीचे वाटप झालेले नाही. खरेदी देणार याने सामाईक जमिनीतील क्षेत्र विकले आहे.
अशा प्रकारच्या तक्रारींमध्येही तथ्य नसते. मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिश्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे खरेदी घेणाऱ्यास सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो. असे असले तरी लेखी तक्रार तलाठी यांना स्वीकारावीच लागते.
पूर्वी अशा हरकतींवर तहसिलदार स्वतः सुनावणी घेत असत. सध्या अनेक ठिकाणी हे अधिकार अव्वल कारकून आणि मंडलअधिकारी यांना दिलेले आहेत.
अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास तलाठी यांनी तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीला नमुना १० मध्ये पोहोच द्यावी. सदर तक्रारीची नोंद गाव नमुना सहा-अ ( विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवही ) मध्ये करावी. आणि सदर हरकतीची कागदपत्रे तात्काळ मंडलअधिकारी यांना सुपूर्त करावीत.
गाव नमुना सहा-अ ( विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही ) मध्ये नोंद कशी करावी.
गाव नमुना सहा – अ स्तंभ १ मध्ये तक्रारीचा अनुक्रमांक नोंदवावा.
गाव नमुना सहा – अ स्तंभ २ मध्ये गाव नमुना सहामधील सदर नोंदीचा अनुक्रमांक लिहावा किंवा त्याची कच्ची प्रत लावावी.
गाव नमुना सहा – अ स्तंभ ३ मध्ये गाव नमुना सहामधील स्तंभ ३ मध्ये नमूद भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक लिहावेत.
गाव नमुना सहा – अ स्तंभ ४ मध्ये हरकत अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक लिहावा.
गाव नमुना सहा – अ स्तंभ ५ मध्ये सक्षम अधिकाऱ्याने सदर हरकतीवर सुनावणी घेऊन दिलेला निकाल थोडक्यात लिहावा.
( तक्रार मान्य केली गेली आणि फेरफार क्रमांक …….. रद्द केला. किंवा हरकत फेटाळण्यात आली आणि फेरफार क्रमांक ……. प्रमाणित करण्यात आला आहे. )
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!