गाव नमुना ६-ड (नवीन उपभाग-पोट हिस्से नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6D
मागील लेखामध्ये आपण “गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही), गाव नमुना ६-अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही), गाव नमुना ६-ब (विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही) आणि गाव नमुना ६-क (वारसा प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहीली. आपण या लेखात गाव नमुना ६-ड (नवीन उपभाग (पोट हिस्से) नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गाव नमुना ६-ड (नवीन उपभाग – पोट हिस्से नोंदवही) – Gav Namuna 6D:
हि एक दुय्यम नोंदवही आहे. नवीन उपभाग किंवा पोट हिस्सा म्हणजे भूमापन क्रमांकाच्या ज्या विभागाचे क्षेत्रफळ आणि आकारणी, भूमिअभिलेखात ज्या भूमापन क्रमांकाचा तो भाग असेल त्या क्रमांकावर स्वतंत्र दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नांदलेला असेल तो भाग. [ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २ ( ३५ )]
गाव नमुना सहा – ड मध्ये केवळ वाटण्या झाल्यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्साचाच समावेश होत नाही तर संपादन, एकत्रीकरण, मळईची जमीन, पाण्याने वाहून गेलेली जमीन, अकृषिक जमीन यांसारख्या अनेक कारणांमुळे सीमांमध्ये होणारे सर्व बदलसुद्धा दर्शवले जातात. यासाठी तलाठी यांनी असे पोटहिस्से झालेल्या जागेला प्रत्यक्ष भेट देणे आणि झालेले बदल नोंदविणे आवश्यक असते. या बदलांप्रमाणे मोजणी करून नवीन सीमाचिन्हे व हद्दी भूमी अभिलेख विभागामार्फत निश्चित करण्यात येतात.
भूमी अभिलेख विभागाने, शासकीय मंजुरी घेऊन, वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यातील निरनिराळ्या वर्गाने जे कमीत कमी भूक्षेत्र धारण करणे आवश्यक आहे असे ठरवले असेल त्यापेक्षा कमी भूक्षेत्र धारण करता येत नाही. ( महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८२ )
जमिनीचे नवीन उपभाग किंवा पोटहिस्से करणे याबाबत सविस्तर पद्धत महाराष्ट्र जमीन महसूल ( महसुली भु – मापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग ) नियम १९६९ मध्ये दिलेले आहेत.
गाव नमुना ६-ड मध्ये नोंद कशी करावी.
गाव नमुना सहा-ड स्तंभ १ मध्ये गाव नमुना सहा मधील फेरफार नोंद क्रमांक लिहिण्यात यावा.
गाव नमुना सहा-ड स्तंभ २ मध्ये भूमापन क्रमांक किंवा उपविभाग क्रमांक लिहिण्यात यावा.
गाव नमुना सहा-ड स्तंभ ३ मध्ये हिस्सा करतांना आवश्यक असलेल्या बदलांचे स्वरूप आणि क्रमांक नकाशामध्ये दर्शवावा.
गाव नमुना सहा-ड स्तंभ ४ मध्ये मोजणी करणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचारी / अधिकाऱ्याचे नाव आणि मोजणी केल्याचा दिनांक नोंदवावा.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!